Bookstruck

मजेदार पंखा

एका राजाला पंख्यांचं भारी वेड होतं. त्यामुळे त्याने खूपसे तऱ्हेतऱ्हेचे पंखे आपल्यापाशी जमवून ठेवले होते. एके दिवशी दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी राजा आपल्या विश्रांती-गृहात आराम करत बसला होता. इतक्यात राजवाड्याच्या बाहेरील रस्त्यावरून कोणा पंखेवाल्याची आरोळी ऐकू आली— "मजेदार पंखे, अद्भुत पंखे! पण खूपच स्वस्थ! किंमत फक्त पन्नास अशर्फी!" राजाने पंखेवाल्याला बोलावून घेतले. "काय रे, इतकी जास्त किंमत लावली आहेस? असं काय विशेष आहे तुझ्या पंख्यात?" राजाने त्याला विचारले. यावर पंखेवाला मोठ्या नम्रतेने बोलला— "हुजूर! इतके खास अद्भुत पंखे मी फक्त पन्नास अशर्फींना विकतो आहे. खूप स्वस्तच म्हणायला हवेत खरं म्हणजे!" "असं? पण दिसायला तर ते इतर सर्व सामान्य पंख्यांसारखेच दिसतायत की! इतके काही खास मजबूत नाही दिसत?" राजा अविश्वासाने बोलला. "महाराज! आपल्यासारख्यांना फसवण्याची चूक होईल का माझ्या हातून? इतकं कुठलं धैर्य माझ्यात? मी अगदी खरं सांगतोय की हे पंखे शंभर वर्षांहूनही अधिक टिकतील!" पंखेवाल्याने पुन्हा एकदा खात्री दिली. एक पंखा घेऊन पन्नास अशर्फी पंखेवाल्याच्या हातावर ठेवत राजा म्हणाला— "पहातोच या मजेदार पंख्याची क्षमता किती आहे ती! पुन्हा महिन्यानंतर माझ्याकडे ये तू!" "जशी आज्ञा महाराज! पण याचा उपयोग कसा करायचा, ते मला सांगायचंय." पंखेवाला पुन्हा नम्रपणे म्हणाला. हे बोलणं ऐकून राजाला राग आला. पंखेवाल्याला काही बोलू न देता तो म्हणाला— "अरे, पंखा कसा हलवायचा, हे ही तू मला सांगणार होय? अशी काय महान विद्या आहे ती! जा तू आता." नंतर राजा जरा आराम करण्यासाठी बिछान्यावर पडला आणि नवा पंखा हलवू लागला. एक दिवस पंखा हलवताना त्याची पानं सुटी होऊन खाली पडली अन् दांडाच तेवढा राजाच्या हाती राहिला! पण एक महिना गेल्यावर खरोखरच तो पंखेवाला बेधडक येऊन हजर झालेला पाहून मात्र राजाला मोठं आश्चर्य वाटलं. वाकून राजाला नमस्कार करत तो म्हणाला— "आज्ञा करावी महाराज! आपल्या आदेशाप्रमाणे महिना पूर्ण होताच मी आपणासमोर हजर आहे." त्याला पहाताच राजाच्या रागाचा पारा खूपच चढला. तो म्हणाला— "अरे तू तर एक नंबरचा लबाड प्राणी दिसतोस." अन् तो तुटका दांडा त्याने पंखेवाल्यासमोर धरला. हे सर्व पाहूनही जरासुद्धा न घाबरता पंखेवाला म्हणाला— "महाराज, क्षमा असावी मला. पण मी आपल्याला प्रथमच सांगितलं होतं की हा पंखा जरा विशेष असा आहे, याचा उपयोग नीट व्हायला हवा. पण आपण माझ्या सांगण्याकडे लक्षच दिलं नाहीत, म्हणूनच याची अशी अवस्था झाली." "असं? कसा उपयोग करायला हवा होता याचा?" राजाने चिडून विचारलं. "महाराज हा विशेष पंखा आहे ना, म्हणून हा हाताने न हलवता नुसताच पकडून आपलं डोकं त्याच्यापुढे हलवायचं." पंखेवाला उत्तरला. राजा तसा मोठा विनोदप्रियही होता. त्यामुळे खो-खो हसत तो म्हणाला— "वा! खूप! पंख्याच्या बाबतीतलं तुझं ज्ञान अद्भुत खरं! माझ्याकडे अनेक पंखे आहेत. मी तुला त्यांचा रखवालदार म्हणून नेमतो." असं बोलून राजाने त्याला आपल्याकडे नोकरी दिली.