मायावी मांत्रिक
एका खेडेगावात दोघे भाऊ राहत असत. ते फार गरीब होते. मोठा भाऊ अण्णा खूप मेहनत करी, परंतु भोळा होता. धाकटा भाऊ लहानू हुशार होता. त्याला सर्व कामे करता येत असत.
ते दोघे काही काम मिळेल या आशेने राजधानीच्या गावी आले. दुसऱ्या दिवशी राजाकडे जाऊन काहीतरी काम मागून घ्यावे असा विचार करून अण्णा सकाळी लवकर उठून निघाला.
"संध्याकाळ व्हायच्या आत घरी ये, बरं का!" लहानूने अण्णाला सावध करण्यासाठी सांगितले.
अण्णा आला तेव्हा राजा बागेत फिरत होता. त्याने अण्णाला विचारले - "कोण रे बाबा, तू? काय पाहिजे तुला?"
अण्णा हात जोडून नमस्कार करून म्हणाला - "महाराज! मी व माझा धाकटा भाऊ दोघे गरीब आहोत, काही काम मिळाले तर आपल्या पायाशी पडून राहू?"
"तुला काम देईन, परंतु काळजीपूर्वक जबाबदारी ओळखून करशील का?" राजाने विचारले.
"करीन महाराज!" अण्णा म्हणाला.
राजा त्याला राजवाड्यात बोलावून घेऊन गेला. बकरीचे एक सुंदर कोकरू दाखवीत म्हणाला - "या कोकराला रानात चरायला घेऊन जा. सूर्यास्त व्हायच्या आत घरी परत येऊन हे कोकरू माझ्याकडे आणून पोचते कर. एक गोष्ट लक्षात ठेव, पूर्वेकडे एक टेकडी आहे, तिच्या पलीकडे जाऊ नकोस. मी सांगितल्याप्रमाणे वागला नाहीस तर तुला मी आयुष्यभर आठवेल अशी कडक शिक्षा करीन."
प्रत्येक गोष्टीला मोठ्याने डोके हलवून होकार देत राजाचे कोकरू एका खाकेत धरून अण्णा रानात गेला. रानात खाली उतरविल्याबरोबर ते कोकरू उड्या मारीत धावू लागले. अण्णा त्याच्या पाठीमागून धावत गेला. दोघे बरेच दूर धावत गेले.
दुपारी अण्णा खायला बसला तेव्हा ते कोकरू सुद्धा जवळ आले. अण्णाने आपल्याच खाण्यातले अर्धे त्या कोकराला खायला घातले. त्यानंतर दोघांची पळापळ पुन्हा सुरू झाली. दोघे पूर्वेकडच्या टेकडीवर येऊन पोहोचले. त्या टेकडीवर पुष्कळ फळ-झाडे होती. झाडांवर खूप फळे लागली होती.
राजाने बजावून सांगितलेली गोष्ट अण्णा विसरला आणि झाडावर चढून फळे खाऊ लागला. फळे खाल्ल्यामुळे त्याचा हात इतका चिकट झाला की त्याला हात स्वच्छ धुवावासा वाटला. टेकडीपलीकडे त्याला एक झोपडी दिसली. त्याने कोकराला उचलून घेतले आणि त्या झोपडीच्या बाजूला चालू लागला. कोकरू पाय आपटत मोठमोठ्याने ओरडू लागले. परंतु अण्णाला समजूतच कमी होती, म्हणून कोकराच्या ओरडण्याचा अर्थ न कळल्याने तो सरळ त्या झोपडीजवळ आला.
त्या झोपडीजवळ एक भयंकर आकृती असलेला मनुष्य बसलेला होता. त्याचे डोके टक्कल पडलेले गुळगुळीत होते. काचेचे डोळे असावेत की काय असे वाटे. त्याला चिटुकली दाढी होती. त्याच्याजवळ एका बाजूला बकऱ्याच्या मांसाचे तुकडे करून ठेवलेले होते. ते तुकडे भाजण्यासाठी एक लोखंडी सळई त्याच्या हातात होती. तो शेगडी पेटविण्याच्या खटपटीत होता.
त्याने अण्णाला पाहिले व म्हणाला - "ये रे पोरा! शेगडी पेटव जरा."
"काळोख पडण्याच्या आधी मी परत गेले पाहिजे. येथे पाणी मिळेल म्हणून आलो होतो." अण्णा म्हणाला. कोकरू आपले जोरजोराने पाय आपटत मोठ्याने ओरडत होते.
तो भयंकर आकृतीवाला मनुष्य कोकराचे कान पिळवटत म्हणाला - "काय ग, अजून तुझी घमंड जिरली नाही वाटतं?"
नंतर अण्णाला म्हणाला - "हे कोकरू फार घमेंडखोर आहे. ते तुझे नाही ऐकणार. तू त्या कोकराला त्या कोठडीत टाक आणि दार लावून शेगडी पेटव येऊन. मी तुला पाणी आणून देतो." असे सांगून त्याने अण्णाला एक कोठडी बोटाने दाखविली आणि स्वतः झोपडीत गेला.
अण्णाने नाइलाजाने त्या कोकराला कोठडीत बंद करून ठेवले आणि शेगडी पेटवायला बसला. त्याला ते जमले नाही. ती पेटली तोपर्यंत चांगला काळोख पडू लागला होता. तेव्हा तो भयंकर आकृतीवाला मनुष्य एक तपेली भरून पाणी घेऊन आला. अण्णाने घाईघाईने हात धुतले आणि कोकराला उचलून लवकर घरी जावे या विचाराने कोठडीजवळ जाऊन दार उघडले. परंतु आत कोकरू नव्हते. एक विकृत आकृतीची बाई होती. तिला पाहून अण्णा भ्याला. "बाप रे भूत!" असा ओरडत पळून गेला.
तो रात्री फार उशिरा राजवाड्यात आला आणि त्याने राजाला घडलेले सर्व वृत्त सांगितले. म्हणाला - "अहो, ते सामान्य कोकरू नाही. भूत आहे भूत!"
सर्व ऐकून घेतल्यावर राजाला भयंकर राग आला. त्याने नोकरांना बोलावून अण्णाला अंधारकोठडीत टाकायला सांगितले. त्याप्रमाणे नोकरांनी अण्णाला अंधारकोठडीत टाकून कोठडीचे दार बंद केले.
रात्र झाली तरी अण्णा परत आला नाही तेव्हा लहानू राजाकडे गेला. तो अण्णाचाच धाकटा भाऊ आहे हे कळल्यावर राजाला त्याचादेखील फार राग आला.
राजा जे म्हणाला ते शांतपणे सहन करून लहानूने जे घडले ते सर्व ऐकले व म्हणाला - "महाराज! यात काहीतरी गुपित आहे. ते मात्र मला कळले नाही. ते तुम्ही मला सांगू शकल्यास मी तुमच्या कोकराला परत आणून देईन आणि आपल्या अण्णाला सोडवून घेऊन जाईन."
त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून राजाला तो हुशार असला पाहिजे असे वाटले. तो त्याला आपल्या एकांताच्या खोलीत बोलावून घेऊन गेला आणि त्याने त्या कोकराचे गुपित काय ते सांगितले.
राजाला फार उशिरा एक मुलगी झाली होती. त्याने त्या मुलीला मुलासारखेच प्रेमाने वाढविले होते. तिला शिकारीला रानात जायचे म्हणजे फार आनंद होई. राजाच्या बरोबर ती शिकारीला जात असे.
एकदा राजा व राजकुमारी शिकार करीत फार दूर निघून गेली, त्यांना पूर्वेकडे एक टेकडी दिसली. त्यांचे शिपाई वगैरे मागे कोठेतरी राहून गेले होते. दोघे टेकडीपलीकडे एक झोपडी दिसली तेथे प्यायला पाणी मिळेल म्हणून गेले.
झोपडीच्या बाहेर एक भयंकर आकृती असलेला मनुष्य बसलेला होता. तो सळईत बकऱ्याच्या मांसाचे तुकडे खुपसून ते शेगडीवर भाजून खात होता. राजकुमारीला बकऱ्याचे मांस पाहूनच घृणा वाटली, त्यात ते मांस भाजले जात असताना जो घाणेरडा वास येत होता त्यामुळे तिला ओकारी येते की काय असे वाटू लागले.
"इकडे कोठे प्यायला पाणी मिळेल का हो?" राजाने त्याला विचारले.
तो काही बोलला नाही. आत जाऊन एका तांब्यात पाणी आणून देत त्याने विचारले - "तुझी मुलगी नक्षत्रासारखी आहे. मला का नाही देऊन टाकीत?"
राजाने लगेच तलवार उपसली.
"घाणेरडे मांस खाणारा तू कोणी राक्षस दिसतो आहेस! माझ्यावर का तुझी नजर?" राजकन्येने विचारले.
ते ऐकून त्याचे काचेसारखे डोळे लालभडक झाले. त्याने बकऱ्याचे मांस भाजायची सळई उचलून तिच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणाला - "तुला बकऱ्याचे मांस म्हणजे घृणा वाटते, नाही का? तर तू आजपासून दिवसा बकरी होऊन राहशील आणि मला राक्षस म्हटलेस म्हणून रात्री माझ्याहून भयंकर रूप असलेले एक भूत होऊन राहशील."
तो कोणी भयंकर मांत्रिक होता. राजकन्या पाहता पाहता कोकरू झाली. त्या दिवसापासून ती दिवसा कोकरू आणि रात्री एक भयंकर भूत होऊ लागली. रात्री तिला कोणी पाहू नये म्हणून राजा या गोष्टीची काळजी बाळगीत असे. राजकुमारीचे लग्नाचे वय होते. परंतु त्या मांत्रिकाच्या दुष्टपणामुळे ते अशक्य झाले. त्या मांत्रिकाची सर्व शक्ती त्याच्या दाढीत आणि त्या सळईत होती.
लहानूने राजाच्या तोंडी ते सर्व ऐकून घेतले आणि विचार करून म्हणाला - "महाराज! राजकन्येला आजच्या रात्री काहीही त्रास होणार नाही. ती मनुष्यरूपातच राहील. तिला सकाळपर्यंत वाचविले नाही तर मात्र धोका आहे. मला एक हृष्टपुष्ट बोकड आणि थोडी राळ द्या. मी काय करायचे ते करतो."
राजाने दिलेला बकरा आणि राळ घेऊन लहानू निघाला.
मांत्रिक आपल्या झोपडीसमोर एका हाताने मांस भाजून खात होता आणि दुसऱ्या हाताने दारू पीत होता. लहानू बोकडाला घेऊन त्याच्यासमोर उभा राहत म्हणाला - "मामा! मांसाचा काय घाणेरडा वास येतो आहे हो!"
"ये रे ये भाच्या! कोठे मिळाला बुवा तुला बोकड? चांगला दिसतो आहे की रे!" मांत्रिक म्हणाला.
"तुझ्यासाठीच तर घेऊन आलो आहे मामा!" लहानू म्हणाला.
"तर मग उशीर का? काप त्याला. हे मांस अगदी बेचव आहे! हा चांगला संकर जातीचा माजलेला बोकड दिसतो आहे." मांत्रिक म्हणाला.
"ते बरोबर नाही मामा! बोकड कोणत्याही जातीचा असला म्हणून काय झाले? चव एकच. तुला भाजताच येत नाही. मी दाखवितो कसे भाजायचे ते!" लहानू म्हणाला.
"पाहू तर दे, तू कसे भाजतोस ते." असे म्हणत मांत्रिकाने आपली मांस भाजायची सळई लहानूच्या हातात दिली.
लहानूने मांसाचा एक तुकडा सळईत खुपसून भाजायला सुरुवात केली. थोड्याच वेळात छान वास येऊ लागला.
"भाच्या! खरंच की रे तुला छान भाजता येते. मांसाचा वास असा असावा लागतो. तो तुकडा टाक इकडे!" मांत्रिक म्हणाला.
मांत्रिकाला लहानू म्हणाला - "मामा! अशी घाई करू नकोस. आणखी थोडे भाजले पाहिजे. जवळ येऊन वाकून पहा, कसा खमंग वास येतो आहे तो." लहानू म्हणाला.
मांत्रिक जवळ येऊन शेगडीवर डोळे मिटून वाकून वास घेऊ लागला. त्याच वेळी लहानूने विस्तवावर राळीची पूड टाकली. त्याबरोबर मांत्रिकाची दाढी क्षणार्धात जळून गेली. लहानूने तत्क्षण ती सळई त्याच्या डोक्यावर ठेवून म्हटले - "बकरी होऊन चालता हो, इकडून!"
मांत्रिक लगेच बकरी होऊन 'बँबँ', असा ओरडत रानात निघून गेला.
मांत्रिकाची शक्तीच नष्ट झाल्यामुळे राजकन्येला स्वतःचे रूप आले. तिने लहानूचे आभार मानले.
लहानूने मांत्रिकाची सळई झोपडीत फेकून शेगडीतल्या विस्तवाने झोपडीला आग लावली आणि राजकन्येला घेऊन उजाडण्यापूर्वी राजवाड्यात परत आला.
कित्येक दिवसांनी आपली मुलगी मूळ स्वरूपात परतलेली पाहून राजाला परमानंद झाला. त्याच्या डोळ्यांना आनंदाश्रू आले. तिला पुन्हा मनुष्यरूप मिळवून देणाऱ्याशीच लग्न करणार असे राजकन्येने ठरविले होते. तिच्या इच्छेप्रमाणे राजाने लहानूशी राजकन्येचा विवाह करून देऊन त्यालाच आपला वारस करून घेतले. लहानूने अण्णाला सोडवून त्याला आपल्याबरोबर राजवाड्यातच ठेवून घेतले.