मणिद्वीप
काही व्यापारी एका जहाजात बसून पूर्वेकडील बेटांच्या दिशेने निघाले. तेथे व्यापाऱ्यांच्या मालाची देवाणघेवाण करून ते श्वेत द्वीपात पोहोचले. तेव्हा त्यांच्या जहाजात सिंहल द्वीपाचा रहिवासी असलेला एक तरुण येऊन बसला. जहाज समुद्रात खोल पाण्यात चालल्यावर एकाएकी वादळ सुरू झाले आणि सुकाणू एका खडकावर आदळून तुटले. वादळामुळे जहाज कोणत्या दिशेने चालले आहे हे त्यांना कळेना. दुसऱ्या दिवशी त्यांचे जहाज एका बेटाकडे जात असल्याचे दिसले. थोड्याच वेळात खडक असलेल्या बेटावर जहाज आदळून फुटणार, अशी भीती सर्वांना वाटू लागली.
इतक्यात जहाजाचा कप्तान म्हणाला, "हे समोर जे द्वीप येत आहे ते मणिद्वीप आहे. या बेटाच्या खडकांत मणी असतात. इतके चांगले मणी जगात इतरत्र कोठेही मिळत नाहीत."
ते ऐकून सर्वांना जिवात जीव आल्यासारखे वाटले. सिंहल द्वीपावरचा तरुण रहिवासी म्हणाला, "अहो, जहाज फुटणारच असेल तर ते दगडावर किंवा हिऱ्या-माणकांवर आदळून फुटले तरी एकच नाही का?"
परंतु जहाज मणिद्वीपापासून एका मैलावर असतानाच वादळ थांबले. आता जहाज काठावर कसे पोहोचणार हा प्रश्न समोर होता. त्या बेटावर बंदर नव्हते. म्हणून लहान लहान होड्या पाण्यात सोडून लोक किनाऱ्याकडे निघाले. सिंहल द्वीपाचा रहिवासी तरुण जहाजातून उतरला नाही. तो म्हणाला, "मला त्या रत्नांची गरज नाही. तुम्हांलाच ती लखलाभ होवोत. मला आमच्या ताम्रमणी नगरीत जावयाचे आहे. हे जहाज मला खात्रीने त्या गावी पोहोचवेल. मी नाही उतरत." सर्व त्याला वेडापीर समजून मणिद्वीपाकडे होड्या घेऊन निघाले.
काठावर पोहोचताच जहाजाचा कप्तान म्हणाला, "या बेटावर खुजांचे (बौने) राज्य आहे. सांभाळून बोलावे व वागावे. कारण या खुजांना एकदा राग आला की स्वतः ब्रह्मदेव उतरला तरी तो देखील त्यांना त्यांच्या हातातून वाचवू शकणार नाही. विषारी बाणांनी ते शत्रूचा वध करतात. याउलट त्यांच्याशी सलोख्याने वागले तर ते आपल्यासाठी स्वतःचा जीवदेखील द्यायला तयार होतील."
तो समोर जो डोंगर दिसतो आहे त्यावर रत्ने व मणी-माणिक्ये आहेत. डोंगराच्या पायथ्याशी खुजांची वस्ती आहे. डोंगराचा कडा चारही बाजूंनी सरळसोट उभा आहे, त्यामुळे त्यावर चढून जाणे अशक्य आहे. पण चढायला पायऱ्या आहेत, ज्या खुजांच्या गावातून जातात. तेथील पहारेकरी डोळ्यांत तेल घालून पहारा देतात. तेव्हा त्यांच्याशी मैत्रीनेच बोलले पाहिजे. कप्तानाने सांगितल्याप्रमाणे सर्व डोंगराकडे निघाले. थोड्या वेळाने त्यांना खुजांची वस्ती दिसली. तरीही खुजांनी सोडलेले बाण त्यांच्या समोर येऊन पडू लागले. सुदैवाने कोणालाही बाण लागला नाही.
"आपण सर्व येथेच बसूया, नाहीतर त्यांना वाटेल की आपण त्यांच्यावर स्वारी करण्यासाठी आलो आहोत," कप्तान म्हणाला. त्याप्रमाणे सर्व जमिनीवर पडून राहिले. काही वेळाने खुजांचा एक नायक सैनिकांसह आला आणि ओरडून विचारू लागला, "कोण तुम्ही सर्व? आमच्या द्वीपावर कशासाठी आला आहात?" कप्तानाने आपली अडचण सांगितली, पण खुजांनी सर्वांच्या डोळ्यांना पट्टी बांधून त्यांना राजासमोर हजर केले.
राजा म्हणाला, "तुम्ही वादळ म्हणता, पण आमच्या अनुयायांना कोणतेही जहाज दिसले नाही. या बेटावर जो एकदा पाऊल टाकतो तो जिवंत परत जात नाही. तुमचा हेतू निराळाच आहे, म्हणून आम्ही तुम्हांला कैदेत ठेवण्याचे ठरविले आहे." व्यापाऱ्यांना एका अरुंद तुरुंगात कोंडण्यात आले.
दरम्यान, जहाजाचा ओघ बदलल्यामुळे ते वाहत जाऊन बेटाच्या पलीकडच्या बाजूला एका बंदरात लागले होते. सिंहल द्वीपावरचा तरुण शांतपणे झोपला होता. जेव्हा त्याची झोप मोडली, तेव्हा तो ताम्रमणी बंदरात पोहोचला असे त्याला वाटले. तो खाली उतरला तेव्हा त्याला समोर डोंगर दिसला. तेथे त्याला काही खुजी मुले गोट्या खेळताना दिसली. त्या गोट्या प्रत्यक्षात चकाकणारे मणी होते.
मुले सिंहली तरुणाला पाहून घाबरली आणि पळू लागली. पण त्याने त्यांना थांबवले आणि सांगितले, "मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे. मला भूक लागली आहे, काही खायला द्या." मुलांनी त्याला घरी नेले. त्याला समजले की या मुलांच्या राजाने त्याच्या व्यापारी मित्रांना कैद केले आहे. सिंहली तरुणाने आपल्या गमतीदार गोष्टींनी आणि गाण्यांनी खुजांचे मन जिंकले.
दुसऱ्या दिवशी त्याने राजाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मुले त्याला राजाच्या बागेत घेऊन गेली. तेथे सिंहली तरुणाने राजाला चक्क लहान बाहुल्यासारखे उचलून धरले! राजा घाबरला आणि ओरडू लागला. सिंहली तरुणाने राजाला धमकावले, "तू माझ्या मित्रांना तुरुंगात डांबले आहेस, त्यांना आधी मुक्त कर, नाहीतर तुला समुद्रात फेकून देईन!"
राजाने घाबरून आपल्या शिपायांना व्यापाऱ्यांची सुटका करण्यास सांगितले. व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडली की वादळामुळेच त्यांचे जहाज भरकटले होते. तरुणाने राजाला खात्री दिली की त्यांचे जहाज सुरक्षित बंदरात उभे आहे. राजाला आपली चूक उमजली.
निघताना व्यापारी रत्ने मिळवण्याबद्दल विचार करू लागले. तेव्हा सिंहली तरुणाने आपल्या ओळखीच्या खुजा मुलांना बोलावले आणि विचारले, "आम्हांला खेळायला तुमच्या सारख्या गोट्या हव्या आहेत. तुम्ही डोंगरावरून काही दगड आणून द्याल का?"
संध्याकाळपर्यंत मुलांनी मोठे आणि मौल्यवान मणी आणून दिले. सिंहली तरुणाने ते सर्व व्यापाऱ्यांत वाटून दिले. त्यानंतर सर्वजण जहाजात बसून आनंदाने पुढच्या प्रवासाला निघाले.