मोठा आधार
सिंहाचल नावाच्या एका खेडेगावात रघुनाथ नावाचा एक गरीब माणूस रहात असे. तो शेजारच्या शहरात एका दुकानात हिशेब लिहायचे काम करी. त्याबद्दल त्याला दरमहा दोनशे रुपये पगार मिळे. लहानपणीच त्याची आई वारली तेव्हा त्याची धाकटी मावशी सखुताई यांनीच त्याला वाढविले. त्यांना एक मुलगी होती. तिचे लग्नाचे वय झाल्यावर त्यांनी तिचे लग्न करून दिले. मुलगी सासरी निघून गेली. मावशी भाच्याकडेच रहात असे.
रघुनाथ दिसायला बेताचच होता. नंतर सामान्य पगारवाला. तरी सुदैवाने त्याचे लग्न एका धाब्या गोऱ्या सुंदर मुलीशी झाले. त्याच्या बायकोचे नाव लावण्यवती. तिचे आईवडील गरीब होते म्हणून गरिबाच्या घरातच मुलीला देणे त्यांना परवडले.
हे लग्न व्हायच्या आधी लावण्या स्वतःच्या रूपावर इतका गर्व करी की कोणत्या तरी मोठ्या जमिनदाराच्या मुलाशी आपले लग्न होईल म्हणून स्वर्ग स्वप्ने पहात असे. परंतु रघुनाथशी लग्न झाले तेव्हा तिच्या सर्व आशा आकांक्षांवर पाणी पडले. तिला ते लग्न मुळीच आवडले नाही. रघुनाथची मावशी सखुताई लावण्याच्या आई वडिलांना म्हणाली होती- "आम्हांला हुंडा, मानपान वगरेची मुळीच हाव नाही. मी देवाजवळ अशीच शपथ घेतली आहे. लावण्याचे आईवडील म्हणाले तुम्ही मागितलात तरी हुंडा देण्याची ताकद आम्हांला नाही."
परंतु ते सर्व संभाषण ऐकून लावण्या मात्र मनांतल्या फार कुढली. आईवडील तर मुलीच्या ऋणांतून मुक्त होणार म्हणून आनंदात होते.
काही असो लावण्या सासरी आली ते सासर तिला मुळीच आवडले नाही. म्हणून सासरी आली त्या दिवसापासून ती हुंडा न मागणाऱ्या सखुताई मावशीवर चिडलेलीच होती. त्यांना ती आपला शत्रू समजे.
एक महिना जेमतेम लोटला असेल ती एके दिवशी रात्री नवऱ्याला म्हणाली- "हल्लीच्या काळात स्वतःच्या सासूला सुद्धा सांभाळणे कठीण झाले आहे, माव सासुबाईंना कोण सांभाळणार हो! तुम्ही आपल्या मावशी बाईंना त्यांच्या मुलीच्या घरी जा, म्हणावं!"
"हे तू काय म्हणतेस ग! मावशी म्हणजे आपल्याला मोठी नाही का? तिचा केवढा आधार आहे! घरातली मोठी माणसंच अडी अडचणीला हवी असतात." रघुनाथ म्हणाला.
ते ऐकून लावण्या थोडी चिडून म्हणाली- "अहो येथे आपल्यालाच पुरे पडत नाही. तुम्ही समुद्रपार नोकरी करतां का? या दुष्काळात आणखी एकाला पोसणं म्हणजे संकटच नाही का?"
शेजारच्या खोलीत सखुताई झोपली होती, ती पाणी प्यायला म्हणून उठली होती. तिने ते संभाषण ऐकले. तिने उजाडल्या बरोबर काही कारण सांगितल्या शिवाय मुलीकडे जायचे ठरविले. रघुनाथला त्याचे फार वाईट वाटले. परंतु बायकोच्या भीतीने तो काही बोलला नाही.
त्याने भाड्याची गाडी ठरविली आणि मावशीला पोचवून परस्पर कामावर शहराकडे गेला. परंतु उशीर झाल्यामुळे काम संपवून निघायला संध्याकाळची वेळ होत आली. शहरातून गावी जायची वाट थोडी लांबची होती. एक जवळची वाट रानातून जात असे. तरी त्याचे पाय त्याच वाटेला लागले. लवकर घरी पोचायच्या विचारांत पाऊलवाट सुद्धा नसलेल्या वाटेने तो निघाला होता. तो रानाच्या अगदी मधोमध दाट झाडी होती तेथे पोचला तोपर्यंत चांगली रात्र झाली होती. परंतु पौणिमेचे लख्ख चांदणे पडले होते.
तो एका झाडाखाली पोचला असेल-नसेल, झाडाची पाने वाजली आणि एक कर्ण कठोर आवाज झाला- "कोण, ते कोण येते आहे? ते मागतील ते दिले पाहिजे!"
रघुनाथने मान वर करून पाहिले. ते जांभळाचे झाड होते. तो म्हणाला- "जांभळाचे झाड काय देणार? जांभूळच ना?" दुसऱ्या क्षणाला त्याच्या पायाजवळ एक जांभूळ पडले. ते उचलून त्याने पिशवीत टाकले आणि रघुनाथ पुढे निघाला.
आणखी काही अंतर चालून गेल्यावर आणखी एका झाडाची पाने हल्ली व बाजूला त्या पाठोपाठ कानठळ्या बसतील एवढा मोठा आवाज झाला- "काही देणार नाही, तुला मी काही देणार नाही!" ते झाड कवठाचे आहे, हे रघुनाथने चटदिशी ओळखले, म्हणाला- "कवठाचे झाडच ना? ते काय फार तर एक कवठ देईल!" दुसऱ्या क्षणाला एक कवठ झाडावरून रघुनाथच्या पायाजवळ येऊन पडले. रघुनाथने ते सुद्धा उचलून आपल्या पिशवीत ठेवले. तो आणखी काही अंतर चालून गेला असेल आणखी एका झाडाची पाने हल्ली आणि वाजली. त्या पाठोपाठ आणखी मोठा कर्णकठोर आवाज झाला- "पोचते करीन, घे! विचारले त्याच्यावर विचार करणार नाही, देईन! घे!" रघुनाथने कान बंद केले आणि लक्षपूर्वक पाहिले. ते आंब्याचे झाडच ना? काय देणार? देऊन देऊन एक आंबा!" लगेच त्याच्या पायाजवळ एक आंबा येऊन पडला. रघुनाथने तो आंबाही आपल्या पिशवीत ठेवला. काही वेळाने तो घरी येऊन पोचला.
लावण्याने पिशवीत ती तिन्ही फळे पाहिली व आश्चर्यचकित होऊन तिने विचारले- "हा मोसम नसून ही फळे कशी काय हो मिळाली?"
रघुनाथने जे घडले ते सर्व जसेच्या तसे सांगितले. लावण्याने रघुनाथ कडे रागाने पहात विचारले- "त्यावेळी बुद्धी कोठे गहाण ठेवली होतीत का? तुमच्याशी बोलली ती झाडे नव्हती, ती भुते तरी होती किंवा वनदेवी असतील. ती फार परोपकारी असतात हे तुम्हांला माहीत नाही, वाटते? उद्यां संध्याकाळी त्याच वाटेने या. त्याच्या जवळून काय मागून घ्यायचे, ते मी सांगते!"
तिला रात्रभर झोपच आली नाही. काय मागावे, याचाच विचार करीत राहिली. खूप विचार करून काय मागायचे हे ठरवून तिने नवऱ्याला सांगितले.
दुसऱ्या दिवशी रघुनाथ अंधार पडल्यानंतर जंगलाच्या वाटेने निघाला. तो जांभळाच्या झाडाजवळ पोचतांच पाऊस लागला. पानांच्या आवाजा बरोबर त्याला त्या रात्री ऐकू आलेले वाक्यही ऐकू आले. बायकोने सांगितले होते ते आठवून रघुनाथ म्हणाला- "जांभळाच्या झाडा! मला सौंदर्य दिलेस तर किती आनंदित होईल मी, म्हणून सांगू!"
झाडावरून त्याच्या अंगावर पाण्याची धारच पडली. विजेच्या उजेडात रघुनाथने आपले अंग पाहिले. ते गोरे पान झालेले पाहून त्याला अत्यानंद झाला. तो कवठाच्या झाडाजवळ पोचण्या च्या आत कानाचे पडदे फाटतील एवढा विजेचा कडकडाट झाला आणि जांभळाचे झाड जळू लागले आणि कोसळलं.
कवठाच्या झाडाजवळ पोचल्यावर म्हणाला- "कवठाच्या झाडा, अमूल्य ऐश्वर्य दिसेल तर किती छान होईल रे!" त्याच्या पायाजवळ एक रिकामी पिशवी पडली. ती रघुनाथने हातात घेतली मात्र पिशवीतून सोन्याची नाणी जमिनीवर खणखण आवाज करीत पडू लागली. त्याला ती पिशवी सोडून जाणे शक्यच नव्हते. त्याने भराभरा ती नाणी उचलून भरली आणि ते ओझे उचलून चालू लागला.
तो आंब्याच्या झाडाजवळ पोचला असेल नसेल. एक वीज कडाडली आणि कवठाचे झाड कोसळले. रघुनाथ आंब्याच्या झाडाच्या फांद्याकडे पाहून म्हणाला- "आंब्या, तू माझ्यावर नशिबाचा वर्षाव केलास तर चांगले होणार नाही का?" त्या पाठोपाठ त्याच्या डोक्यावर काहीतरी पडल्यासारखे झाले. परंतु त्याने चाचपून पाहिले, त्याच्या हाताला काहीच लागले नाही. रघुनाथ तेथून निघाला मात्र, आंब्याच्या झाडावर सुद्धा वीज पडली.
त्यानंतर रघुनाथने घराची वाट धरली. जोराचा गार वारा सुटला असल्या कारणाने आणि मोहोरा भरलेल्या पिशवीचे ओझे वहात असल्या कारणाने रघुनाथला पुढे पाऊल टाकणे सुद्धा कष्टसाध्य भासू लागले. तो एका उंचवट्यावर चढून उतरू लागताच पाय घसरला आणि बाजूला असलेल्या चिखलाच्या खड्ड्यात पडला. सोन्याची नाणी भरलेली पिशवी चिखलाच्या तळाला गेली. त्याचे सर्व अंग खांद्यापर्यंत चिखलात रुतले.
आता रघुनाथला आपण वाचत नाहीसे वाटले. परंतु त्याचे अदृष्ट अनुकूल होते. अकस्मात शेजारी एक झाड होते, त्याची फांदी मोडून त्याचा हात पोचेल एवढ्या अंतरावर चिखलात पडली. त्या फांदीचा आधार घेऊन तो चिखलांतून कसाबसा बाहेर आला.
रघुनाथ पूर्वेकडे पांढरे फाटू लागण्याच्या सुमारास घरी पोचला आणि बेशुद्ध होऊन पडला. पतीला त्या अवस्थेत पाहून लावण्या फार घाबरून गेली. काय करावे, विचारायला घरात कोणी अनुभवी मोठे माणूस नाही. किंकर्त्तव्य विमूढ स्थितीत लावण्याने सखुताईंकडे निरोप पाठविला.
दुपारच्या सुमारास खंडीभर दुःखाचे ओझे वहात सखुताई आल्या. तिने उपचार केले व एका महिन्यानंतर रघुनाथ बरा झाला. त्याला जंगलात मिळालेले सोने आणि शरीराचा सुंदरपणा गेलाच, अंगावर लागलेल्या जखमांचे वण दिसू लागले!
घडले त्याचे वर्णन ऐकून सखुताई लावण्याला म्हणाल्या- "तू आपल्या नवऱ्याला, पहिल्या भुताजवळ सौंदर्य मागायला सांगितलेस सौंदर्यापेक्षा आरोग्यच मुख्य आहे! त्याच्या वाचून दुसऱ्या भुताने दिलेले सोने फुकटच! शेवटच्या भुताजवळ त्याने अदृष्ट मागितले तेच कामाला आले, व तो वाचला!"
"तुम्ही तेव्हा सल्ला द्यायला नव्हता, मावशी! म्हणून मी अविवेकाने ती इच्छा प्रगट केली, म्हटले आणि इतके कष्ट सहन करावे लागले." डोळ्यात पाणी आणून लावण्या म्हणाला.
"अजून काही बिघडले नाही ग! त्याचे नशीब चांगले आहे. त्याने कष्ट केले तर तो लवकर वर येईल. आयुष्य भर सुखाने रहा!" असे सांगून सखुताई परत जायची तयारी करू लागल्या. त्या पेटीत आपली लुगडी वगैरे नीट ठेवू लागल्या. डोळ्यात आलेले पाणी टिपीत लावण्या दोन्ही हात जोडून म्हणाली- "मावशी, मी मूर्खपणा केला, त्या बद्दल क्षमा करा. तुम्ही कोठेच जाऊ नका. तुमच्या शिवाय आम्हांला मोठा आधार कोण आहे?"
लावण्यात झालेला बदल सखुबाईंनीच नाही, रघुनाथने सुद्धा ओळखला. त्यांना फार आनंद झाला.