भुतीणीचें बाळंतपण
एका गावी एक फार गरिबीने नडलेली बाई राहत असे. ती बुरडाचा धंदा करी व टोपल्या विणून आपला उदरनिर्वाह चालवी.
एकदा ती घागर घेऊन पाण्याला निघाली असता तिला एका झुडपाखाली एक बेडूक दिसला. ती त्या बेडकाला थट्टेने म्हणाली— "या खेपेस तू बाळंत होशील तेव्हा मी येईन हो सुईण म्हणून. प्रथम वाटेतून बाजूला हो पाहू." ते ऐकताच बेडूक वाटेतून बाजूला झाला व तिला पुढे जायला वाट दिली.
काही दिवसांनी ती आपल्या झोपडीत बसून चरख्यावर सूत काढत असताना एक जण सरळ तिच्या घरात शिरला व म्हणाला— "हे पहा, माझ्या बायकोचे बाळंतपण जवळ येऊन ठेपले आहे. तू म्हणाली होतीस ना की तिच्या बाळंतपणाच्या वेळी सुईणीचे काम करायला तू येशील म्हणून. तर मग चल."
ती गरीब बाई घाबरून गेली. "मी? मी सुईणीचे काम करू? ते कसे काय? मी कधी ते काम केलेच नाही."
"तर मग वचन कशाला दिले होतेस? तू वचन दिले होतेस तर ते तू पुरे केलेच पाहिजेस," तो मनुष्य म्हणाला.
"मी कोणाला तसे वचन कधी दिलेच नाही," ती म्हणाली.
"तुला नाही आठवत? तू एकदा एका बेडकाला तसे वचन दिले होतेस. ती बेडकीणच माझी बायको आहे. मी कामिनी भुतांचा राजा आहे," तो मनुष्य म्हणाला.
ती बाई घाबरून गेली. ती त्या माणसाला म्हणाली— "मी तुझे हे गुपित कुणाला सांगणार नाही. तुझ्या बायकोच्या पोटात दुखू लागले म्हणजे मला कळव. मी येऊन माझ्याकडून होईल ती मदत करीन."
तो मनुष्य निघून गेला. दोन-तीन दिवसांनी मध्यरात्रीच्या सुमारास तो आला आणि म्हणाला— "माझ्या बायकोच्या पोटात दुखू लागले आहे. ये माझ्याबरोबर."
दोघे बरोबर निघून गेले. थोड्या वेळाने दोघे एका सुंदर राजवाड्यात येऊन पोहोचले. घरात पाऊल टाकताच तो मनुष्य हातापायांवर उभा राहिला. नवरा असा उभा राहिला तर बायकोची सोडवणूक सोपी नसते. म्हणून त्या गरीब बाईने त्या मनुष्याला निरनिराळी कामे सांगून पाहिली. पण तो मनुष्य दगडासारखा जागच्या जागी ओणवा उभा राहिला. तिला तेवढ्यात एक युक्ती सुचली. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली— "तुझी बायको बाळंत झाली."
नवर्याने लगेच विचारले— "बाळंतपण कसे गेले?" आणि उठून उभा राहिला. लगेच तिकडे त्याची बायको बाळंत झाली. ती गरीब स्त्री, मुलाची दृष्ट काढून म्हणाली— "माझे काम झाले. येते मी आता."
भुतांचा राजा तिला घरी पोहोचवायला गेला. त्याने तिला ती मागेल ते देण्याचे वचन दिले होते. पण तिने मागितले नाही व त्याने दिले नाही.
ती गरीब बाई काही वेळ घरात विश्रांती घेऊन केरवारा करायला म्हणून जरा बाहेर आली तेव्हा तिला एक रुपया दिसला. त्यानंतर दररोज ती सडा घालायला जाई तेव्हा तिला एक रुपया मिळे. अशा रीतीने तिचे दारिद्र्य दूर झाले.