बुटकी राक्षसी
शकुंतलाची सावत्र आई तिला रागावत अन् मारत असे. पाहून एखाद्याचे डोळे दिपावेत, इतकी शकुंतला सुरेख होती रूपाने. पण तिच्या दोघी सावत्र बहिणी अत्यंत कुरूप होत्या.
"या डाकिणीमुळेच माझ्या मुलींची कुठं लग्नं जमत नाहीयेत," असे आई म्हणे.
सावत्र आईने गावातल्या एका पैसेवाल्या म्हाताऱ्याशी शकुंतलाचे लग्न करून द्यायचे ठरवले. अंधार झाल्याबरोबर ती घरातून निघून गावाबाहेरच्या चिंचेच्या बनात पोहोचली.
या वनात एक म्हातारी राहत असे. म्हातारीचे डोळे मांजरी सारखे घारे होते. तिच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरलेला असे. तिचे लाल पिंगट केसही नेहमी मोकळे अन् पसरलेले असल्याने म्हातारी भीतीदायक दिसे.
रात्रीच्या वेळी शकुंतलाला पाहून म्हातारीने तिला विचारले, "लाकडं वेचायला आलेली असताना मी तुला खूपदा पाहिलंय; पण आता रात्री कशी काय आलीस इथं?"
शकुंतलेने आपली करुणकथा म्हातारीला ऐकवली. म्हातारी म्हणाली, "तुझ्या सावत्र आईला तुझ्यावर असा हक्क गाजवायचा काहीही अधिकार नाही. मी एकटीच असते इथे. माझ्याबरोबर इथेच राहा तू."
म्हातारी तिच्याशी फार प्रेमाने वागे. शकुंतलाही घरचे सारे कामकाज पाहून म्हातारीला खूप खूप विश्रांती देई. म्हातारीला आता आरामच आराम असे.
म्हातारीची स्वतःची एक बैलगाडी होती. दर महिन्याला दोन पोती जंगलातली चिंच घेऊन ती बैलगाडीतून शहरात नेऊन विकून येई. त्या पैशातून लगेच ती स्वतःसाठी काही आवश्यक सामानही खरेदी करी. या वेळी म्हातारीने हे काम शकुंतलावर सोपवले. गाडीत चिंचेची पोती घालून शकुंतला शहराकडे निघाली.
शकुंतला गाडीत बसून जंगलातून जात असताना, अचानक एक बुटकी राक्षसी एकदम कुठूनशी येऊन उडी मारून बैलगाडी समोरच उभी राहिली, अन् टाळ्या वाजवत ती आनंदाने म्हणाली, "वा, वा! काय सुंदर, एखाद्या बाहुलीसारखी मनमोहक आहेस तू!"
राक्षसी दिसायला जरी अगदी भयानक दिसत असली, तरी ती शरीराने अगदीच बुटकी असल्याने कसाबसा धीर एकवटून शकुंतला तिला म्हणाली, "राजधानीत मी चिंच विकायला निघाले आहे. दूर हो पाहू वाटेतून!"
तिच्या रागावून बोलण्यामुळे राक्षसीचा चेहरा एकदम पांढरा पडला. मोठ्या दीनपणे ती म्हणाली, "अगं माझ्या गोडगोड बाहुले, रागवू नको ग माझ्यावर. मलाही आपल्या बरोबर गाडीतून ने ना! मी अगदीच बुटकी आहे ना, म्हणून इतर कोणीही राक्षस मला जवळही येऊ देत नाहीत. माझ्यावर बहिष्कारच घातला आहे त्यांनी, म्हणून या झाडावर बसून एकटीच जगत असते मी. पण या जीवनाला मी फार कंटाळून गेलेय गं!"
शकुंतलाला तिची फार दया आली. ती म्हणाली, "मग हे पाहा, मी तुला एका पोत्यात घालून पोत्याचं तोंड दोरीनं बांधून टाकते. तुला हवा मिळावी म्हणून मधून मधून मी गोणपाटाला भोकं पाडून ठेवते. चालेल ना तुला? आता खूश आहेस न राक्षसी?"
"अं? 'राक्षसी' म्हणून का हाका मारतेस मला? माझं नाव आहे 'युवराणी'. पोत्याला भोकं पाडशील ना, ती माझ्या डोळ्यांसमोर येणार अशी पाड; म्हणजे मला त्यातनं माणसं दिसतील. त्यांना पाहून आनंद लुटायचा आहे मला," बुटकी राक्षसी म्हणाली.
बाजारात पोचल्यावर पोती गाडीतून काढून, त्यांच्याजवळ उभी राहून शकुंतला ओरडू लागली, "चिंच घ्या चिंच! एका पोत्याचे पन्नास रुपये!" लांबून एका मिठाईवाल्याचा असाच ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता, "मिठाई घ्या मिठाई!" आवाज ऐकून राक्षसीने विचारले, "मिठाई म्हणजे काय असतं? माझ्यासाठी थोडीशी घेऊन ये ना! पाहू दे कशी चव असते ती!"
जवळच गुळाच्या ढेपा विकत असलेल्या मुलाला आपल्या पोत्यांवर नजर ठेवायला सांगून शकुंतला मिठाई आणायला गेली.
मधल्या वेळात मिठाईवाला मिठाई विकत विकत बराच दूर गेला. शेवटी त्याला गाठून मिठाई घेऊन येईपर्यंत शकुंतलाला अर्धा तास तरी लागलाच. परत येऊन पहाते, तर गाडीपाशी पोती नाहीत!
शकुंतला घाबरली. इकडे तिकडे पहात असतानाच गुळावाला मुलगा तिच्याजवळ येऊन एकशे पन्नास रुपये तिच्या हातावर ठेवत म्हणाला, "अगदी सहजपणे तुझी सगळी चिंच एकदम विकली गेली. राजाचे काही सैनिक बाजारला आले होते, ते तुझी चिंच विकत घेऊन गेले. राजकन्येचा विवाह आहे ना!"
उसचे बोलणे ऐकून शकुंतला घामाघूम झाली. 'बिचाऱ्या बुटक्या राक्षसीने आपल्यावर विश्वास ठेवला अन् आपल्याबरोबर आली ती! सैनिक आता तिचे कसे अन् किती हाल करतील कुणास ठाऊक! हातच्या भाले-बरच्यांनी तिला भोसकतील किंवा कदाचित तिला जिवंत जाळून ही टाकतील!' असा विचार मनात येताच ती भयाने कापू लागली.
शकुंतला आता ताबडतोब राजवाड्याकडे चालू लागली. जवळ पोचताच तिला दिसले की काही बायका-पुरुष भाज्या व अन्य काही सामानाची पोती डोक्यावर अन् पाठीवर लादून जात आहेत. सर्वजण ती पोती राजवाड्यामागील बागेजवळच्या मोकळ्या जागेत उतरवत होते. शकुंतलाही एक पोते डोक्यावर घेऊन तिथे पोचली. आपली चिंचेची पोती तिला तेथेच एका कोपऱ्यात दिसली.
डोक्यावरचे पोते मुद्दाम तिथेच उतरवायच्या मिषाने ती आपल्या पोत्यांजवळ पोचली, अन् तिने हळूच 'युवराणी, युवराणी' अशा हाका मारल्या.
त्यातल्याच एका पोत्यातल्या राक्षसीने तिला विचारले, "आणलीस मिठाई?" राक्षसी सुरक्षित असल्याचे जाणून शकुंतलेने सुटकेचा दीर्घ श्वास सोडत म्हटले, "युवराणी, अगं आत्ता आपण अचानक एका संकटात सापडलो आहोत. या घटकेला आपण राजप्रासादाच्या आवारात आहोत. अंधार झाला की मी इथून पळायची वाट शोधीन. मी तुझ्या नावानं हाका मारेपर्यंत मुळीच हालचाल न करता पडून राहा. या संकटातनं सहीसलामत वाचलो, तर मग खा हं मिठाई." अन् त्या पोत्याची दोरी सोडून टाकून ती तेथून बाजूला झाली.
सूर्यास्त होऊन आता हळूहळू अंधार पसरू लागला. शकुंतला सुटकेची वाट शोधत बागेत पोचली, तेंव्हा तिला तिथे एक तरुणी उदास बसलेली आढळली. तिची वस्त्रे-प्रावरणे पाहून 'हीच राजकुमारी असावी' असे शकुंतलेने ताडले. तिच्या जवळ जाऊन तिने विचारले, "राजकुमारी, उद्या सकाळी तुमचा विवाह आहे, अन् तुम्ही अशा उदास बसल्या आहात! तुम्हाला हा विवाह पसंत नाही असं दिसतंय. बरोबर ना?"
दचकून राजकुमारी म्हणाली, "कोण आहेस तू? मला हे लग्न पसंत नसल्याचं कसं ओळखलंस तू?"
शकुंतला हसत हसत म्हणाली, "एक महिन्यापूर्वी मीही या परिस्थितीतून गेलेय. न आवडणाऱ्या लग्नापासून स्वतःला वाचवण्यासाठीच तर मी घरून पळून गेले."
हे ऐकताच राजकन्येच्या डोळ्यात पाणी आले. देवीच्या मंदिरात पाषाणशिल्पे बनवणाऱ्या एका तरुण शिल्पकारावर तिचे प्रेम होते. पण ही गोष्ट आपल्या आईबापांना सांगण्याइतके धाडस तिच्यात नव्हते. त्यामुळे आता त्यांनी ठरवलेल्या एका देशाच्या युवराजाशी तिला विवाह करावा लागणार होता.
"पण असं लग्न करून काय उपयोग? आईबापांना या लग्नाबद्दलची अनिच्छा सांगायचा धीर होत नसेल, तर सरळ त्या राजपुत्रालाच सारं सांगून टाका राजकुमारी!" शकुंतलेने राजकुमारीला मार्ग सुचवला.
शकुंतलेचा सल्ला राजकुमारीला आवडला. आपली अंगठी काढून शकुंतलेच्या हाती देत ती म्हणाली, "ही तुझ्या बोटात असली म्हणजे राजमहालात तुला कुठेही संचार करता येईल. कसंही करून तूच सिंहपुरीच्या त्या राजकुमाराला इथे घेऊन ये."
थोडा विचार करून शकुंतला म्हणाली, "इथे आणलं तर कदाचित कोणी पाहीलही. बाहेर प्रांगणात विवाहाची सामग्री पडलेली आहे. तिथे जाऊन एका कोपऱ्यात तुम्ही लपून राहा. मी युवराजांना तिथे पाठवीन." अन् ती तेथून निघाली. दारावरच्या पहारेकऱ्यांना अंगठी दाखवून, कोणताही अडथळा न येता ती युवराजाच्या अतिथी गृहात पोचली.
इतरांना न कळू देता शकुंतलेने राजकुमारीची अंगठी दाखवून युवराजाला म्हटले, "राजकुमारी आत्ता ताबडतोब आपल्याशी काही मुख्य विषयावर बोलू इच्छितेय. आपण माझ्याबरोबर चलावे." त्याला बरोबर घेऊन तिने राजकुमारीची लपण्याची जागा दाखवली, अन् स्वतः ती एका झाडाखाली उभी राहिली.
युवराज जरा वेळाने परत आला, तेंव्हा त्याचे डोळे रागाने लाल झालेले होते. शकुंतलेजवळ परत पोचल्यावर त्याने तिला तिचे नाव विचारले. घाबरतच तिने आपले नाव 'शकुंतला' असल्याचे सांगितले.
"हे पहा शकुंतला, तू मला खूप आवडली आहेस. राजकुमारी मला कशी वाटली, हे तू मला विचारू नकोस. माझ्या ठरलेल्या लग्नाच्या मुहूर्तावर तू माझ्याशी लग्न करशील? तू तर एखाद्या गंधर्वकन्येसारखी सुंदर दिसते आहेस." युवराज शकुंतलाला म्हणाला.
युवराजाची मागणी ऐकून शकुंतला अवाकच झाली. आपला परिचय देऊन ती म्हणाली, "कोणत्याही दृष्टीने मी आपणा योग्य नाही."
"तुझ्या या नकरारामुळेच तू किती सद्गुणी अन् सुशील आहेस हे कळून येतंय मला! आता तर मी पक्का निश्चय केलाय की विवाह करीन, तर तुझ्याशीच!" राजकुमार दृढनिश्चयाने म्हणाला.
ही गोष्ट काही क्षणातच अंतःपुरापर्यंत पोचली. आपल्या मुलीने आपल्या प्रेमाबाबत आपणाजवळ काहीही न सांगितल्याचे राज-दम्पतीला फार दुःख वाटले. आपले कर्तव्य जाणून त्यांनी त्याच मुहूर्तावर तिचा विवाह शिल्पकाराशी अन् युवराजाचा विवाह शकुंतलेशी लावून दिला.
राजाने शकुंतलेवर खूश होऊन तिला म्हटले, "तू माझ्या मुलीला वाचवलंस. नाहीतर कुणास ठाऊक, ती काय करून बसली असती! बोल, काय देऊ मी तुला?"
"महाराज, लग्नाचं सामान ज्या प्रांगणात पडलेलं आहे, त्यात माझी तीन पोती आहेत. त्यातलं फक्त एकच मला घेऊ द्यावं. दुसरं काहीही नको मला." शकुंतलेने आपली इच्छा व्यक्त केली.
तिची इच्छा ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. राजाने तिला हवं ते पोतं घ्यायची परवानगी दिली.
बुटकी राक्षसी असलेलं शकुंतलेने मागितलेले पोते रथात ठेवले गेले. जाताना वाटेत तिचा निवास असलेले झाड दिसताच शकुंतलेने रथ थांबवायला सांगितले. ती पोत्याकडे पहात म्हणाली, "युवराणी, तुझं निवासस्थळ आलेलं आहे. बाहेर ये पोत्यातून. आता आपल्याला कसलाच धोका नाही."
पोत्यातून बाहेर आलेली बुटकी राक्षसी पाहून राजकुमार आश्चर्यचकित झाला! त्याने विचारले, "तुझं नाव 'युवराणी' आहे?"
"हो." असे म्हणत राक्षसीने मान हलवली, अन् एकाच उडीत ती झाडाच्या फांदीवर जाऊन बसली.
घटना खरी तर अशी घडली होती - रात्रीच्या अंधारात राजकुमाराने जेंव्हा दोनदा 'युवराणी, युवराणी' अशी हाक मारली होती, तेंव्हा ही राक्षसी त्याच्यासमोर प्रकट झाली होती.
तिला पाहून 'आपण फसवले गेलोय' असे राजकुमाराला वाटले. त्याला वाटले की इथली राजकन्या दिवसा मनुष्यरूपात अन् रात्री राक्षसरूपात वावरत असावी. या कल्पनेने तो अतिशय रागवला, अन् म्हणूनच त्याने शकुंतलेशी विवाह करायचा निश्चय केला.
जे घडले, ते सारे त्याने शकुंतलाला सांगितले. तो पुढे म्हणाला, "या बुटक्या राक्षसीच्या कृपेनंच आपण विवाह-बंधनात बांधले गेलो. या पुण्यकृत्यामुळे तिला पुढला जन्म नक्कीच राजकुमारीचा मिळेल." अन् तो मोठ्या खुशिने हसू लागला.