All Marathi Stories
मुसीबत दानपत्र
एकदा गोवळकोंड्याचा नवाब शिकारीला गेला असतां एका हरणाचा पाठलाग करीत दाट अरण्यात पोहचला. त्याचे सर्व अनुयायी मागे राहून गेले.
दुपारची वेळ होती. ऊन कडक पडले होते. नवाबाल फार तहान लागली. परंतु जवळपास कोठे पाणी दिसेना. सुदैवाने त्याला आकाशात एका जागी पुष्कळ पक्षी उडत असलेले दिसले. त्यावरून जवळपास नक्कीच पाणी मिळेल या आशेने नवाब त्या दिशेला निघाला. लवकरच त्याला एक देऊळ दिसले. देवळाजवळ नक्कीच तलाव किंवा विहीर असणार असे वाटून त्याने देवाचे आभार मानले. म्हणाला- "अल्ला! तुझी मेहेर नजर असल्यास कोणी पाण्यावाचून कधी मरेल का?"
देवळाशेजारी एक मोठे वडाचे झाड होते. थंडगार सावलीत त्याने घोड्याला बांधून ठेवले. जवळच नारळाच्या पाण्यासारखे गोड पाणी असलेले एक कुंड होते. नबाबाने हात पाय धुवून पाणी पिऊन घेतले. नंतर घोड्याला पाणी पाजून झाडाखाली विश्रांती घेत पडला.
त्याची झोप मोडली तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती. तो उठून उभा राहिला. किती काळोख पडला? एवढी का झोप मला लागली होती, असा विचार करीत त्याने कुंडावर जाऊन हातपाय धुवून घेतले आणि पाणी पिऊन पुन्हा झाडाखाली येऊन बसला. त्याने नमाज प्रार्थना केली आणि आज उपाशीच झोपावे लागणार, असा विचार करीत असताना दूर त्याला एक दिवा दिसला. तो दिवा हळूहळू जवळ येत आहे असेदेखील त्याला वाटले. तो विचार त्याच्या मनात येताच त्याला थोडी भीतीदेखील वाटली. परंतु तो डोळे मिटून स्वस्थ पडून राहिला.
थोड्या वेळाने त्या देवळाचा पुजारी तेथे आला. नवाब एकटा उपाशी पडला आहे हे कळल्यावर पुजाऱ्याने देवळातून थोडेसे सातूचे पीठ, गुळ आणि पाणी घालून नबाबाला खायला आणून दिले.
नबाबाने देवाच्या पावल्यासारखे झाले.
दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याचा निरोप घेऊन निघतांना नबाबाने त्याला कागदावर एक दानपत्र लिहून दिले. त्यात पुजाऱ्याला जमीन दान केल्याचा उल्लेख होता. नंतर नवाब निघून गेला.
ती गोष्ट त्या जमिनीला लागून असलेल्या जमिनीच्या मालकाला कळी. ती जमीन गिळता आली तर गिळावी हा हेतू त्याच्या मनात पुष्कळ दिवसांपासून होता. परंतु ती जमीन एका भाटाला फुकटात मिळालेली त्याला बघविली नाही. तो त्या पुजाऱ्याकडे गेला आणि नबाबाने लिहून दिलेले दानपत्र त्याच्याकडे मागितले. पुजाऱ्याने नकार दिला.
"माझ्या तोंडाचा घास तू ओढून घेणार होय? पाहतो तुला तो कसा पचतो ते!" असे म्हणत त्याने त्या पुजाऱ्याला नोकरांमार्फत त्या झाडाला बांधून खूप बडवून काढले. तेव्हां पुजाऱ्याने दानपत्र मागवून त्या दुष्ट माणसाला दिले.
त्या दुष्टाने त्या दानपत्राचे फाडून तुकडे केले आणि पुजाऱ्याला देत म्हणाला- "तूच हे खाऊन गिळून टाक, नाही तर तुला या कागदाच्या तुकड्याबरोबर कच्चा जाळून टाकीन."
अगदी नाइलाज झाल्यामुळे पुजाऱ्याने चघळून ते सर्व तुकडे गिळले.
पुढे काही दिवसांनी नवाब पुन्हा त्या वाटेने जात असता त्या देवळाजवळ आला. देवळाजवळच एक झोपडे दिसले. त्यातून पुजाऱ्याची मुले बाहेर येऊन उभी राहिली. मुलांची हाडे बाहेर निघाली होती आणि अंगावरचे सर्व कपडे फाटलेले होते.
त्यांना पाहून नबाबाला आश्चर्य वाटले. त्याने दिलेल्या भूमीवर यांचा उदरनिर्वाह कां चालू नये! त्यांना त्या जमिनीवरची प्राप्ती पुरत नाही की काय?
तितक्यात लाकडे आणायला गेलेला पुजारी घरी परत आला. नवाब आला असल्याचे कळल्यावर तो त्याला जाऊन भेटला आणि देवळात जाऊन त्याने सातूचे पीठ कालवून खायला आणून दिले.
नबाबाने सातूचे पीठ खाल्ले आणि त्याची वाखाणणी करीत म्हणाला- "एक कागद घेऊन या, आणखी जमीन दान म्हणून लिहून देतो."
पुजारी म्हणाला- "सरकार! एक विनंती करावी म्हणतो. कागदावर आपण जे इनाम लिहून देणार आहात ते मला नको आहे."
"तर मग ताम्रपत्रावर लिहून देतो." नवाब म्हणाला.
"सरकार! तेदेखील नको मला. ते चावून खाणे तर जास्तच कठीण! ते पुरी..."
"अहो भटजी! बेडबीड लागले आहे का तुम्हांला? इनामाचे दानपत्र खाणार का आहात तुम्ही!" नबाबाने विचारले.
"होय सरकार! खावेच लागणार!" पुजारी म्हणाला.
"तुम्ही वेड्यासारखं बोलता आहां. तुम्ही मी लिहून दिलेले दानपत्र मामलेदाराला दाखविले तर तो तुम्हांला ती जमीन देईल. म्हणजे मी लिहून दिलेली जमीन अद्याप तुम्हांला मिळाली नाही तर? होय ना?" नबाबाने विचारले.
पुजाऱ्याने घडलेले सर्व वृत्त सांगितले. ते सर्व कळल्यावर नबाबाला भयंकर संताप आला. त्याने त्या दुष्ट माणसाला बोलावून नोकरांमार्फत त्याला फटके देवविले. नंतर मामलेदाराला बोलावून दानपत्रात लिहून दिलेली जमीन पुजाऱ्याला देवविली. त्यानंतर पुजाऱ्याचे पुढील आयुष्य आनंदाने गेले.