Bookstruck

मानव जन्म

ब्रह्मदत्त काशी येथे राज्य करीत असताना बोधिसत्व मगध राज्यात एक गरीब दरिद्री म्हणून जन्मले आणि मगध राजाच्या पदरी नोकरी करू लागले. मगध आणि अंग देशाच्या मध्ये चंपा नदी वाहत असे. त्या नदीच्या पात्राखाली नागराज्य होते. त्या देशाच्या राजाचे नाव चांपेय असे होते. मगध आणि अंगदेश दोघांमध्ये नेहमी युद्ध होत असे. अशा एका युद्धात मगध राजाचा पराभव झाला. तो आपल्या घोड्यावर बसून पळत पळत चंपा नदीच्या किनाऱ्यावर आला. तेथे तो शत्रूच्या हाती कैद होण्याच्या स्थितीत होता. शत्रूच्या हाती मरण येण्यापेक्षा आत्महत्या करून घेणे जास्त बरे, असा विचार करून त्याने घोड्यासकट नदीत उडी घेतली. मगध राजा आपल्या घोड्यासह नदीच्या तळाखाली असलेल्या नागराजाच्या राज्यसभेत जाऊन पोहोचला. नागराज आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्याने मगध राजाचे आनंदाने स्वागत केले. मगध राजाने आपली कहाणी थोडक्यात नागराजाला सांगितली. "जे झाले त्याची आता तुम्ही फिकीर करू नका. अंग राजाशी या खेपेस तुम्ही युद्ध कराल, त्या युद्धात मी आपल्याला मदत करीन!" असे आश्वासन नागराजाने मगध राजाला दिले. वचन दिल्याप्रमाणे नागराजाने मगध राजाला सर्व प्रकारे मदत केली. अंग राजा मगध राजाच्या हाती त्या युद्धात मारला गेला. मगध राजा दोन्ही देशांचा राजा झाला. दोन्ही राज्यांची भरभराट झाली व वैभव वाढले. त्यावेळेपासून मगध राजा आणि नागराज दोघांची चांगली मैत्री जमली. मगधचा राजा दरवर्षी एकदा आपल्या नोकराचाकरांसह चंपा नदीच्या तीरावर जात असे. त्या दिवशी नागराज आपल्या लवाजम्यासह सर्व वैभवाचे प्रदर्शन करीत येऊन मगध राजाला भेटे. मगध राजा त्याला मौल्यवान व सुंदर भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार करी. मगध राजाच्या नोकराचाकरांत बोधिसत्व एक नोकर होते. ते सुद्धा दरवर्षी नागराजाचे वैभव पाहत असत. ते वारले तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर हेच वैभव नाचत होते. त्या कारणामुळे, नागराज मरण पावल्यावर, त्याच्या सातव्या दिवशी ते स्वतः नागराज म्हणून जन्मले. परंतु पूर्वजन्मी एक पुण्यात्मा असल्या कारणाने त्यांना आपले नांगरूप पाहून फार वाईट वाटले. नागराजाच्या वैभवाची इच्छा मनात असल्याकारणाने आपल्याला हा जन्म मिळाला, या गोष्टीचा विचार करून त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. त्याच वेळी सुमन नावाची एक नागकन्या तेथे आली. तिने त्यांना प्रणाम केला. सुमनला पाहताच नागराजाने आत्महत्येचा विचार बदलला आणि सुमनशी विवाह करून नागलोकांत राज्य करू लागला. परंतु काही काळ लोटल्यावर त्यांच्या मनात व्रते-अनुष्ठाने वगैरे करून पुण्य संपादन करण्याची इच्छा बळावली. म्हणून त्यांनी नागलोक सोडून पृथ्वीवर मानवलोकात जाण्याचे मनाशी ठरविले. उपवास-व्रत करण्याचे दिवस आले की, ते आपला राजवाडा सोडून एका हमरस्त्याच्या बाजूला एक मुंग्यांचे वारूळ होते, त्यावर वेटोळे घालून बसत. मनात म्हणत, "मला कोणी गरुड पक्षी उचलून नेऊ दे, किंवा कोणी गारुडी मला घेऊन जाऊ दे!" परंतु त्यांना वाटले तसे घडले नाही. रस्त्याने जाणारे-येणारे लोक वारुळाला वेटोळे करून बसलेल्या नागाला पाहून त्याला देव समजत. त्याला चंदन व फुले अर्पण करून त्याची पूजा करू लागले. जवळपास राहणाऱ्या लोकांनी त्या नागराजाच्या बिळाभोवती एक लहानसे देऊळ बांधले. निरनिराळे लोक येऊन, मूल पाहिजे म्हणून किंवा आजार जावा म्हणून नागसापासमोर नवस करू लागले. नागराज सर्व व्रताचे उपवासाचे दिवस अशा रीतीने वारुळावर घालवून, दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेला परत आपल्या घरी जात असे. एके दिवशी सुमन त्याला म्हणाली, "स्वामी, आपण पुष्कळ काळ आणि वेळ मानवलोकात जाता आहात. तो लोक धोक्याचा आहे, भयंकर आहे. तुमच्यावर काही कठीण प्रसंग आला तर मला कसे कळणार? मला कोण येऊन सांगणार?" नागराज सुमनला एका सरोवरापाशी घेऊन गेला व म्हणाला, "हे पाणी पहा. मला काही झाले तर हे पाणी गढूळ होईल. कधी गरुड पक्षाने माझ्यावर झडप टाकली तर हे पाणी नाहीसे होईल. तसे काही न होता कोणी गारुडी मला धरून घेऊन जाईल, तर हे पाणी तांबड्या रंगाचे होईल." काशीचा राहणारा एक ब्राह्मण तरुण तक्षशिलेला जाऊन तेथे वशीकरण विद्या शिकला. परत येताना त्याला नागराज वारुळावर वेटोळे करून बसलेला दिसला. लगेच त्या तरुणाने मंत्र टाकून नागराजाला वश करून घेतले. त्याला एका टोपलीत ठेवले व एका गावात घेऊन जाऊन तेथे सापाचा खेळ दाखविला. तो खेळ पाहायला आलेले गावकरी खेळ पाहून खूप खुश झाले आणि त्यांनी त्या ब्राह्मण तरुणाला पैसे आणि मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या. त्या सामान्याशा खेड्यात इतके पैसे मिळाले तर शहरात खेळ दाखविला तर खूपच पैसे मिळतील, असा लोभ त्या तरुणाच्या मनात उपजला. तो सापाला बरोबर घेऊन काशीला निघाला. तो एका गाडीतून जात होता. काशीला तो एका महिन्याने पोहचला. तो महिनाभर नागराजाला कडक उपवास घडला. ब्राह्मण तरुणाने सापाला खायला बेडूक दिले, पण सापाने त्यांच्याकडे तोंड फिरवून पाहिले सुद्धा नाही. "मी आहार घेत नाही तोपर्यंत मला या टोपलीतून सुटका मिळणार नाही," ही गोष्ट नागराजाला चांगली कळून चुकली होती. त्या ब्राह्मण तरुणाने काशी नगराजवळच्या एका गावात सापाचे पुष्कळ खेळ करून खूप पैसा मिळविला. या सापाच्या खेळाच्या बातम्या काशी राजाच्या कानापर्यंत पोहोचल्या. त्याने त्या ब्राह्मण तरुणाला बोलावून आपल्या करमणुकीसाठी सापाचा खेळ करायला सांगितले. मध्यंतरी नागलोकात सुमनला एक महिनाभर नागराज न आल्याने शंका आली. त्याला काही अपाय तर झाला नाही ना, अशी भीती तिला वाटली. खरे काय ते पाहण्यासाठी ती सरोवराच्या काठी आली. सरोवरातील पाणी तांबडेलाल झाले होते. कोणीतरी मांत्रिक नागराजाला धरून घेऊन गेला असावा, हे ओळखून ती पतीच्या शोधार्थ निघाली. वाटेत चौकशी करीत ती शेवटी काशीला आली. ती तिथे पोहोचली तेव्हा नागसापाचा खेळ चालू होता. काशीचा राजा व प्रजा तो खेळ पाहत करमणूक करून घेत होते. आपल्या पत्नीला पाहून नागराजाने लाजून खेळणे बंद केले आणि चटदिशी टोपलीत जाऊन बसला. सुमनने मानवी शरीर धारण करून राजाकडे जाऊन विनंती केली, "मला पतीभिक्षा देण्याची कृपा करावी!" इतक्यात नागसाप सुद्धा टोपलीतून सरपटत बाहेर आला आणि सर्वजण पाहत असताना एक सुंदर मानवी पुरुष म्हणून प्रगट झाला. काशीराजाने त्या नागदंपतीला पाहिले व खुश होऊन त्यांना आपले अतिथी म्हणून आठवडाभर ठेवून घेतले. नंतर तो राजा नागलोकातील नागराजासह स्वतः त्या नागदंपतीबरोबर नागलोकात गेला. नागलोकातील ऐश्वर्य, सौंदर्य आणि वैभव पाहून काशीराजाला अतीव आश्चर्य वाटले. "इतक्या वैभवशाली आणि सुंदर राजवाड्यात तुम्ही दोघे राहत असताना, तुम्ही मुंग्यांच्या वारुळावर वेटोळे घालून का बसला होतात? त्याचे कारण काय?" काशीराजाने विचारले. "राजा, येथे इतके वैभव असूनही जन्म-मरणातून मुक्त होण्याची संधी केवळ तुमच्या मानव लोकातच शक्य आहे," अशा शब्दांत नागराजाने उत्तर दिले. ते ऐकून काशी राजाला परमानंद झाला. तो आपल्या राज्यात परत गेला तेव्हा नागराजाने त्याला असंख्य बहुमोल वस्तू देऊन निरोप दिला.