मूर्खपणा अंगाशी आला
मूर्खपणा अंगाशी आला
एका खेड्यांत शंभू नावाचा एक गरीब युवक राहत होता. त्याचे कोणी सगे-सोयरे नव्हते, शिवाय स्वतःचे पोट भरण्यासाठी कामधंदा करण्याची पण त्याच्या अंगी कुवत नव्हती.
एक दिवस गावातील म्हातारी मंडळी, एका पिंपळाच्या झाडाखाली रात्रीच्या वेळी जमली. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करीत होती. गप्पा मारता मारता त्या गरीब युवकाविषयी पण चर्चा सुरू झाली. त्या सर्वांनी ठरविले की याला काही तरी उद्योग मिळवून देऊ त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी शंभूला बोलावून सांगितले की रोज प्रत्येक घरी एक कावड पाणी भरावयाचे. शंभर घरी रोज पाणी भरले पाहिजे. याबद्दल रोज कोणीतरी जेवावयास वाढेल आणि सर्व देवू मिळून तुला एक घर पण बांधून देऊ. शंभू ठरल्याप्रमाणे त्या शंभर घरी कावडीने पाणी भरू लागला, यांत त्याचा संबंध दिवस जाऊ लागला.
अशाप्रकारे पुष्कळ दिवस झाले. एके दिवशी रात्री ते सर्व म्हातारे पिंपळाच्या पारावर बसून गप्पागोष्टी करीत होते. यावेळी शंभू दूर बसून ह्या गप्पा ऐकत होता. त्या गावातील जुन्या शिवालया विषयी गप्पा चालल्या होत्या. एक म्हातारा म्हणाला की या शिवालयांत एक शिलालेख आहे व त्यावर काही वाक्ये लिहिलेली आहेत. ती वाक्ये म्हणजे— "जो कोणी ह्या शिवलिंगावर एकशेपन्नास घागरी पाण्याचा अभिषेक करील, तो राजा होईल." त्या म्हाताऱ्यांपैकी एकाने म्हटले की ही शिलालेखाची गोष्ट अगदी खोटी आहे. निव्वळ लोकांची दिशाभूल करणारी आहे. तो थट्टेने म्हणाला— "जर दीडशे घागरी पाण्याचा अभिषेक करून कोणी राजा होत असेल तर प्रत्येक जण राजा होण्याचा प्रयत्न करील व राजा होईल."
हा सर्व विवाद शंभूने ऐकला. त्याला रात्री झोप आली नाही. तो विचार करू लागला— "हा शिलालेख खोटा कसा असू शकेल? या म्हाताऱ्यांच्या अंगी दीडशे घागरी पाणी आणून अभिषेक करण्याची ताकद नाही म्हणून हे लोक असे म्हणत आहेत व या शिलालेखाची थट्टा करीत आहेत." सरते शेवटी शंभूने विचार केला— "माझा धंदाच पाणी भरण्याचा आहे. तर मग आणखी दीडशे घागरी भरून पाणी आणून शिवलिंगावर अभिषेक करणे हे अवघड काम नाही. शिवाय अभिषेक केल्याने राजा होईन नाहीतर किमान शंकराची सेवा केल्याबद्दलचे पुण्य तर मिळेल." असा विचार करून शंभूने अभिषेक करण्याचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी सर्व शंभर घागरी पाणी भरल्यानंतर शंभूने शिवलिंगावर अभिषेक करण्यास सुरवात केली. एकशे चाळीस घागरी पाण्याचा अभिषेक केल्यावर त्याच्या डोळ्या समोर काजवे चमकू लागले. थकल्यामुळे पाय लटपटू लागले. तरी सुद्धा त्याने निर्धार केला की आता फक्त दहाच घागरी पाण्याचा अभिषेक शिल्लक राहिला आहे, तो पण पुरा करू या, जरा सावकाशपणे केले म्हणजे झाले. परंतु पुढील आठ घागरी पाणी आणी आणी पर्यंत तो चांगलाच दमला, धापा टाकीत त्याने एकदां शिवलिंगाकडे पाहिले आणि पुन्हा स्वतःला सावरू लागला.
तो विचार करू लागला— "एकशे अठ्ठेचाळीस घागरी पाण्याचा अभिषेक केल्यानंतर सुद्धां त्याला राजा होण्याची काहीच लक्षणे दिसली नाहीत. तेव्हां त्याला वाटले की ते म्हातारे जे म्हणत होते शिलालेख खोटा आहे, ते खरे असावे. तरी पण उरलेल्या दोन घागरी पाणी आणून अभिषेक पुरा करूया. यातून काही झाले तर झाले नाहीतर हे शिवलिंग फुटून जाईल. यावर गावातील लोक मला शिव्या देवोत किंवा ठार करोत. असा विचार मनात आणून रागाच्या भरात दोन घागरी पाणी आणून त्याने शिवलिंगावर ओतले.
शिवलिंगावर दोन घागरी पाणी ओतल्याबरोबर शिवलिंगाचे दोन भाग झाले व मधून एक त्रिशूळधारी शंकर प्रकट झाला. शंभू हे पाहून थरथर कापू लागला. शंकराने रागाच्या भरात शंभूस धमकाविले. "अरे शंभू, तू मूर्ख आहेस. अगदी बुद्धू आहेस. बुद्धिवंताचे काम आहे की जे काही काम करावयाचे ते श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावनेने करावे आणि त्यानंतर फळाची आशा करावी, परंतु तू आपल्या मूर्खपणामुळे केलेल्या कामाचे फळ मिळवू शकला नाहीस. जर उरलेल्या दोन घागरी पाणी भक्तिपूर्वक ओतल्या असत्या तर खात्रीने राजा झाला असतास! आतां तू येथून चुपचाप चालता हो."
हे सर्व झाल्यावर शंभू शरमेने मान खाली घालून शिवालयातून बाहेर जाणार होता, तेवढ्यात तेथील शिवलिंग व शिलालेख अदृश्य झाले. शंभूने गावातील त्या म्हाताऱ्यांना ही गोष्ट सांगितली. त्यांना आश्चर्य वाटले. सर्व शिवालयाकडे येऊन पहातात तर काय खरोखरच शंभूने सांगितल्याप्रमाणे शिवलिंग व शिलालेख नाहीसे झालेले त्यांना दिसले.