Bookstruck

लक्ष्मीचा जय

विष्णूच्या मनात एकदा असा अहंकार झाला की तोच सर्व सृष्टीचा पालनकर्ता आहे. एकदा तो त्याची पत्नी लक्ष्मी हिला म्हणाला— "देवी! सर्व लोकपाल, दिक्पाल माझ्या अधीन आहेत. सर्व प्राण्यांचे रक्षण मीच करतो. माझे भक्त कधी तुझ्या मायाजाळात सापडत नाहीत." ते ऐकून लक्ष्मी म्हणाली— "हा सर्व निव्वळ भ्रम आहे तुमचा. सर्व सृष्टीची खरी अधिकारिणी आणि मूळ मीच आहे. माझ्या कृपेवरच कोणाचे थोरपण अगर लहानपण अवलंबून आहे. माझी कृपा ज्याच्यावर असेल त्याचाच सर्व आदर करतात. पाहिजे तर मी म्हणते त्याची खात्री करून घ्यावी." विष्णूने ते आव्हान स्वीकार केले आणि दोघे मर्त्यलोकात योगी व योगिणीचा वेष करून निघाले. एका गावी एक वैष्णव भक्त वैश्य रहात असे. त्या दिवशी सोसाट्याचा वारा सुरू झाला. प्रथम गारा पडू लागल्या आणि त्याच्या पाठोपाठ मुसळधार पाऊस पण पडू लागला. रस्त्यावर हिंडणाऱ्यांना तर कुडकुडत कोठे तरी निवाऱ्याला उभे राहावे लागले. त्याप्रमाणे योगी वेष धारण करून आलेला विष्णू कुडकुडत वैश्याच्या दारासमोर आला. त्या वैश्य वैष्णवभक्ताने योग्याला घरात बोलाविले आणि नम्रपणे म्हणाला— "योगीश्वर! हे आपलेच घर आहे. आत यावे आणि आपल्याला वाटेल त्या खोलीत विश्राम करावा. मी सर्व घर आपणाला दाखवून देतो." त्या योग्याने त्या वैश्याबरोबर हिंडून सर्व घर पाहिले. एका कोपऱ्यात एक लहानशी कोठडी होती. ती दाखवून म्हणाला— "मला ही खोली आवडली. मी येथे राहतो." "योगीश्वर! अहो या खोलीत आम्ही घरातली फालतू अडगळ ठेवली आहे. या अडगळीच्या खोलीत आपल्याला मी कसे ठेवू?" वैश्य म्हणाला. "आम्ही योगी लोक, आम्हांला एकांत हवा." योगी म्हणाला. शेवटी नाइलाजाने वैश्याने ती कोठडी रिकामी करून तेथे योग्याच्या उतरण्याची व्यवस्था करून दिली. योग्याने आत खोलीत गेल्यावर दाराला आतून कडी लावून घेतली. तेव्हा विष्णूच्या मनात सहज आले— "माझ्या भक्ताने मला आश्रय दिला, पण बिचाऱ्या लक्ष्मीचे काय होणार कोणास ठाऊक? तिला कोण आश्रय देणार? तिला नक्कीच हार मानावी लागेल." इतक्यात योगिणीच्या वेषात लक्ष्मी त्याच वैश्याच्या घरासमोर येऊन कुडकुडत उभी राहिली. वैश्य तिचे रूप लावण्य पाहून थक्क झाला. बाहेर येऊन म्हणाला— "माते योगिणी! या भयंकर थंडीत तू अशी उघड्यावर का फिरते आहेस? तुला हरकत नसेल तर माझ्या घरी थोडा वेळ विश्राम घे!" योगिणी घरात येऊन म्हणाली— "मला फार तहान लागली आहे." वैष्णव भक्त वैश्याने नोकराकरवी तिला पाणी मागवून दिले. ते पाणी योगिणीने आपल्या झोळीतून एक सोन्याचा रत्नखचित पेला काढून त्यात ओतले व सर्व पाणी पिऊन पेला बाहेर फेकून दिला व म्हणाली— "मला आणखी पाणी पाहिजे." वैश्य चकित होऊन विचारू लागला— "माते योगिणी! तू तो सोन्याचा पेला असा फेकून कां दिलास?" योगिणी म्हणाला— "आम्ही एकदा तोंड लावून ज्या पेल्याने पाणी पितो तो पेला पुन्हा तोंडाला लावीत नाही. आणखी पाणी मागवा." अशा तऱ्हेने योगिणीने चार पाच पेले पाणी पिऊन झाल्यावर फेकून दिले. ते सर्व पाहून वैश्याला परमावधीचे आश्चर्य वाटले. वैश्याची बायको तीन-चार वर्षांपूर्वीच वारली होती. त्याने विचार केला की ही योगिणी आपल्याशी लग्न करून आपली बायको म्हणून राहायला तयार झाली तर किती बरे होईल? आणि तिला तो म्हणाला— "माते योगिणी! तुझे सर्व कपडे भिजून ओले चिंब झाले आहेत. कपडे बदलून जेवून घे आणि त्यानंतर पाहिजे तितका वेळ विश्राम घे. हे घर आपलेच समज आणि या घरात तुला जी खोली आवडेल त्या खोलीत खुशाल पाहिजे तितके दिवस राहा." त्या वैश्याबरोबर योगिणीने त्याचे सर्व घर पाहिले. आणि योगी उतरला होता त्या कोठडीजवळ उभी राहून म्हणाली— "ही खोली पाहू कशी आहे ती! हीच माझ्या राहण्यालायक आहे." "पण माते योगिणी! ही खोली तुझ्या लायक नाही. या शिवाय या खोलीत थोड्याच वेळापूर्वी एक योगी उतरला आहे. म्हणून तू दुसरी खोली पाहून घे." पण योगिणीने त्याच खोलीसाठी हट्ट धरला. म्हणून वैश्याने दाराची कडी बाहेरून वाजविली आणि म्हणाला— "योगीराज! आपण ही खोली रिकामी करून दुसऱ्या खोलीत रहावे." "मी या वेळी योगासने करीत आहे. जागेवरून हलू शकत नाही. मी याच खोलीत राहणार." योग्याने आतून उत्तर दिले. वैश्याने योगिणीला दुसऱ्या खोलीत राहण्यास आग्रह केला. पण तिने त्याच खोलीत राहण्याचा हट्ट धरला. म्हणून वैश्याने पुन्हा दाराची कडी वाजविली आणि नम्रपणे दुसऱ्या खोलीत जायला योग्याला सांगितले. परंतु योग्याने त्या गोष्टीस साफ नकार दिला. तेव्हा वैश्याला राग आला. त्याने आपल्या नोकरांना बोलावून धक्के मारून दार उघडविले आणि नोकरांना म्हणाला— "या योग्याला बाहेर काढा." वैश्याचे नोकर योग्याला हात धरून बाहेर काढू लागलेले पाहून योगिणी हसू लागली. नंतर ती वैश्याला म्हणाली— "तुम्ही जाऊन माझे जेवण वाढून घेऊन या." वैश्य स्वयंपाकघरात जाऊन योगिणीच्या जेवणाची तयारी करू लागला. वैश्य निघून गेल्यावर योगिणी खोलीबाहेर आली आणि योग्याला म्हणाली— "पाहिलात माझा प्रताप? सर्व जगावर कोणाचा अधिकार आहे?" विष्णूने काहीच उत्तर दिले नाही. दोघे काही बोलल्याशिवाय किंवा कोणाच्या नजरेस पडल्याशिवाय घराबाहेर पडले आणि एका देवळात आले. ते विष्णूचेच देऊळ होते. एका राजाने ते बांधले होते. त्याच्या आज्ञेप्रमाणे देऊळ ठरल्यावेळी उघडले जाई अगर बंद होई. ते देऊळ पाहून विष्णूला या देवळात लक्ष्मीची डाळ शिजणे शक्य नाही असे वाटले. याशिवाय त्या देशाचा राजा व प्रजा विष्णूभक्त होते. कोणी लक्ष्मीला कुलदैवत मानीत नसे. म्हणून विष्णू लक्ष्मीला म्हणाला— "देवी! आपण येथेच काही दिवस राहिलो तर कसे?" "स्वामी! मी आपली दासी आहे! आपली इच्छाच माझी इच्छा. पण येथे आपल्याला माझ्यापेक्षा जास्त मान मिळेल असे मात्र समजून घेऊ नका. सर्वात जय माझाच आहे." लक्ष्मी म्हणाली. दोघांनी देवळात जाऊन विश्राम केला. दुसऱ्या दिवशी पहाटे पुजाऱ्याने देवळात येऊन पूजा सुरू केली. दर्शनाला भक्त मंडळी येऊ लागली. सर्वांनी विष्णूचे स्तोत्र म्हटले. एकाने देखील लक्ष्मीचे नाव घेतले नाही. विष्णूला आनंद गगनात मावेनासा झाला. ठीक दुपारच्या वेळी राजाच्या आज्ञेप्रमाणे देऊळ बंद झाले. विष्णू लक्ष्मीला चिडविण्यासाठी म्हणाला— "देवी! पाहिलेस एकाने देखील लक्ष्मीचे स्तोत्र म्हटले नाही. बोल आतां, आहे की नाही जगावर माझाच अधिकार?" विष्णूने लक्ष्मीला विचारले. लक्ष्मी स्मित करून म्हणाली— "इतका वेळ आपण भक्तांना दर्शन देऊन थोडे दमला असाल. म्हणून थोडा वेळ विश्राम करावा म्हणते." त्याच वेळी राजाच्या मनात पुजारी नियमितपणे देऊळ उघडतो किंवा बंद करतो की नाही याची खात्री करून घेण्याचा विचार आला. तो एका व्यापाऱ्याचा वेष धारण करून देवळात आला व पुजाऱ्याला म्हणाला— "अहो भटजी! मी दर्शनाला आलो आहे. देऊळ उघडा." "शेटजी, बारा वाजल्यानंतर गाभाऱ्याचे दार उघडू नये अशी राजाज्ञा आहे. आता संध्याकाळी चार वाजल्यानंतरच दर्शन होईल." पुजारी व्यापाऱ्याला म्हणाला. "अहो भटजी, पण त्यात कायदा कसला आणि राजाज्ञा कसली? मला गुपचूप दर्शन करून घेऊ द्या. मी परदेशी आहे. देवाच्या अभिषेकासाठी एक हजार रुपये देणार आहे मी! मला लवकर परत जायचे आहे. देवाच्या अभिषेकासाठी एक हजार रुपये दिल्याचे पुण्यकार्य घडले तर कृतार्थ होईल." असे सांगून व्यापारी पुजाऱ्याकडे पाहू लागला. समोर आलेल्या लक्ष्मीला पाठ दाखविणे शहाणपणाचे नाही, असे पुजाऱ्याला वाटले. या व्यापाऱ्याला दर्शन घडले तर त्यात नुकसान काय? राजाला तरी हे कसे काय कळणार? असा विचार करून पुजारी व्यापाऱ्याला म्हणाला— "शेटजी! या, तुम्हांला असे परत पाठविणे बरं वाटत नाही मनाला. देवाला राग येईल." व्यापाऱ्याने एका हजारा ऐजी दोन हजार देवासमोर ठेवले. आणि देवाच्या पायां पडून तीर्थ प्रसाद घेऊन निघून गेला. राजवाड्यात गेल्यावर राजाने पुजाऱ्याला बोलावून विचारले— "काय भटजी? देवाची पूजा वगैरे वेळेवर होते आहे ना?" "होय महाराज! सर्व व्यवस्थित चालू आहे!" पुजारी म्हणाला. "राजाज्ञेप्रमाणे ठरल्या वेळेला देऊळ उघडण्याची व बंद होण्याची व्यवस्था चालू आहे ना? नाहीतर अवेळी कोणी शेट-सावकार आला की उघडले देऊळ! असे नाही ना होत?" राजाने विचारले. आपले बिंग फुटल्याचा पुजाऱ्याला संशय आला. म्हणून जरा बतावणी करीत म्हणाला— "ठरल्या वेळेवरच बंद होते व उघडते. समजा, आपण एकांतात विश्रांती घेत पडला आहात आणि राणी सरकार आल्या तर पाहरेकरी दार उघडतील की नाही? अशाच तऱ्हेने लक्ष्मीमातेनेच देवळात जायचे आहे म्हटले तर दार उघडावे लागते!" पुजाऱ्याच्या त्या चातुर्यपूर्ण उत्तरावर खुश होऊन राजाने त्याला आणखी दोन हजार रुपये बक्षीस देऊन निरोप दिला. अशा तऱ्हेने विष्णूला लक्ष्मीसमोर हार मानावी लागली. लक्ष्मी विष्णूला म्हणाली— "स्वामी! आपण माझी माया पूर्णपणे ओळखली नाही. सृष्टीच्या सुरुवातीपासूनच माझा हा अधिकार चालू आहे. जे दिसते ते आणि जे दिसत नाही ते सर्व माझ्याच कृपेने चालू आहे. वास्तविक पुरुषाची शक्ती नारीच आहे. आपल्यात जी शक्ती आहे, म्हणजे आपली लीला ती मीच नाही का? म्हणून माझ्या पराभवाचा प्रश्नच उद्भवत नाही."