All Marathi Stories
राधेश्यामचा हृदयविकार
राधेश्यामचा हृदयविकार
रामनगर जमीनदाराच्या दरबारात राधेश्याम नावाचा एक पंडित होता. दरबाराच्या कविगणांच्या चुका शोधून काढणे हे त्याचे काम होते. जमीनदार राधेश्यामच्या पंडिताने प्रभावित झालेला असल्यामुळे कोणत्याही कवीला प्रथम राधेश्यामची प्रशंसा मिळवणे आवश्यक असे.
राधेश्यामला आपल्या उच्च स्थानाबद्दल फार गर्व वाटे. त्याच्या बोलण्यावरून असे वाटे की, त्याच्या बरोबरीचा कवी कोणी असू शकत नाही. त्याच्या 'हो ला हो' म्हणणाऱ्यांना अन् जमीनदाराच्या निकटच्या व्यक्तींनाच फक्त तो मान देई. बाकी सर्व त्याच्या क:पदार्थ असत. जमीनदार स्वतः भला माणूस होता. कोणाबद्दल बेधडक बोलणाऱ्यांना तो जवळ फिरकूही देत नसे. त्यामुळे राधेश्यामचे दुर्गुण त्याच्या कधीच ध्यानी आले नाहीत.
एक दिवस जमीनदार गाडीतून शेजारगावी जात होता. वाटेत गाडीचे चाक खराब झाले. गाडी थांबवून गाडीवान म्हणाला, "मालक, इथे जवळच आंराई आहे, आपण तिथे जरा आराम करावा. गाडी ठीक झाली, की मी स्वतः बोलवायला येईन."
जमीनदाराने आंराईत प्रवेश केला, तेव्हा त्याला असे दिसले की, एका झाडाखाली काही लोक बसले आहेत. जवळ जाऊन पाहिल्यावर एक माणूस मोठ्या मधुर आवाजात गात असल्याचे त्याला आढळले. तो पदामागून पदे गात होता आणि त्याचा अर्थही समजावून सांगत होता. जमीनदारही त्या गर्दीत मिसळला आणि तन्मयतेने ऐकू लागला. थोड्या वेळाने तो गायक उपस्थित श्रोत्यांना म्हणाला, "आज इतकंच पुरे, उद्या पुन्हा भेटू. आपण आता इथून निघून आपापल्या कामाला लागा."
सर्वजण निघून गेल्यावर जमीनदाराने त्याच्याबाबत विचारपूस केली. त्याला कळले की, गायकाचे नाव गोविंद असून तो स्वरचित काव्य रामनगरच्या जमीनदाराला ऐकवण्यासाठी गेला असता राधेश्यामने त्याला अडवले. सध्या तो आपले पोट भरण्यासाठी या बगीच्याच्या माळ्याचे काम करत असतो. तो रोज शेतात कामाला येणाऱ्या शेतकऱ्यांना आपले काव्य ऐकवून त्याचा अर्थही स्पष्ट करून सांगत असतो.
"असं करण्यामुळे तुझा काय फायदा होतो?" जमीनदाराने गोविंदाला विचारले.
"लोकांनी माझं काव्य ऐकावं, त्यातून आनंद लुटावा यातच मला आनंद मिळतो; मनाला तृप्त वाटतं!" गोविंद उत्तरला.
"पण श्रोत्यांच्या लायकीनुसार काव्याचं महत्त्व वाढत असतं, रामनगरच्या जमीनदारापर्यंत आपलं काव्य पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न तू केला नाहीस, ही तुझी चूक आहे," जमीनदार बोलला.
"माझ्या दृष्टीनं तर जमीनदारापेक्षा हे श्रोतेच मोठे आहेत. कविता ऐकून आनंद लुटण्यात अडथळा आणायला यांच्यात कोणी राधेश्यामसारखा माणूस तरी नाहीये. हे रोज माझ्याकडे येऊन मोठ्या आवडीनं माझं काव्य ऐकतात. यामुळे मला आत्मतृप्ती मिळते," गोविंदाने सांगितले.
आता जमीनदाराने 'आपण कोण' हे सांगितले. नंतर तो म्हणाला, "राधेश्याम हा महान पंडित आहे. काहीतरी चूक झाली असावी. माझी इच्छा आहे की तू माझ्या दरबारात येऊन माझा सत्कार स्वीकारावास."
आताच गोविंदाला समजले की, हा माणूस दुसरा कोणी नसून खुद्द रामनगरचा जमीनदार आहे. त्याला आपल्या वर्तणुकीबद्दल पश्चात्ताप वाटला. तो म्हणाला, "माझ्याकडून अजाणता चूक घडली असेल, तर मला माफ करा. पण राधेश्यामसारखा अडथळा वाटत असताना दरबारात यायची माझी इच्छा नाही."
आपली अंगठी काढून गोविंदाच्या हाती देत जमीनदार म्हणाला, "ही दाखवलीस की, कसलाही अडथळा न येता तू सरळ माझ्यापर्यंत येऊ शकशील. आज आहे पंचमी. दशमीच्या दिवशी मी तुझी वाट पाहीन."
गोविंदाने त्याला विनयपूर्वक नमस्कार केला. इतक्यात गाडीवाला येऊन जमीनदाराला बोलावून घेऊन गेला.
दशमीच्या दिवशी गोविंद जमीनदाराला भेटला आणि त्याने भरल्या दरबारात आपले काव्यपठण केले. जमीनदाराने खूश होऊन त्याला हजार अशफऱ्या देण्याची आज्ञा दिली, तेव्हा हस्तक्षेप करत राधेश्याम म्हणाला, "स्वामी, या दरबारात सन्मान मिळवण्यासाठी योग्य तोच ठरवायचा निर्णय मी घ्यायचा असतो. माझा असा निर्णय आहे की, हा कवी सन्मान मिळवायला योग्य नव्हे!"
"आपला निर्णय मी नेहमी मानत आलो आहे, पण फक्त एकदाच यावेळी आपण माझा निर्णय मान्य केलात, तर बरं होईल. ही माझी केवळ विनंती आहे." जमीनदार हसत बोलला.
"स्वामी, योग्य व्यक्तींचा निर्णय मी नेहमीच कबूल करतो. पण या दरबारात कवीची योग्यता पारखू शकेल असा माझ्याशिवाय दुसरा योग्य माणूस नाही," राधेश्याम बोलला.
जमीनदाराचा चेहरा आता रागाने लाल झाला. पण मोठ्या कष्टाने स्वतःला सावरत तो म्हणाला, "योग्यतेबाबत मला कदाचित कळत नसेलही, पण सन्मान मिळवण्याचा हक्कदार कोण, इतकं तरी मला नक्की समजतं." अन् दिवाणाला उद्देशून तो म्हणाला, "दिवाणजी, मी सांगितल्याप्रमाणे कवीचा सत्कार करा."
राधेश्याम हा अपमान सहन करू शकेना! तो म्हणाला, "आपण आपल्या अधिकाराच्या अहंकारामुळे आपला विवेक विसरलात. यामुळे आपलंच अहित होईल. पंडित म्हणून मी आपणाला सावध करत0 आहे. माझं ऐका अन् हा सन्मान थांबवा. तसं घडलं नाही, तर इथून पुढे कवींच्या चुका ओळखायची माझी जबाबदारी नाही."
"दुसऱ्यांच्या अहंकाराबद्दल बोलण्याआधी स्वतःच्या अहंकाराबद्दल विचार करा पंडिती! पंडिताला अहंकार शोभत नाही. आपणाला हा माझा सावधगिरीचा इशारा आहे," जमीनदार बोलला.
हा घोर अपमान सहन न होऊन राधेश्यामने घरी पोहोचल्यावर सारी हकीकत सांगितली आणि जमीनदाराबद्दल तिच्यासमोर खूप भळेबरे भरला. ती त्याला घाबरून जाऊन ताबडतोब वैद्याला बोलावून घेतले, तपासणी करून वैद्य म्हणाला, "हा हृदयविकाराचा तीव्र झटका आहे. योगाचार्या वैद्य सनातन हाच यावर उपाय करू शकतो. पण तो राजा अन् जमीनदारांना सोडून इतर कोणावरही उपचार करत नाही."
जमीनदाराला याबद्दल कळल्यावर त्याने ताबडतोब राधेश्यामला योगापुराला पाठवायची व्यवस्था केली; सनातनकडून उपचार करायची व्यवस्था केली. अनेक प्रकारानी तपासणी करून सनातन म्हणाला, "हा मानसिक रोग आहे. खरे कारण कळल्यावरच उपचार होऊ शकेल. तोपर्यंत हा बरा होण्याची काहीच शक्यता नाही."
सनातन म्हणाला, "मी केवळ वैद्य आहे, पंडित नव्हे; हे खरं आहे. पण तुझ्या रोगाचे मूळ कारण जाणूनवाचून चिकित्सा करणं, मलाही शक्य नाही. आपल्या शिष्याला रामनगरला पाठवून मी पूर्ण माहिती मिळवीन, तुझ्या रोगाचं कारण तिथे असेल, तर कळेलच मला."
सनातनचा शिष्य रामनगरला गेला व त्याने सर्वत्र चौकशी केली. एका प्रमुख माणसाने त्याला म्हटले, "राधेश्यामला हृदयविकार झाला असला तर नवल नाही. आपल्या मुलाचं बोलणं न ऐकून घेत नाही. बापाचं अन् मुलाचं भांडण झाल्यावाचून एक दिवसही जात नाही. शेवटी इतकं झालं की बापाने मुलाला घरातून हाकलून दिलं; अन् त्यामुळेच त्याच्या छातीत कळ आली."
दुसऱ्या एका माणसाने म्हटले, "मला याचं मूळ कारण माहीत आहे, राधेश्यामच्या शेजारी सुग्रीव राहतो. या दोन घरामध्ये भागीदारीतील भिंत आहे. या विषयावरून दोघात नेहमी भांडण होत असतात. रोगाचं कारण तेच आहे."
"हा सुग्रीव कशा प्रकारचा आहे?" शिष्याने विचारले.
"राधेश्याम सोडला तर त्याला दुसरा कोणीही शत्रू नाही." त्या माणसाने सांगितले. शिष्य आणखी लोकांना भेटायला निघाला.
राधेश्यामची चार एकर जमीन होती. नोकरांकडून तो ती कसून घेत असे अन् दररोज त्यांच्याशी भांडत असे. एकाने त्याच्या आजाराचे हे कारण सांगितले; तर दुसरा एकजण म्हणाला की, राधेश्यामचा गवळी दुधात पाणी घालतो म्हणून तो चिडून आरडाओरडा करत असतो.
शिष्याने जवळजवळ वीस लोकांकडून माहिती केली. त्यातल्या प्रत्येकाने राधेश्यामच्या हृदयविकाराचे निरनिराळे कारण सांगितले. एका हृदयरोगाची इतकी कारणे? शिष्य आश्चर्यचकीत झाला आणि परत येऊन त्याने सर्व काही गुरुला सांगितले. राधेश्यामने त्यांच्यातला सारा संवाद ऐकला. सनातन त्याला म्हणाला, "ऐकलंस नं? रामनगरच्या बऱ्याच जणांना तुझ्या हृदयरोगाबद्दल अगोदरच माहिती आहे. त्यांना त्याची कारणेही माहीत आहेत. इतकी जी कारणे आहेत, त्यातलं तुला हृदयरोग होण्याचं मुख्य कारण तूच शोधायला हवं."
राधेश्याम आता मान खाली घालून म्हणाला, "मी स्वतःच खरं कारण सांगावं अशी तुमची इच्छा आहे ना? ज्या दिवशी मी रोगाने पछाडून तुमच्याकडे आलो, त्याच दिवशी तुम्ही खरं कारण ओळखलं. जितकी कारणे माझ्या ध्यानी आली, ते म्हणजे माझा अहंकार! मी त्याचा त्याग केला नाही, तर माझ्या मनाला शांती मिळणार नाही. ते कायमचं अशान्त राहील. हा हृदयरोग हटवायला आधी मन शांत व्हायला हवं. बरोबर आहे ना? पण हा अहंकार कसा पळवून लावावा हे कळत नाही मला. आपण सांगा त्यासाठी मला काय करायला हवं?"
सनातन हसत म्हणाला, "तुझ्यात अहंकार भरला आहे, हे कबूल केलंस ते बरं झालं. सत्य समजलं हेच खूप झालं. यामुळे हळूहळू तुझा अहंकार कमी होत जाईल." थोडे दिवस वैद्याने राधेश्यामवर उपचार करून त्याला परत पाठवले.
यानंतर राधेश्यामला आपल्या मुलाचे बोलणे बरोबर वाटू लागले. आसपासचे लोक त्याला आवडू लागले. जमीनदार आता त्याला सर्वगुण संपन्न माणूस भासू लागला. सर्वांच्या चुका त्याला क्षम्य वाटू लागल्या. कवींच्या कवितांत काही चूक वाटलीच, तर तो स्वतः ती सुधारायला मदत करू लागला.