माशांची शिकार
चांद काही कामासाठी शहराकडे निघाला होता. वाटेत तलावाच्या किनारी त्याला काही विचित्र दृश्य दिसलं. दोन माणसं हातात आरसे घेऊन उभी होती. त्यांनी आरसे अशा प्रकारे धरले होते की सूर्याचे किरण त्यांच्यावर पडून कवडसा तळ्याच्या पाण्यावर पडावा.
चांद त्यांच्याजवळ गेला. त्याच्या असं लक्षात आलं की दोघांपैकी एक माणूस तर त्याच्याच गावातला कृष्णा नावाचा तरुण आहे; अन् दुसऱ्या माणसाच्या पोशाखावरून तो कोणी शहरी बाबू असावा असं वाटत होतं. चांदानं दोघांना विचारलं, "हे तर काही विचित्रच वाटतंय! काय करताय तुम्ही?"
शहरी बाबू म्हणाला, "हं! अडाण्याला सर्व विचित्रच वाटतं. आम्ही इथे तलावाकाठी उभे आहोत; अन् खाली दिसतोय, तो आहे तलाव! आम्ही इथं मासे पकडत आहोत."
आपलं आश्चर्य प्रकट करत चांद म्हणाला, "पण मी आजपर्यन्त तुमच्या प्रकारानं मासे पकडलेले पाहिले नाहीत कधी."
"ही मासे पकडायची एक कला आहे. ती जाणणाऱ्याला आपले हातपाय ओलेही करावे लागत नाहीत की चिखल पाण्यानं बरबटून घ्यावे लागत नाहीत." शहरी बाबू रुबाब दाखवत म्हणाला.
बाबू गंभीर आवाजात पुढे म्हणाला, "आमच्या वाडवडलांनी ही कला आम्हाला शिकवलीय. पण तुझ्याकडून फी घेतल्यावाचून मी फुकट का शिकवावी तुला? बघ याच्याकडे. तळ्याच्या काठी उभं राहूनच यानं ती विद्या शिकून घेतलीय; तुला सुद्धा ही विद्या शिकायची असेल, तर पन्नास रुपये दे अन् ही कला शिकून घे."
चांदानं ताबडतोब खिशातनं पैसे काढून त्यातून पन्नास रुपये मोजून बाबूच्या हातावर ठेवले. ते घेऊन तो चांदला म्हणाला, "सगळं रहस्य तर या आरशातच लपलेलं आहे. आमच्यासारखा हालचाल न करता आरसा घेऊन उभा राहा इथं. पण एक गोष्ट लक्षात ठेव की, सूर्याचे किरण आरशावर पडून, त्यांचा कवडसा फक्त पाण्यावर एकाच जागी स्थिर राहिला पाहिजे. त्या किरणांची उष्णता सहन न होऊन मासे थकून पाण्याच्या वर येतील. फक्त ते हातांनी उचलून घ्यायचं तेवढं आपलं काम आहे."
काही संशय येऊन चांदानं त्याला विचारलं, "आतापर्यन्त अशा तऱ्हेनं किती मासे मिळाले तुला?"
यावर हसून शहरी बाबू उत्तरला, "तुला धरून हा सहावा मासा गळाला लागला माझ्या!"
आता चांद "धोका! दगा!" असं ओरडू लागला.
"ओरडून काही उपयोग नाही आता. तुझ्यासारखी आणखी एकाद्या माशाची शिकार मिळत नाही, तोवर तुला इथे आरसा पकडून उभं राहायला हवं. तू तसं केलंस, तर मी तुझे पंचवीस रुपये परत करीन. आहे कबूल?" असं म्हणत त्यानं त्यातले पंचवीस रुपये कृष्णाच्या हातावर ठेवले, अन् त्याची सुटका केली.
नंतर अर्धा तास निघून गेला, अन् त्यांना असं दिसलं की, कृष्णा आपल्याबरोबर हातात मजबूत लाठ्या पकडलेल्या चार माणसांना घेऊन गावातून तळ्याकडेच येत आहे!
त्यांना पाहून प्रथम तर शहरी बाबू खूश झाला, पण नंतर त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली. तो चांदला विचारू लागला, "कृष्णानं माझ्याकडून विद्या शिकून घेतली. आता तो आणखी चार माणसांना घेऊन येतो आहे, हे तर ठीकच आहे. पण त्यांनी हातात लाठ्या का आणल्या आहेत, हे नाही समजत मला?"
जोराने हसत चांद म्हणाला, "लाठ्यांनी शिकार कशी करावी हे तुला शिकवायला येत आहेत ते! मला तर दयाच येतेय तुझी! हातपाय तुटल्यावर तू शहरात कसा जाऊ शकशील, याची काळजीच वाटतेय मला!"
शहरी बाबूनं लगेच आपल्या खिशातले सारे पैसे चांदच्या हातात कोंबले अन् मागे वळूनही न पहाता त्यानं शहराच्या दिशेनं पोबारा केला!