All Marathi Stories

राजपुत्राचा अक्षराभ्यास

सूर्यसेन हा विंध्यगिरी राज्याचा राजा होता. तो मोठा धार्मिक होता. नेहमी तो लोककल्याणाचाच विचार करत असे. त्यामुळे त्याच्या खजिन्यातील बराचसा पैसा लोककल्याणासाठी खर्च होत असे. त्यामुळे एक वेळ अशी आली की, त्याचा खजिना जवळजवळ रिकामा झाला. त्यासाठी प्रजेकडून जास्त कर वसूल करण्याची त्याची बिलकुल इच्छा नव्हती. त्यामुळे राज्यासाठी आर्थिक आवक कशी वाढवावी, या विचारात तो पडला. विंध्यगिरीच्या शेजारी विदर्भ आणि वैशाली अशी दोन राज्ये होती. विदर्भाचा राजा चंद्रकांत आणि वैशालीचा राजा महीधर, या दोघांचीही दृष्टी विंध्यगिरीच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर व सैन्याच्या दुर्बलतेवर पडली. आपापली राज्ये वाढवून मोठी करावी, अशी दोघांचीही महत्त्वाकांक्षा होती. दुसऱ्यांच्या गोष्टी हडप करण्याची ते संधीच शोधत होते. प्रथम विंध्यगिरीवर हल्ला करून ते आपल्या राज्याला जोडून मग दुसऱ्याचे राज्य हडप करावे, अशा तऱ्हेचे षड्यंत्र दोघेही आपापल्या मनात रचत होते. सूर्यसेनला आपल्या गुप्तहेरांद्वारे ही बातमी समजली होती. सूर्यसेन स्वतः एक निष्णात राजकारणी होता. तो युद्ध टाळण्याच्या मार्गाचा विचार करू लागला आणि त्याच्या हातात एक सुसंधी चालून आली. सूर्यसेनाचा जयंत हा चार वर्षांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या शालाभ्यासाच्या शुभारंभासाठी राजपुरोहितांनी शुभमुहूर्त निश्चित केला होता. ही हातची संधी राजा दवडणार नव्हता. त्याने आपले शत्रू चंद्रकांत व महीधर यांना या शुभप्रसंगी येण्याचे आमंत्रण धाडण्याचे ठरवले. दोघांशीही मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याच्या दृष्टीने त्याने दोघांना आमंत्रणपत्रे पाठवली. दोघेही राजे अशा संधीच्या शोधातच होते. त्या दोघांचीही इच्छा होती की, काहीतरी निमित्ताने सूर्यसेनाबरोबर भांडण उकरून काढावे व मग त्याच्याबरोबर युद्ध पुकारावे. दोघांची ही एक चाल होती. दोघेही जयंतच्या विद्याभ्यासाच्या आरंभीच्या दिवशी आले. सूर्यसेनाने दोन्ही पाहुण्यांचा चांगला आदरसत्कार केला. मोठ्या मैत्रीपूर्ण वातावरणात त्या दिवशीचे भोजन पार पडले. त्यानंतर विदर्भाचा राजा चंद्रकांतने सोन्याची एक पाटी भेट म्हणून सूर्यसेनला म्हटले, "अक्षराभ्यासाचा श्रीगणेशा करताना या पाटीचा उपयोग करावा." वैशालीचा राजा महीधरनेही सुरेख हस्तिदंती पाटी देत म्हटले, "सरस्वती मंदिरातून पूजा करून आणलेली ही पाटी आहे. युवराजांच्या अक्षराभ्यासाचा श्रीगणेशा या पाटीवर केला तर तो मोठा विद्वान होईल." आता सूर्यसेनची परिस्थिती मोठी अवघड होऊन बसली. तरीही हसत हसत त्याने म्हटले, "तुम्हा दोघांप्रती मी खरोखर कृतज्ञता व्यक्त करतो." नंतर चंद्रकांत व महीधर मोठ्या गंभीरपणे अतिथीगृहात पोहोचले. चंद्रकांत मनातल्या मनात हीच इच्छा करत होता की, सूर्यसेनाने आपल्या मुलाचा अक्षराभ्यास महीधरने दिलेल्या पाटीवरच करावा. मग तो आपला स्वतःचा अपमान झाला असे म्हणून त्या सबबीखाली सूर्यसेनला युद्धासाठी ललकारेल. महीधर असाच विचार करत होता. कुठून तरी सूर्यसेनशी भांडण उकरून काढावे, हाच दोघांचाही उद्देश होता. पाटीबाबत दोघांच्या मनातील विचार व उद्देश सूर्यसेनाने मनोमन जाणले होते. परंतु अशा स्थितीत नेमके काय करावे हे त्याला समजत नव्हते. दुसऱ्या दिवशी युवराजाच्या विद्यारंभाचा शुभ मुहूर्त येऊन ठेपला. राज्याच्या परंपरेनुसार, सुंदर सजवलेल्या हत्तीवर आसनस्थ होऊन सूर्यसेन व युवराज जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडले. राजमार्गावर रस्त्याच्या दुतर्फा लोक रांगेत उभे होते. ते पुष्पवृष्टी करत राजपुत्रास आशीर्वाद देत होते. त्याच वेळी महाराजांची दृष्टी एका लहान मुलावर पडली. त्याचे वय जेमतेम पाच वर्षांचे असेल. त्याच्या हातात एक पाटी होती व ती घेऊन वारंवार राजपुत्राकडे इशारा करत तो रडत होता. त्याची आई त्याला समजावत, गप्प करण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. सूर्यसेनाने माहुताला हत्ती थांबवण्यास सांगितले व तो स्वतः त्या मुलाच्या आईजवळ पोहोचला. राजाला समोर पाहताच ती घाबरत उद्गारली, "महाराज, माफी असावी. अशा शुभप्रसंगी याचे रडणे हा अपशकुन आहे. पण मी खरोखरच लाचार आहे." असे बोलून तिने हात जोडले. "घाबरू नकोस. सांग बरं हा मुलगा का रडतो आहे?" महाराजांनी विचारले. "त्याने मला विचारले की, राजपुत्र हत्तीवर बसून कशासाठी येत आहे? मी सांगितले की, राजपुत्राच्या विद्याभ्यासाचा शुभमुहूर्त आहे, म्हणून लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी तो येत आहे. हे ऐकून तो एकच हट्ट धरून बसला आहे की, 'मी माझी पाटी युवराजाला देणारच.'" हे ऐकताच सूर्यसेन अतिशय प्रसन्न झाला. त्याने मनातल्या मनात विचार केला की, एक छोटासा मुलगा मोठ्या प्रेमाने आपली पाटी युवराजाला देऊ इच्छित आहे, हीच खूप मोठी भेटवस्तू आहे. प्रेमभावाने दिलेल्या भेटीपेक्षा दुसरी कोणती भेट जास्त मूल्यवान असते? मग त्याने हळूवारपणे त्या मुलाचा हात पकडला व त्याला विचारले, "बाळा, तुझे नाव काय?" मुलाने डोळे पुसत सांगितले, 'सुधाम.' "हे बघ सुधाम, आधी रडणे एकदम थांबव आणि तूच आपली पाटी युवराजाला दे बरं!" राजा म्हणाला. सुधामाने मोठ्या आनंदाने ती पाटी युवराजाला दिली. राजाने सुधामच्या आईला सांगितले, "हे पहा, रात्री राजवाड्यात भोजनसमारंभ आहे. तुम्ही दोघेही जरूर या." तेथे त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी एका सैनिकावर सोपवली. मिरवणूक उत्सव संपताच राजवाड्यात युवराजाच्या विद्याभ्यासाचा कार्यक्रम सुरू झाला. राजोपाध्यायांनी युवराजाकडून अभ्यासाचा श्रीगणेशा करण्यासाठी पाटी मागितली. चंद्रकांत आणि महीधर दोघेही हे जाणण्यास आता अधीर झाले होते की, दोघांपैकी कोणी दिलेली पाटी युवराजाला दिली जाईल? तेव्हा सूर्यसेन उठला, सर्वांकडे बारकाईने बघत त्याने म्हटले, "युवराजाच्या अक्षराभ्यास समारंभात भाग घेण्यासाठी आज राजा चंद्रकांत व राजा महीधर इथे खास पाहुणे म्हणून आले आहेत. माझ्या या दोन्ही मित्रांनी युवराजाच्या विद्याभ्यासाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत, एकाने युवराजास सुवर्णपाटी दिली, तर दुसऱ्या मित्राने सरस्वती मंदिरातून पूजा करून आणलेली हस्तिदंती पाटी दिली. दोघांनाही मी हार्दिक धन्यवाद देतो. परंतु राज्याच्या प्रथेनुसार जेव्हा आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी निघालो, तेव्हा सुधाम नावाचा एक निर्धन मुलगा आपली एकमेव पाटी युवराजाला देण्यासाठी अति उत्सुक होता. तेव्हा मी स्वतः जाऊन त्या पाटीचा स्वीकार केला. आता इथे तीन पाट्या आहेत. प्रजेच्या इच्छेनुसार चालावे हाच आमचा परिपाठ व परंपरा आहे. तेव्हा आता तुम्हीच सांगा, की युवराजाने कोणत्या पाटीवर आपल्या विद्याभ्यासाचा श्रीगणेशा करावा?" दोघेही राजे काही बोलणार इतक्यात सभेतील एका सद्गृहस्थाने म्हटले, "आपले महाराज स्वतः धर्मनिष्ठ व तज्ज्ञ आहेत. राजा आणि रंक दोघांनाही ते समानतेने वागवतात. अजाण सुधामाने मोठ्या प्रेमाने जी पाटी दिली आहे, त्या पाटीवरच युवराजाच्या अभ्यासाचा शुभारंभ झाला पाहिजे." असे त्याने म्हणताच सगळ्यांनी आनंदाने संमती दिली. राजा सूर्यसेनाने सुटकेचा निःश्वास सोडला. महाराज जाणून होते की, त्यांनी दोघांपैकी एका राजाची पाटी अभ्यासासाठी निवडली, तर दुसऱ्या राजाशी शत्रुत्व निश्चितच होते. पण त्यांना असेही भय वाटत होते की, सुधामची पाटी अभ्यासासाठी निवडल्याने कदाचित दोन्ही राजे नाराज होण्याची शक्यता आहे. प्रजेचा पाठिंबा मिळेल, याची मात्र त्यांना खात्री वाटत होती. युवराज जयंतच्या अक्षराभ्यासाचा श्रीगणेशा सुधामच्या पाटीवरच झाला. राजा चंद्रकांत व महीधर दोघांनी प्रत्यक्ष बघितले की, महाराज सूर्यसेन सामान्य प्रजेवरही किती प्रेम करत होते आणि प्रजाही त्यांना किती मानत होती. असे अनन्यसाधारण प्रेम व आदर पाहून ते दोघेही आश्चर्यचकित झाले. दोघेही जाणून चुकले की, राजाला केवळ आर्थिक स्थैर्य व सैन्यबळ असणे पुरेसे नाही, तर प्रजेचे प्रेम व आदर मिळणे, हेही अतिशय आवश्यक आहे. सूर्यसेन आपल्या प्रजेस आपल्या पोटच्या पोराप्रमाणे वागवतात, म्हणूनच प्रजाही त्यांच्याकडे आदराने बघते. त्यांना प्रजेकडून खूप प्रेम व मान मिळतो. म्हणूनच दोघांनीही सूर्यसेनाकडे आपला दोस्तीचा हात पुढे केला. त्यानंतर सूर्यसेनाने विदर्भ आणि वैशालीच्या राजांचा जोरदार आदरसत्कार करून त्यांना मौल्यवान भेटवस्तू देऊन निरोप दिला. सूर्यसेनाला सुरुवातीस असे वाटत होते की, ही समस्या जटिल होईल आणि त्याचे राज्यावर विपरीत परिणाम होतील. पण सुधाममुळे राज्यावरील संकट सहजपणे टळले आणि समस्या सुटली. राजाने युवराजाबरोबरच सुधामच्या विद्याभ्यासाचीही योग्य व्यवस्था केली.