All Marathi Stories

याचना

ब्रह्मदत्त काशी येथे राज्य करीत असताना बोधिसत्त्वाने गावातल्या विजयगुप्त नावाच्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला. त्यांचे वडील खूप गरीब होते. ते आपल्या एक एकर जमिनीत शेतीभाती करून कशीबशी उपजीविका चालवीत असत. विजयगुप्त जेव्हा मोठा झाला, तेव्हा त्याने आपल्या आई-वडिलांना सुखी ठेवण्याचे ठरविले. त्याने कोणत्याही परिस्थितीत शिक्षण संपादन करून राजदरबारात नोकरी मिळवायचा निश्चय केला. त्या परिस्थितीतही तो आपल्या वडिलांना शेतात मदत करी. परंतु एक एकर जमिनीत कितीसे धान्य मिळणार? हा सर्व विचार करून विजयगुप्त आपल्या वडिलांना म्हणाला - "बाबा, मी तक्षशिला येथे जाऊन काही विद्या संपादन करावी म्हणतो." वडिलांनी त्याला परवानगी दिली. विजयगुप्त तक्षशिला येथे जाऊन पोहोचला. तिथे एका गुरूची सेवा-शुश्रूषा करून त्याने विद्या संपादन केली व आपल्या गावी परत आला. तेव्हा त्याचे वडील दोन बैलांना घेऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबत असलेले त्याला दिसले. ते पाहून विजयगुप्तने विचार केला की आता एक क्षणभरसुद्धा वेळ वाया न जाऊ देता दुसऱ्या दिवशीच तो काशीला निघाला व तिथे त्याने राजदरबारात नोकरी मिळविली. त्यानंतर थोड्या दिवसांनी विजयगुप्तच्या वडिलांच्या दोन बैलांपैकी एक बैल मेला. कित्येक वर्षे तो बैल त्यांच्या कुटुंबाची सेवा करीत आला होता. त्यामुळे विजयगुप्तच्या वडिलांना आपला एक हातच तुटला असे वाटले. त्या परिस्थितीत त्यांनी विचार केला की मुलगा राजदरबारात नोकरी करीत आहे. राजाला सांगून तो आपल्याला एक बैल देववील. ते काशीला गेले व आपल्या मुलाला भेटले. सर्व गोष्टी ऐकून घेऊन विजयगुप्त आपल्या वडिलांना म्हणाला - "बाबा, तुम्ही व आई आता म्हातारे झाला आहात, कशाला त्रास करून घेता? तुम्ही दोघे माझ्याजवळ येऊन रहा व आराम करून आपले दिवस घालवा." परंतु त्यांच्या वडिलांना ते मान्य झाले नाही. ते हट्ट करून म्हणाले - "मला जन्मभूमी सोडून जाणे पसंत नाही. माझे मरण आपल्या जन्मभूमीतच झाले पाहिजे. तू एक बैल मिळवून देऊ शकलास तर शेतीभाती करून मी माझे आयुष्य मजेत घालवू शकेन. तेथे मला जे स्वास्थ्य मिळते, ते इथे मिळू शकणार नाही!" विजयगुप्त काही दिवसांपूर्वीच राजदरबारात नोकरीला लागला होता. तेव्हा त्याच्याकडे बैल खरेदी करण्याइतके धन नव्हते. त्याचबरोबर राजाकडे मागणेसुद्धा बरोबर दिसणार नव्हते. कारण राजाला मनातून वाटेल की नुकताच काही दिवसांपूर्वीच हा नोकरीला लागला आहे आणि लगेच आपल्यासमोर हात पसरून मागतो आहे." हा विचार करून विजयगुप्त आपल्या वडिलांना म्हणाला - "बाबा, जर का मी राजाकडे एक बैल मागितला तर ते "तुला बैल कशाला पाहिजे?" असे विचारतील आणि दुसरे मी राजदरबारात नोकरी करणारा, राजाकडे मागणे चांगले दिसणार नाही. तेव्हा आपणच जाऊन त्यांना विनंती करा की आपल्याला एक बैल त्यांनी द्यावा. माझी खात्री आहे की ते आपल्याला एक बैल देतील." परंतु विजयगुप्तच्या वडिलांना ती गोष्ट काही आवडली नाही. तो आपल्या मुलाला अधिकारवाणीने म्हणाला, "मुला, मी एक शेतकरी आहे, नांगर सोडून दुसरे काही मला माहीत नाही. कुठे राजा? आणि कुठला दरबार? आणि कुठे मी? दरबारात माझ्या तोंडून शब्द बाहेर पडणार नाहीत. राजाबरोबर कशा तऱ्हेने बोलावे, कशा तऱ्हेने वागावे, हे सर्व मला माहीत नाही. तेव्हा तूच माझे काम कसेतरी करून दे." "तर मग मी एक उपाय सांगतो. मी एक श्लोक लिहून देतो तो एक-दोन दिवसांत पाठ करून राजदरबारात जाऊन आपण तो राजाला ऐकवा. तेव्हा तुमचे काम नक्की होईल!" असे सांगून विजयगुप्तने आपल्या वडिलांना धैर्य दिले. त्यानंतर त्याने श्लोक लिहून देऊन तो आपल्या वडिलांकडून पाठ करून घेतला. द्वे में गोणा, महाराज, येहि खेत्तं कसामसे; तेंदु एको मतोदेव, दुतियं देहि खत्तिय ।। याचा अर्थ असा आहे - "महाराज माझ्याजवळ दोन बैल होते. त्यांच्या मदतीने मी माझी शेतीची कामे चालवीत होतो. प्रभो, त्यातील एक बैल मेला. तेव्हा महाराज, मला दुसरा बैल द्यावा." म्हाताऱ्या बापाने मोठ्या कष्टाने तो श्लोक पाठ केला. एके दिवशी विजयगुप्त आपल्या वडिलांना घेऊन राजदरबारात आला. आपल्या मुलाने सांगितल्याप्रमाणे म्हाताऱ्याने राजा व मंत्र्यांना नमस्कार केला व हात जोडून विनयपूर्वक उभा राहिला. "तू कोण आहेस? काय पाहिजे आहे?" राजाने विचारले. म्हाताऱ्याने ताबडतोब पाठ केलेला श्लोक म्हणून दाखविला. परंतु घाबरल्यामुळे त्या श्लोकात थोडासा फेरबदल झाला. द्वे में गोणा, महाराज, येहि खेत्तं कमामसे; तेसु एको मतोदेव, दुतियं गण्ह खतिय ।" हा श्लोक ऐकून सर्व दरबारी लोक हसू लागले. विजयगुप्तने लाजेने आपली मान खाली घातली कारण त्याच्या वडिलांनी घाबरून जाऊन मला दुसरा बैल देववा, असे सांगण्याऐवजी, सांगितले - "माझ्या दुसऱ्या बैलाला घेऊन टाका." ह्यावर राजाने हसून विचारले - "तुम्ही आपल्या बैलाला मला देण्याकरिता का आपल्या घरातून इतके दूरवर आलांत?" "महाराज, पाहिजे तर आपण त्या बैलाला घेऊन टाका, कारण त्यामुळे एवढा सारा गोंधळ निर्माण झाला आहे." असे सांगून म्हाताऱ्याने राजाला सर्व गोष्ट ऐकविली. विजयगुप्तच्या चांगुलपणाचे कौतुक करत राजा खूप खुश झाला. कारण त्याच्या दरबारांत जे लोक होते, ते सर्व लहान-सहान गोष्टी घेऊन राजाकडे याचना करणारे होते, परंतु विजयगुप्त असा नव्हता. त्याच्यावर खुश होऊन राजाने आठ बैलांच्या जोड्या खूप सजवून त्या विजयगुप्तच्या वडिलांना दान केल्या.