राजा धडा शिकला
(देशोविदेशी दंतकथा : कोरिया)
त्याचं असं झालं की राजाला दोन मुलगे होते. दुसरा राजपुत्र त्याच्या निपुत्रिक मामाच्या मांडीवर दत्तक गेला होता, पण दहा वर्षांनंतर राजाचा थोरला मुलगा संन्यास घेऊन पर्वतराजितल्या अरण्यात राहायला गेला. इकडे त्या मामालाही मुलगा झाला. म्हणून दत्तक गेलेला मुलगा पुन्हा आपल्या पहिल्या घरी आला.
बहुधा त्या राजपुत्राला आपला अशा तऱ्हेने वापर केलेला आवडला नसावा - प्रथम एका घरातून दुसऱ्या घरात देणे आणि नंतर तिथे नकोसे झाल्यावर पुन्हा परत स्वगृही येणे. तो एक मनस्वी, तापट तरुण झाला. तो कधी हसत नसे किंवा कुणाशीही बोलत नसे. सगळ्यांत कहर म्हणजे तो कुठलाही अभ्यास करीत नसे. सर्वांशी तो अतिशय उद्धटपणे वागत होता.
राजपुत्राच्या बाबतीत राजा जास्तच उतावीळ व अधिरा होऊ लागला होता आणि साहजिकच इतरांच्या बाबतीत देखील आततायी होऊ लागला. राजाने अनेक विद्वान शिक्षक त्याला शिकवण्यासाठी म्हणून नेमले, पण एकही धडा न शिकवता प्रत्येकजण परत गेला. शिक्षकांनी जर राजपुत्राला बोलावून जवळ येऊन बसायला सांगितले, तर तो त्यांच्याकडे जळजळीत नजरेने पाहून तिथून आपल्या शय्यागृहात उद्धटपणे निघून जाई. शिक्षकांनी त्याला शिस्त लावण्याचे अनेक प्रयत्न केले, पण काहीही उपयोग झाला नाही. साहजिकच शिक्षक निमूटपणे नोकरी सोडून निघून जात होते. राजाला भेटून सांगण्याचे धाडस त्यांना होईना.
"सरकार, राजपुत्रावर कुणीतरी चेटूक केलं असलं पाहिजे!" मंत्री म्हणाला. "मग? त्यांतून सुटका कशी करायची?" राजाने उलट विचारले.
"आपल्याला नाही करता येणार; पण एक विद्वान साधू त्यांतून आपली सोडवणूक करू शकेल. नदीच्या काठावर, डोंगराच्या पायथ्याशी, आपल्या गावापासून जवळच त्यांची झोपडी आहे. पण त्यांना सहसा लोकांना भेटायला आवडत नाही. पण आपण जर त्यांच्याकडे गेलात तर बहुतेक ते आपल्याला भेटतील आणि या समस्येतून राजपुत्राला बाहेर कसे काढता येईल याचे मार्गदर्शन करतील," मंत्र्याने खुलासा केला.
आपल्या सुज्ञ मंत्र्याचा सल्ला ऐकायचा असे राजाने ठरवले. तो एकटाच घोड्यावर बसून त्या साधूकडे गेला. त्यांना वंदन करून, राजा नम्रपणे गुडघे टेकून खाली बसला व साधूला त्याने आपला परिचय करून दिला. "माझ्यासारख्या गरीबासाठी एक राजा बरेच काही करू शकतो. राजासाठी मी काय करू शकणार?" साधूने विचारले.
"साधू महाराज, या क्षणी राजा असलो तरी मी सर्वात गरीब व दुर्दैवी माणूस आहे." राजाने दीनवाण्या सुरात आपली समस्या साधूला सविस्तर सांगितली. थोड्या वेळानंतर साधू गंभीरपणे म्हणाला, "हे पहा, मी तुझ्या मुलाला शिक्षण देण्यासाठी मदत करू शकेन. पण त्यापूर्वी तू मला वाघाच्या मिशा आणून दिल्या पाहिजेस. आणि त्याही वाघ पूर्णपणे जागा असताना, तुझ्या हाताने त्या कापायला हव्यात!" राजा निराशेने उठून उभा राहिला, "वाघाच्या मिशा? साधू महाराज, ही तर अगदी अशक्य कोटीतली गोष्ट आहे."
"माणसाचा स्वभाव बदलण्याइतकी अशक्य निश्चितच नाही! तू जा, प्रयत्न कर. आशा सोडू नकोस पुत्रा!" साधूने त्याला धीर देत म्हटले.
साधू तिथून उठला आणि रोजच्याप्रमाणे फिरायला निघून गेला. राजाही राजवाड्यांत परतला, तो गंभीरपणे विचार करीतच! राजाच्या उद्यानात एक प्राणिसंग्रहालय होते व त्यांत एका पिंजऱ्यात एक वाघ होता. त्याने तिथल्या रक्षकाला बोलावून विचारले की वाघाला स्पर्श करता येतो का?
"महाराज, आपला हा वाघ रागीट आहे. मी त्याचे जेवण पिंजऱ्यात ढकलून ठेवतो, पण मी वाघाजवळ कधीही जात नाही." तो सेवक म्हणाला.
पण साधूच्या स्पष्ट व ठाम बोलण्याचा राजाच्या मनावर प्रभाव पडला होता. राजाने एक धाडसी बेत ठरवला. संध्याकाळी त्याने वाघासाठी जेवण नेले, ती थाळी पिंजऱ्याच्या आत ढकलली आणि राजा तिथेच थांबला. वाघ गुरगुरला, त्याने ते जेवण फस्त केले व राजाकडे नुसतेच बघितले. राजाने हाच क्रम पुढील पंधरा दिवस चालू ठेवला. नंतर ती थाळी पिंजऱ्यात ढकलण्याऐवजी, राजा ती हातात धरून ठेवू लागला व वाघ पुढे येण्याची वाट पाहू लागला. वाघाने जरा साशंक नजरेने राजाला न्याहाळले, पण थोडा वेळ वाट पाहून तो पिंजऱ्याच्या दाराजवळ आला. राजाने थाळी घट्ट धरली होती आणि वाघाने त्या थाळीतले अन्न संपवले. थाळी राजाच्या हातांतच होती.
हीच पद्धत राजाने काही दिवस वापरली. एके दिवशी थाळीतले अन्न खाल्यानंतर वाघाने राजाचा हात चाटला. त्या प्राण्याने आपले प्रेम व्यक्त केले असे राजाला जाणवले. त्यानंतर रोज वाघ राजाचा हात चाटत होता. काही दिवसांनंतर राजाने वाघाच्या डोक्यावरून हात फिरवला. वाघालाही राजाचा प्रेमळपणा जाणवला असावा. हे असे सुमारे महिनाभर चालले. वाघाला गोंजारताना राजा प्रेमळ स्वरांत काहीतरी बोलत असे आणि वाघाला ते आवडत होते असे दिसले. एका दिवशी, तो वाघाशी प्रेमाने बोलत असताना राजाने लहानशी कात्री हातांत धरलेली होती. त्याने हळूच मिशीतल्या केसाचा तुकडा कापला. वाघाने तिकडे लक्षच दिले नाही.
राजा आनंदाने फुलला. तो दौडतच साधूकडे गेला आणि त्याने तो केस त्याला अभिमानाने दिला. साधूने समाधानाने मान डोलावली आणि तो तुकडा जवळच्या चुलीत फेकून दिला.
"राजन्, आता तुझ्या मुलाला माणसाळवायचे कसे, हे तुझ्या लक्षात आले असेलच. होय ना? कोणताही मुलगा वाघापेक्षा जास्त उग्र व धोकादायक असूच शकणार नाही. तुझा मुलगा कोणत्याही शिक्षकाच्या हातांत सोपवण्यापूर्वी तू स्वतः त्याला शिस्त लाव; म्हणजे त्याच्याशी बोल, त्याला गोष्टी सांग, त्याच्याशी मैत्री कर; वाघाशी केलीस ना तशीच! आणि त्यानंतर त्याने शिक्षणांत लक्ष घालावे म्हणून त्याचे मन वळव. बरोबर आहे ना? आता जा आणि हे काम आत्मविश्वासाने आणि निश्चयपूर्वक करून बघ - अगदी वाघाची मिशी जशी आणलीस ना, त्याच तडफेने कर. तुला नक्की यश मिळेल बघ!" साधूने आशीर्वाद दिला आणि तो नेहमीप्रमाणे फिरायला निघून गेला.
राजा राजवाड्यांत परत गेला आणि त्याने हा नवा उपदेश अमलात आणायला सुरुवात केली. आपला पिता हा एक प्रेमळ, हितचिंतक आहे व आपल्या मनांतल्या इच्छा-आकांक्षा तो जाणतो, हे राजपुत्राला उमजले. राजालाही आपला मुलगा बेपर्वा नसून एक बुद्धिमान, तडफदार तरुण आहे व त्याला आता शिक्षण घेण्याची इच्छा आहे हे कळले.
"प्रथम मी धडा शिकलो आणि त्यानंतरच मी माझ्या मुलाला धडा देऊ शकलो!" राजाने आनंदाने मंत्र्याला सांगितले. मंत्र्यालाही खूप समाधान वाटले.