महामूर्ख
हलकू एक गरीब लाकूडतोड्या होता. दुपारच्या वेळी नदीवर पाणी पिऊन तो परत फिरला, तेव्हा त्याला वाळूत काहीतरी चमकताना दिसले. ती वस्तू उचलून तो पाहू लागला.
इतक्यात तिकडून आलेल्या एका रत्नपारख्याने हलकूच्या हातातली ती वस्तू आपल्या हातात घेऊन नीट निरखून पाहिली, आणि तो म्हणाला-“हा चमकदार काचेचा तुकडा तू मला देऊन टाक. मी तुला त्याच्या बदली वीस रुपये देतो. बोल, देतोस?”
हलकूच्या मनात आलं की, हा काचेचा तुकडा नक्कीच चांगला उपयुक्त असला पाहिजे, नाहीतर हा माणूस पैसे देऊन तो माझ्याकडे का मागेल? मग त्या रत्नपारख्याला तो म्हणाला-“ना बाबा, वीस रुपये कमी वाटतात. ठीक आहे, तुम्ही तीस रुपये द्या मला.”
“अरे वेड्यासारखं काय करतोस? ह्या तुकड्याला तीस रुपये कोण देईल? बरं ठीक आहे, मी पंचवीस देतो तुला.” तो पारखी म्हणाला.
पण हलकू तीस रुपयांवरच अडून राहिला. त्यानं साफ सांगून टाकलं की-“तीस पेक्षा एक पैसाही कमी घेणार नाही मी !”
रत्नपारख्याच्या मनात आलं की, या निर्जन जंगलात याला कोण दुसरं गिऱ्हाईक भेटणार! म्हणून तो पुन्हा म्हणाला-“हे बघ, जास्त लोभीपणा करू नये! मी आता शेजारच्या गावी जाऊन येतो तासाभरात. पंचवीसपेक्षा वर एक कवडीही देणार नाही मी, अरे, तसे तर दहा रुपयेही कोणी देऊ करणार नाही याला.” आणि तो पुढे निघून गेला.
एका तासाने तो रत्नपारखी परत आला अन् हलकूला म्हणाला-“हं, केलास विचार? बघ, पंचवीस रुपये देतो मी, देऊन टाक मला तो तुकडा.”
“अरे पण मी तर विकूनही टाकला की तो शंभर रुपयात!” हलकू उत्तरला.
एकदम दचकून तो रत्नपारखी म्हणाला-“मूर्खच आहेस रे तू! तो काचेचा तुकडा नव्हता काही; चांगला दहा हजारांचा हिरा होता तो!”
“हो, मी तर अडाणी माणूस, मला कळली नाही किंमत त्याची! पण तुला तर माहीत होतं ना-की तो चांगला मूल्यवान हिरा आहे म्हणून? तेव्हा खरं पाहिलं तर तूच महामूर्ख ठरतोस ना!” तो लाकूडतोड्या हलकू म्हणाला.