Bookstruck

मृत्यूच्या दरीच्या शोधात (नागालँडची लोककथा)

मणिपूरची राजकन्या मधुवंती ही एक रूपवती राजकुमारी होती. साहजिकच, तिचे पाणिग्रहण करायला अनेक तरुण उत्सुक होते. पण काही ना काही कारण सांगून ती प्रत्येकाला नकार देत होती. तिच्या आईवडिलांची ती फार लाडकी होती, आणि त्यांना तर तिच्या लग्नाची घाई होती. मरण्यापूर्वी एखादे गोजिरवाणे नातवंड खेळावे, अशी त्यांची इच्छा होती. मोनीसिंग हा एका टोळीच्या सरदाराचा मुलगा मधुवंतीला भेटला. तिने त्याची मागणी नाकारली नाही. तिला तो देखणा, दयाळू व सज्जन वाटला. राजाराणीला तो राजवंशतला नव्हता तरीही आनंद वाटला. विवाहाचा मुहूर्त ठरला आणि साऱ्या राज्यात तीन दिवस आनंदोत्सव चालू होता. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी अतिशय वाईट गोष्ट घडली. नेहमीप्रमाणे राजकन्या नदीवर स्नान करायला गेली आणि नदीतून ती बाहेर आलीच नाही. तिच्या दासी रडत-रडत राजवाड्यात परत गेल्या. संबंध राज्य दुःखात बुडाले. मधुवंतीच्या आईवडिलांना आठवले की तिच्या लग्नाअगोदर ती त्या शापातून मुक्त झाली नव्हती, आणि हे लक्षात घेऊन बहुधा ती प्रत्येक तरुणाला नकार देत असावी. मोनीसिंगशी लग्न ठरवण्याच्या वेळी त्या शापाची कालमर्यादा ती विसरली असावी असे त्यांना वाटले. तरुण उमदा मोनीसिंग तर वेडापिसा झाला होता. तिचे शव नदीतून वर येईल आणि तिचे शेवटचे दर्शन घेता येईल या आशेने तो काही दिवस राजधानीत थांबला होता. नंतर तो त्याच्या आईवडिलाकडे परत जाणार होता. राजा व राणीने तर त्याला दत्तक घेऊन आपला वारस बनवण्याचे ठरवले होते. पण मोनीसिंगाने ही सूचना काही मान्य केली नाही. तो त्यांना म्हणाला की जर राजकन्येला मृत्यूच्या दरीत नेले असेल, तर तो तिथे जाऊन तिला परत घेऊन येईल. राजा राणीने आश्चर्याने आणि साशंक नजरेने एकमेकांकडे बघितले. अशी एखादी दरी अस्तित्वात होती असं कोण खात्रीने सांगू शकलं असतं? आणि तिथे जायची वाट कुणाला माहीत होती? मरण पावलेली व्यक्ती परत जिवंत येऊ शकेल? पण मोनीसिंगचे म्हणणे होते की तिचे मृत शरीर काही दिसले नव्हते, तेव्हा ती कुठेतरी जिवंत असेल, आणि मृत्यूची दरी हीच एक शक्यता होती. आणि मोनीसिंग तिथे जायला तयार झाला होता. राजाराणीने जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला. मोनीसिंग त्याच्या आईवडिलांना भेटायला गेलाच नाही, कारण त्यांनी त्याला मृत्यूच्या दरीचा शोध घ्यायला जायची अनुमती दिली नसती. जिथे कुठे ही दरी होती तिथे जायला मोनीसिंग तयार होता. त्याचे पहिले काम होते या मृत्यूच्या दरीची वाट शोधणे. तो जागोजागी फिरत गेला, त्याने अनेक साधू, संत व साधकांना त्याबद्दल विचारले. अनेक वयस्कर मंडळींना त्याने हाच प्रश्न विचारला, "मला मृत्यूच्या दरीकडे जाणारा रस्ता कुठे आहे ते सांगाल का?" ते लोक मोनीसिंगकडे केवळ सहानुभूतीने बघत राहात. कुणालाच ही दरी माहित नव्हती, तेव्हा साहजिकच तिथे जायची वाटही माहीत नव्हती. अखेरीस मोनीसिंगला एक खूप म्हातारा दिसणारा माणूस भेटला. मोनीसिंगला या दरीत कशासाठी जायचे आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते. तोपर्यंत मोनीसिंगने आपले हे गुपित कुणालाही सांगितले नव्हते. जेव्हा म्हाताऱ्याने ही कहाणी ऐकली, तेव्हा त्याच्या तोंडावर किंचित हास्यरेषा उमटली. तो म्हणाला, "मला वाट माहीत नाही. पण एका अतिवृद्ध स्त्रीकडे कसं जायचं ते मी तुला सांगेन. तिचे वय किती आहे ते कुणालाच माहीत नाही. पण आम्हा सर्वांना वाटतं की ती बहुतेक दोनशे किंवा तीनशे वर्षांची असावी. जिथे जायची इच्छा आहे, त्याबद्दल तिला कदाचित थोडीफार माहिती असू शकेल. पण लक्षात ठेव, तिथे जाण्यासाठी तुला अनेक गोष्टींची तयारी करायला लागेल. म्हणजे, प्रवासाला निघालास की तू स्त्रियांकडे बघायचं नाहीस, किंवा त्यांनी बनवलेले भोजनपदार्थ खायचे नाहीस. एकेचाळीस दिवस तू तीनदा स्नान करायचेस, आणि त्या म्हातारीला भेट देण्यासाठी पांढरे रेशमी कापड कुठूनतरी मिळवायचेस. हे सर्व कष्ट उपसल्यानंतर, तू माझ्याकडे निर्मळ मनाने व शुद्ध अंतःकरणाने परत ये. त्यानंतर त्या पर्वतापलीकडल्या म्हातारीच्या झोपडीकडे जायची वाट मी तुला दाखवीन." मोनीसिंगने या साऱ्या सूचना पाळण्याचे वचन दिले आणि बेचाळिसाव्या दिवशी परत यायचे कबूल केले. त्या एकेचाळीस दिवसांत मोनीसिंगने एकाही स्त्रीला बघितले नाही, त्याने स्वतःच भोजन बनवले आणि दिवसांतून तो एकवेळच जेवत होता. तो तीन वेळा रोज आंघोळ करून दिवसा व रात्री प्रार्थना म्हणत होता. मोनीसिंग म्हाताऱ्या बाबांकडे जेव्हा परत गेला, तेव्हा त्याच्यासाठी एक पिशवी, एक भाला, एक पेला, काही अजब पदार्थ आणि तांदळाची मदिरा म्हाताऱ्या बाबाने तयार ठेवलेली होती. म्हातारीसाठी त्याने एक शाल ठेवली होती. पर्वत ओलांडून दाट अरण्य व दऱ्याखोऱ्यांतून जाण्यासाठी मोनीसिंग लगेच निघाला. उंच पर्वत चढून जाताना त्याला इतका त्रास वाटला नाही, पण जेव्हा तो दरीत उतरून अरण्यापर्यंत पोचला, तेव्हा म्हातारीच्या झोपडीपर्यंत जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे हे काही त्याला कळेना. बरेच दिवस चालत राहिल्यानंतर, मोनीसिंगला अखेरीस एका मोकळ्या रानात एकच झोपडी दिसली. त्याने दार हळूच ढकलले आणि तिथे त्याला पलंगावर निजलेली एक सुरकुतलेली म्हातारी दिसली. त्याने पिशवीतून आणलेली पांढरी रेशमी शाल बाहेर काढली आणि म्हातारीच्या हातात दिली. तिचा चेहरा एकदम उजळला. "मुला, माझ्याकडून तुला काय हवंय?" तिने विचारले. "मला, मृत्यूच्या दरीकडे जायचे आहे, आजी!" त्याने उत्तर दिले. "फक्त इतकंच?" त्या म्हातारीने विचारले, तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते. "होय आजी, मला माझ्या प्रियतमेला, राजकन्या मधुवंतीला भेटायचे आहे. मला तिला परत राजवाड्यात घेऊन जायचे आहे, आणि जर तिची संमती असेल, तर मला तिच्याशी लग्न करायचे आहे." "तुला ती त्या दरीत भेटेल की नाही, ते मला माहीत नाही, पण त्याच जागी मृत व्यक्ती चांदण्या रात्री अवश्य येतात. पण मला तुला सांगितलं पाहिजे, की जरी तू तिला पाहिलंस, तरी तू तिला स्पर्श करायचा नाहीस. तू तिच्याशी बोलू शकशील आणि तिच्या उत्तरासाठी वाट पाहशील." नंतर त्या दरीत रात्री कसे पोचायचे ते म्हातारीने त्याला सांगितले, व चंद्र उगवण्याची वाट पाहण्यास सुचवले. अंधार पडल्यावर मोनीसिंगने मृत्यूच्या दरीकडे जाण्याची वाट धरली, व तो चालत जाताना झाडांमधून चंद्र दिसतोय का, ते बघत होता. सुदैवाने, त्याला वाटेत कुणी हिंस्र जनावरे दिसली नाहीत, तरीही त्याने हातांतला भाला कायम सज्ज ठेवलेला होता. अचानक, त्याला थोडी मोकळी जागा दिसली आणि काही आकृती फुलझाडांमध्ये फिरताना त्याला स्पष्ट दिसल्या. त्यांतून राजकन्या कोणती ते शोधायला त्याला जरा त्रास पडला. तिच्यासारखी देखणी एक आकृती त्याने बघितली आणि तो धावतच तिच्याकडे गेला. आनंदाच्या भरात त्याने तिचा हात पकडून तिला म्हटले, "राजकन्ये! चल माझ्याबरोबर. मी तुला तुझ्या आईवडिलांकडे घेऊन जाईन." आणि काय आश्चर्य, ती राजकन्या एकदम नाहीशी झाली. बिचारा मोनीसिंग! काय करावे ते त्याला कळेना. त्या जागी राजकन्या परत काही आली नाही. पहाटेपर्यंत त्याने वाट पाहिली आणि तो म्हातारीच्या झोपडीकडे परत गेला. तिने शांतपणे त्याचा पराक्रम ऐकला व म्हटले, "आज दिवसभर तू इथेच राहा. रात्री पुन्हा तू राजकन्येच्या शोधात त्या दरीकडे परत जा. जर ती दिसली तर तिला तू अजिबात स्पर्श करू नकोस!" अंधार पडेपर्यंत मोनीसिंग थांबला आणि पुन्हा अरण्याल्या वाटेने त्या मृत्यूच्या दरीकडे गेला. पण आज त्याने आपला भाला बरोबर घेतला नव्हता. त्याला वाटलं, की त्याच्या हातातला भाला पाहून राजकन्येने त्याला कदाचित ओळखलं नसेल. चंद्राचा प्रकाश जेव्हा साऱ्या दरीवर पसरला, तेव्हा मोनीसिंग मृत व्यक्तींच्या आकृती परत येतील या आशेने वाट पाहत थांबला होता. त्यापैकी राजकन्येला आज त्याने सहज ओळखलं. त्याने मनःपूर्वक देवाची प्रार्थना केली. "हे देवा! तिच्याशी बोलण्याच्या व तिच्याजवळ जाण्याच्या मोहापासून मला वाचव." पण अघटितच घडलं. राजकन्येने त्याला लांबूनच ओळखलं, व ती वेगाने त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणाली, "मोनीसिंग! तू मला शोधत इथे आलास! तुला ही जागा कशी सापडली?" तिला स्पर्श होता कामा नये म्हणून मोनीसिंग अतिशय सावध होता. ती नदीत नाहीशी झाल्यापासून काय काय घडलं ते तिला सांगितलं. "तू माझ्याबरोबर परत पृथ्वीलोकात येशील का? मी तुला तुमच्या राजवाड्यात घेऊन जाईन, आणि तुझ्या मातापित्यांच्या अनुमतीने आपण लग्न करू या." "आनंदाने येईन मी, मोनीसिंग!" मधुवंती उद्गारली. "तू मला वाट दाखव, पण काहीही झालं तरी तू मागे वळून बघू नकोस. मी मागोमाग येते आहेच. आपण त्या पर्वतावर चढून वर गेलो की नंतर मी तुला हाक मारीन. त्यानंतर तू माझ्याकडे पाहू शकशील." मोनीसिंगचा राजकन्येवर पूर्ण विश्वास होता. तिचेही त्याच्यावर खरे प्रेम होते. त्याने त्या दरीतून परतीचा रस्ता धरला. अरण्य ओलांडून तो पर्वत चढून वरती आला, तोपर्यंत पहाट झाली होती. त्याचे नाव हळूच घेऊन त्याला हाक मारलेली त्याला ऐकू आली. मोठ्या आतुरतेने व आनंदाने त्याने मागे वळून बघितले, तर राजकन्या त्याच्याकडे पाहून प्रसन्नपणे हसत होती. आता त्याने तिचा हात मोठ्या धीराने पकडला आणि दोघेही राजवाड्यांकडे निघाले. राजा व राणीचा आनंद तर गगनात मावेना. आपली लाडकी राजकन्या त्यांच्या नजरेसमोर सुखरूप व सुरक्षित होती. मधुवंती व मोनीसिंगच्या लग्नाच्या तयारीला त्यांनी उत्साहाने सुरुवात केली. त्याला युवराज म्हणून घोषित करण्यात आले. त्या दोघांचे आयुष्य आनंदात चालू होते. राजपुत्र मोनीसिंगला कुणीही सांगितलं नव्हतं, तरी तो मृत्यूच्या दरीत राजकन्येला शोधायला कसा गेला याची कहाणी मात्र त्याने कुणालाही कधीही सांगितली नाही. ते शेवटपर्यंत गुपितच राहिले.