राजा लिअर
एकदा लिअर नावाचा राजा ब्रिटनवर राज्य करीत असे. त्याला तीन मुली होत्या. मोठी मुलगी गानेरिल अल्बनीच्या संस्थानिकाला दिली होती. दुसरी रीगन कॉर्नवालच्या संस्थानिकाला दिली होती आणि सर्वात धाकटी कॉर्डेलिया अजून कुमारिका होती. परंतु तिच्या वडिलांनी तिच्यासाठी दोन स्थळे योजून ठेवली होती. एक फ्रान्स देशाचा राजा व दुसरा बरगंडीचा संस्थानिक.
राजा ऐंशी वर्षांचा झाला. त्याला समोर मृत्यू दिसू लागला. आपला आता भरवसा नाही असे वाटून आपले राज्य तिन्ही मुलींना वाटून देऊन आपण विश्रांती घ्यावी असे त्याने ठरविले. एके दिवशी मुलींना बोलावून म्हणाला— "मुलींनो, मी आता वृद्ध झालो आहे. तेव्हा या राज्याची वाटणी करून मी मोकळा होणार आहे. पण ज्या प्रमाणात तुमचे माझ्यावर प्रेम आहे, त्या प्रमाणात मी त्याची वाटणी करणार आहे."
हे ऐकताच मोठी बहीण पुढे झाली आणि म्हणाली— "बाबा! तुमच्यावर माझे किती प्रेम आहे याचे वर्णन करावयास माझ्याजवळ शब्दच नाहीत. तुम्ही मला प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहात." आपल्या लाडक्या लेकीच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून पिता आनंदला. त्याने आपल्या राज्याचा तिसरा भाग देऊन टाकला.
त्यानंतर दुसरी मुलगी रीगन म्हणाली— "तुमच्या बोलापेक्षाही माझे जास्त प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्या सुखातच मला आनंद आहे." तिच्या सांगण्यावर सुद्धा बाप खुश झाला आणि तिला त्याने आपल्या राज्यातील तिसरा भाग दिला.
त्यानंतर आपली स्तुती ऐकण्यास उत्सुक झालेले राजाचे मन आळशी स्तुती ऐकण्यासाठी तिसऱ्या मुलीकडे वळले. तो म्हणाला— "आमच्या छोला पिताचे काय म्हणणे आहे?"
कॉर्डेलिया म्हणाली— "काय सांगू! मुलीचे पित्यावर जितके प्रेम असावयास पाहिजे तितके प्रेम आहे माझे आपल्यावर. त्यापेक्षा जास्तही नाही आणि कमीपण नाही."
"तुझा तसाच विचार असेल तर तुला खरोखरच काही मिळणार नाही!" लिअर राजाने रागाने सांगितले.
"बाबा, उगाच काही बढाया मारून मला आपली किंवा माझी स्वतःची फसवणूक करून घ्यावयाची नाही. माझ्या प्रेमात पतीचा वाटा येईल ना बरोबरीने! किंबहुना जास्तच! काय, ताई-आक्कांच्या प्रेमात पतीचा वाटा नसेल? खरोखरच त्यांचे तुमच्यावरच असीम प्रेम असते तर त्यांनी लग्न करावयास नको होते." कॉर्डेलिया म्हणाली.
कॉर्डेलियाचे आपल्या पित्यावर खरोखरच दोन्ही बहिणींपेक्षा जास्त प्रेम होते. पण तिला खोटी हुशारी नको होती. राज्याच्या हिश्शासाठी बापाला फसवणे तिला योग्य वाटले नाही. परंतु राजाला तिचा भाव समजला नाही. त्याला तिचा फार राग आला. त्या भरात त्याने आपले राज्य दोन्ही मोठ्या मुलींना वाटून दिले.
त्याने भर दरबारात राज्याची, अविभक्त बागांची, त्याचप्रमाणे नोकरचाकरांची, आवारांची वाटणी केली. म्हणाला— "आता मी नावापुरताच राजा. सर्व राज्य या दोघींचे. मला फक्त शंभर नोकर पुरतील आणि मी पाळीपाळीने मुलींकडे राहणार. मी जिच्याकडे असेन तिने माझा व माझ्या नोकरांचा सर्व मान राखावा." आणि असेही म्हणाला— "कॉर्डेलिया माझी मुलगी नाही व मी तिचा बाप नाही."
राजाचे हे काम दरबारात कोणालाच आवडले नाही. परंतु राजासमोर बोलण्याची कोणाची छाती होईना. तिथे केंटचा राजा होता. तो उठला व राजाच्या धोरणाचा त्याने विरोध केला. त्यावर राजा संतापून म्हणाला— "मला विरोध करतोस! माझ्या राज्यातून चालता हो. पाच दिवसांच्या आत येथून निघून जा आणि जर का कुठे कोणाच्या नजरेस पडलास तर डोकेच उडवीन तुझे." बिचारा केंटचा राजा खाली मान घालून निघून गेला.
त्यानंतर कॉर्डेलियासाठी नियोजित वरांना बोलावून राजाने विचारले की, आता कॉर्डेलियाशी लग्न करण्यास कोण तयार आहे? त्यावर बरगंडीचा संस्थानिक म्हणाला— "मी तो विचार सोडला आहे." फ्रान्सचा राजा मात्र खुशीने तयार झाला. तो तिच्या स्पष्ट व सरळ स्वभावावर खुश झाला होता. पुढे फ्रान्सला जाते वेळी ती आपल्या बहिणींना म्हणाली— "आपल्या वडिलांवर दाखवलेले प्रेम शेवटपर्यंत निभावा." आणि ती आपल्या नवऱ्याबरोबर निघून गेली.
आपल्या राज्याची वाटणी केल्यावर राजा आपल्या नोकरांसह मोठ्या मुलीकडे राहावयास गेला. पहिले काही दिवस आनंदात, खुशीत गेले. परंतु महिना होतो न होतो तोच गानेरिलचे खरे रूप दिसू लागले. ज्या वडिलांनी तिला राज्य दिले त्यांचे दर्शन देखील नकोसे वाटू लागले तिला. तो काही तिच्याशी बोलू लागला तर ती तेथून उठून जात असे. तिच्या देखत राजाचे शंभर नोकर सडू लागले. आता ते पाहून नोकर सुद्धा त्याप्रमाणे वागू लागले. हे सर्व राजाला अगदी असह्य झाले.
केंट राजाला राज्यातून हाकलून दिले होते, तरी तो वेष पालटून राजाच्या जवळ-पासच राहत असे. त्याला राजाची फार कीव आली. त्याने वेष पालटून नाव बदलून राजाची सेवा करण्याचा निश्चय केला आणि आपली कल्पना अमलातही आणली. तो नेहमी राजाच्या भोवती असे. राजाशी कोण कसा वागतो याकडे तो लक्ष ठेवी. केंट राजाप्रमाणे राजाचा विदूषकही राजाची सेवा चाकरी करी. हसत हसत राजाच्या विक्षिप्तपणाची तो थट्टा करी व त्याचे मनोरंजन करी.
गानेरिलला विदूषकाचे वागणे आवडत नसे. तिने एक दिवस आपल्या वडिलांना विचारले— "बाबा, तुम्हांला एवढे नोकर माणसे कशासाठी पाहिजेत? या सर्वांनी मिजास राखणे कठीण झाले आहे." आपल्या मुलीचे बोलणे ऐकून राजाला राग आला. आपण दिलेले अर्धे राज्य घेऊन सुद्धा तिच्या मनात असा विचार यावा! संतापाच्या भरात तो आपल्या मुलीला वाटेल तसे बोलला आणि शेवटी मी येथे क्षणभर सुद्धा राहत नाही म्हणून सांगून तो तिच्या घरातून बाहेर पडला.
राजाच्या नोकरांत केंटचा मांडलिक होता. त्याने पुढे जाऊन राजाची दुसरी मुलगी रीगन जिला राजा येत असल्याची सूचना दिली. तो तिथे पोहोचला तेव्हा गानेरिलने पाठवलेला माणूसही तिथे आलेला होता. घाईतच त्याने मोठ्या बहिणीच्या घरून राजा धाकट्या बहिणीकडे का येत आहे हा निरोप सांगितला होता. केंट राजाला सगळ्या गोष्टींची कल्पना होती. त्या नोकराचे व त्याचे गानेरिलच्या घरी एकदा फार मोठे भांडण झाले होते. त्यावेळी त्या नोकराची एकदा हजेरी घेतली गेली होती. आता सुद्धा त्याला पुढे आलेला पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली. म्हणून आताही त्याने त्याचा खूप समाचार घेतला. त्यांची मारामारी चालली असता रीगनने त्यांना पाहिले व केंटच्या राजाला कैद करविले.
राजा रीगनच्या घरी आला. येताच आपल्या नोकराला कैद केलेले त्याला दिसले. "माझे जावई व मुलगी कोठे आहेत?" त्याने विचारले. "रात्रभर त्यांनी प्रवास केला नसल्याने झोपले आहेत, फार दमले आहेत." नोकरांनी सांगितले.
"मला त्यांना भेटावयाचे आहे! बोलवा त्यांना." राजाचे बोलणे ऐकून ती दोघे बाहेर आली. त्यांच्याबरोबर गानेरिल सुद्धा होती. राजाला आश्चर्य वाटले. तो क्रुद्ध होऊन म्हणाला— "मला तोंड दाखवायला तुला लाज नाही वाटत?"
"तुम्ही आपल्या अर्ध्या नोकरांना कमी करा आणि आहोत तसे पुन्हा गानेरिलकडे परत जा." रीगन पुढे येऊन म्हणाली.
"मला वाटते तू गानेरिलप्रमाणे दुष्ट नाहीस. मी आपल्या शंभर नोकरांच्या बरोबर येथेच राहणार आहे." राजाने सांगितले.
"बाबा, कशाला पाहिजेत तुम्हांला शंभर नोकर? पन्नास नोकर सुद्धा जास्तच आहेत. तुम्ही पंचवीस नोकरांना ठेवा. बाकीच्यांना सुट्टी द्या." रीगनने बापाला उपदेश केला.
"ओहो! असे होय!! म्हणजे गानेरिलचे प्रेम एकंदरीत तुझ्या दुप्पट ठरले." राजा कुत्सितपणे म्हणाला— "ती निदान पन्नास नोकरांना ठेवायला तरी तयार होती."
"खरे पाहिले असता तुम्हांला निराळ्या नोकरांची गरजच काय? एवढे नोकर आहेत ते नाही का पुरत. पाहिजे आहेत कशाला ते पंचवीस, नाही पंधरा, नाही पाच. एकाची सुद्धा जरूर नाही." गानेरिल तोऱ्यात म्हणाली. त्याने फार कठोर शब्दांत दोन्ही बहिणींची निर्भत्सना केली. त्याला वाटले येथे नोकर-चाकरांशिवाय राहण्यापेक्षा कोठेतरी निघून गेलेले बरे. या विचाराने तो जवळ जवळ वेडापिसा झाला.
त्या दोघीही बाप आपल्या नोकरांना घेऊन अंधारात वादळात निघून जात असताना सुखात पाहत उभ्या राहिल्या. कोणाचेही मन द्रवले नाही. कोणीही त्याला 'जाऊ नका' म्हणून अडविले नाही. वादळ वाढू लागले होते. राजाचे नोकर वारा सुटेल तिथे सैरावैरा पळून गेले. एकटा विदूषक मात्र त्याच्या पाठोपाठ गेला. राजाला पावसाची, वाऱ्याची, विजेची कशाचीच पर्वा नव्हती. निसर्गाचा झाड सुद्ध उभे नव्हते. जाता जाता तो वाऱ्याशी बोलत होता. म्हणत होता— "बापू देखते! या कृतघ्न मनुष्य जातीचा नायनाट करून टाक."
राजा घरांतून निघून गेल्यावर केंटच्या राजाला रीगनने सोडून दिले. तो त्याच्या मागोमाग आला व म्हणाला— "या अशा भयंकर वादळात आपण येथे कोठे!" बाहेरील वादळापेक्षा राजाच्या मनात जास्त भयंकर वादळ माजले होते. तो तसाच पुढे चालला होता. केंट राजा त्याला न कळत एका झोपडीत घेऊन गेला. तिथे त्याच्या अगोदरच एक भिकारी येऊन विसावा घेत बसला होता. राजा त्याला पाहून म्हणाला— "कृतघ्न मुलींच्या दुर्व्यवहारानेच तुझ्यावर असा प्रसंग आला असला पाहिजे."