मत्सराचे फळ
अमरेन्द्रपुरचा राजा विजयकांत याची राणी कांचनमाला तिच्याकडे अतिमौल्यवान असा एक रत्नजडित कंबरपट्टा होता. एके दिवशी रूपवती कांचनमाला हा पट्टा आपल्या नाजूक कंबरेला बांधत होती, तेव्हा जुना झालेला असल्या कारणाने तो तुटला. कांचनमाला देवीला तो आवडत असे, म्हणून तो तुटल्यामुळे तिला फार वाईट वाटले. तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगून एखाद्या कुशल सोनाराकरवी कंबरपट्टा जोडून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
राजा विजयकांतने ही जबाबदारी आपल्या मंत्र्यावर सोपवली. मंत्र्याने चौकशी केली तेव्हा मणभूषण हा एक कुशल सोनार असल्याचे त्याला कळले. इतर बरेचसे सोनार हे काम आपल्याला मिळावे म्हणून मंत्र्याला भेटून गेले होते, पण मंत्र्याने या कामासाठी मणभूषणचीच निवड केली व कambarपट्टा त्याला देऊन एका आठवड्यात हे काम पूर्ण करावयास सांगितले.
मणभूषणला महाराणीच्या दागिन्यांचे काम मिळाल्याचे कळल्यामुळे मकरभूषण नावाच्या सोनाराला हेवा वाटू लागला. कारण राजमहालात डाग-दागिने घडवण्याचे काम अधून-मधून त्याला मिळत असे. मकरभूषणच्या कारागिरीबद्दल काही दिवसांपूर्वी राणी सरकारने नाक मुरडले होते, ही गोष्ट मंत्र्याच्या लक्षात होती म्हणून या वेळी कंबरपट्ट्याच्या बाबतीत त्याला कळवण्यात सुद्धा आले नव्हते.
मणभूषणने कंबरपट्टा दुरुस्त करून दोन आठवड्यांनंतर मंत्री महोदयांजवळ दिला. मध्यंतरी आठवडाभर त्याची प्रकृती बरी नसल्यामुळे काम पूर्ण करण्यास एक आठवडा उशीर झाल्याबद्दल त्याने मंत्र्याकडे माफी मागून घेतली. राणी कांचनमालेला मणभूषणची कारागिरी बघून आश्चर्य वाटले. इतक्या जुन्या कंबरपट्ट्याला त्याने नुसते दुरुस्तच केले नव्हते, तर अगदी नव्यासारखे केले होते. राजाने त्याला एक हजार वराह देऊन त्याच्या कार्यकुशलतेचा गौरव केला.
यामुळे तर मकरभूषणचा मत्सराग्नी जास्तच भडकला. एके दिवशी त्याने राजाची भेट घेतली व म्हणाला— "महाराज, मणभूषणने महाराणी सरकारचा कंबरपट्टा एका आठवड्यात परत केला नाही. याचे कारण आत्ताच कळले आहे. याची बायको एक आठवडाभर राणी सरकारचा कंबरपट्टा घालून मोठ्या दिमाखाने मिरवत होती. राणी सरकारचे दागिने एका यःकश्चित बाईने वापरणे हा अक्षम्य गुन्हा नाही काय?"
हे ऐकून राजा विजयकांत फारच संतापला, पण घाईने निर्णय न घेता मकरभूषणने सांगितलेल्या बातमीतील खरे-खोटेपणाचा पत्ता लावण्याची कामगिरी त्याने मंत्र्यावर सोपवली. दुसऱ्या दिवशी मंत्र्याने राजाला भेटून निवेदन केले— "महाराज, मणभूषण आणि त्याची बायको निरपराध आहेत हे निःसंदेह खरे आहे. मकरभूषणने केवळ मत्सरापोटी केलेल्या या खोट्या आरोपाबद्दल त्याला शंभर फटक्यांची शिक्षा देण्यात यावी."
राजाने विचारले— "मणभूषण निरपराध आहे हे कशावरून ठरवण्यात आले आहे? त्याचा निर्दोषीपणा सिद्ध करू शकाल काय?" मंत्र्याने लगेच एका शिपायाकरवी मणभूषणला निरोप पाठवला— "पत्नीला राणीच्या महाली घेऊन यावे."
थोड्याच वेळात आलेल्या मणभूषणच्या पत्नीला बघताच महाराणीनेच नव्हे, तर तिच्या दासींनी सुद्धा आपले हसू महतप्रयासाने दाबले. कारण ती अतिशय लठ्ठ होती! केवळ मत्सरापोटी मणभूषणवर खोटा आरोप लावणाऱ्या मकरभूषणला शंभर फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात आली.