All Marathi Stories
लक्ष्मीपती
लखनपूर गावात लक्ष्मीपती नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची बायको आणि एक पंधरा वर्षांची मुलगी, एवढेच त्याचे कुटुंब होते. आजोबा आणि वडिलांकडून मिळालेली पाच एकर सुपीक जमीन, एवढीच काय ती त्याची मालमत्ता होती. जवळच्या पर्वतातून खळाळत येणारा एक झरा त्याच्या शेतातून पुढे वाहत जात होता. पण तिथे तीन चार वर्षांपासून पाऊस न पडल्याने तो झरा जवळजवळ कोरडा पडला होता.
झऱ्याला भरपूर पाणी होते, तेव्हा इतर खेडुतांप्रमाणेच तोही आपल्या शेतातून पिके घेऊन आपल्या गरजा भागवत असे. आता पाण्याचीच कमतरता भासू लागल्याने, गावातील बरेचसे लोक मोलमजुरी करून उपजीविका करावी, या हेतूने गाव सोडून जाऊ लागले.
परंतु लक्ष्मीपती मात्र, ज्याच्याविषयी त्याने बरंच काही ऐकलं होतं, अशा दंडकारण्यात सापडणाऱ्या हिरेमाणकांविषयीचा विचार करू लागला. मागच्या महिन्यात घरासाठी आवश्यक सामान आणण्यासाठी तो शहरात गेला होता, तेव्हा वाटेत एका धर्मशाळेत तो थांबला होता.
त्याच वेळेला तिथे उतरलेले इतर प्रवासी या हिरेमाणकांविषयी आपापसांत बोलत होते. तेव्हा त्याने नीट लक्ष देऊन त्यांचे बोलणे ऐकले.
त्यांच्यातील एक प्रवासी दीर्घ सुस्कारा टाकत बोलला, "काही म्हणा, पण आपले नशीब मात्र जोरावर पाहिजे हं. अलीकडेच माझे दूरचे तीन नातेवाईक त्या दंडकारण्यात गेले, पण त्यांच्यातील फक्त एकालाच हिरे माणके सापडली. बाकीचे दोघे निराश होऊन घरी परतले."
दुसऱ्या एका प्रवाशाने म्हटले, "ज्यांना कोणाला स्वतःचे नशीब आजमावून पाहायचे असेल, त्याने घर सोडून तिथे जायचे धाडस केले पाहिजे."
बाकी प्रवाशांनीही त्याच्या बोलण्यास दुजोरा दिला. सगळ्यांचेच म्हणणे होते की 'काही मिळवायचे असेल तर काही तरी गमवावे लागते'. प्रवाशांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकल्यावर लक्ष्मीपतीने मनाशी एक निर्णय घेतला.
घरी परतताच त्याने आपल्या बायकोला बोलावले आणि धर्मशाळेत ऐकलेल्या गोष्टींचा थोडक्यात खुलासा करून म्हटले, "थोड्या दिवसांसाठी तू आपल्या भावाच्या गावी जाऊन तिथेच राहा. त्या हिरेमाणकांबाबत आपले नशीब आजमावून मी परत येतो."
लक्ष्मीपतीच्या बायकोला चांगलेच माहीत होते की आपला पती हट्टी आहे, म्हणूनच नवऱ्याच्या नकळत तिने आपल्या भावाला ही बातमी कळवली. मेव्हण्याने लक्ष्मीपतीला समजावत म्हटले, "पंत, आपला निर्णय मला अजिबात योग्य वाटत नाही. भलताच मोह आणि आशा शेवटी त्रासाला कारणीभूत होतात. दंडकारण्यात जायचा विचार सोडून द्या. इथे तीन चार वर्षे पाऊस पडला नाही, याचा अर्थ असा नाही की याही वर्षी पाऊस पडणार नाही. तुम्ही निराश होऊ नका."
तरीसुद्धा आपल्या मेव्हण्याचे बोलणे न ऐकता लक्ष्मीपती दंडकारण्याकडे जाण्यासाठी निघाला. तिथे पोहोचल्यावर इतर काही लोकांबरोबर हिरे माणके मिळवण्याचा प्रयत्न सहा महिन्यांपर्यंत करत राहिला. परंतु तिथे त्याला काहीच मिळाले नाही. शेवटी आजारी पडून तो घरी परतला.
त्याला बरे होण्यासाठी दोन आठवडे लागले. एवढ्यात तिथे पाऊस पडायला सुरुवात झाली. झरा पुन्हा खळाळत वाहू लागला. त्याच्या प्रवाहाबरोबर छोटे छोटे दगड, खडे वाहत येऊ लागले.
झऱ्याचे पाणी वाढतच गेले. त्यामुळे लक्ष्मीपतीच्या शेतातही गुडघ्याएवढे पाणी साठले. या एवढ्या पाण्यात नांगरणे शक्यच नव्हते. म्हणून त्याने शेताच्या कडेचा बांध तोडून टाकला. शेतात प्रवाहाबरोबर येणाऱ्या छोट्या दगड-धोंड्यांना तो बाहेर फेकू लागला. आणि तेव्हाच अचानक त्याला जाणवले की इकडे तिकडे विखुरलेल्या दगड-गोट्यांत दोन खडे चमकत आहेत. ते दोन चकाकणारे खडे त्याने घरी नेऊन आपल्या मेव्हण्याला दाखवले. थोड्या वेळ आपल्या तीक्ष्ण नजरेने बारकाईने निरीक्षण करत त्याने म्हटले, "हे तर अशुद्ध रूपातील हिरे आहेत. पहा पंत, दुसरी तिसरीकडे कुठेच नाही. पण तुमचे भाग्य तुमच्या शेतातच दडले आहे."