लल्लूची हुशारी
लक्ष्मीपुरातल्या भूस्वामीच्याकडे लल्लू नावाचा एक माणूस शेतीकाम व शहरात जाऊन घरासाठी लागणारे सर्व सामान बाजारातून आणण्याचे काम करीत होता. गावकऱ्यांचे म्हणणे होते की लल्लू हुशार आणि हजरजबाबी आहे. हे ऐकल्यावर तो म्हणायचा, "मी खरंच तसा आहे की नाही ते मला ठाऊक नाही, कारण ही हुशारी काही मला प्रगती करायला मदत करीत नाही. भूस्वामी जो काही पगार देतात त्यांत आमचे पोटपाणी जेमतेम भागते. काम तर सतत करावे लागतेच की!"
भूस्वामीकडे चार बैलांच्या जोड्या होत्या. त्यातल्या एका जोडीचे बैल आता म्हातारे झाले होते. गाडीला जुंपणे, नांगरणे ही कामे त्या बैलांना झेपेनात. भूस्वामीने विचार केला की आणखी एक बैलजोडी विकत घ्यावी. त्या कामासाठी तो आपला अठरा वर्षांचा तरुण मुलगा अर्जुन व लल्लू यांना घेऊन दर मंगळवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजाराला गेला.
बाजाराचे मैदान गायी, बैल व गोजिरवाणी वासरे यांनी खच्चून भरलेले होते. लल्लू व अर्जुनच्या पसंतीने भूस्वामीने दोन छोटे छोटे बैल खरेदी केले व त्यांना हाकत ते सर्वजण घरी परतले. पाऊस येण्यापूर्वी त्या बैलांना कामाची सवय व्हावी, म्हणून अर्जुन त्यांना गाडीला जुंपून शेतावर नेऊ लागला.
लल्लूने अर्जुनला सांगितले, "धाकटे मालक, हे दोन्ही बैल अजून तरणेबांड व दांडगे आहेत. तुम्हीही तरुण आहात आणि त्यांच्यासारखेच आहात, तेव्हा जरा जपून राहा!"
दोन आठवडे उलटले. एके दिवशी सकाळीच अर्जुन त्या नव्या बैलांना गाडीला जुंपून शेतावरून घरी परत येत होता. रस्त्यातल्या एका वळणावर बैल एकदम बिथरले आणि समोरून लल्लू चालत येत होता, त्याच्या अंगावर गाडी ओढत गेले. लल्लूला काही फारसे लागले नव्हते, पण तो जमिनीवर पडला होता; तो तसाच हातपाय झाडत राहिला.
गावकऱ्यांनी त्याची ही अवस्था पाहिली आणि अर्जुनला रागावत त्यांनी लल्लूला त्याच्या घरी पोहोचवले. घरी गेल्यानंतर लल्लू कण्हू लागला. त्याच्या नजरेत ओळख दिसत नव्हती, जणू काही सगळे चेहरे त्याला अनोळखी दिसत होते. त्याची अवस्था पाहून गावकऱ्यांनी ठरवले की आणखी काही दिवस तरी लल्लूला काम करता आले नसते. त्यांनी भूस्वामीला सांगितले, "लल्लू तुमच्यावरच अवलंबून आहे. दुर्दैवाने आता त्याची स्थिती अगदी दयनीय आहे. त्याला मदत करायची तुमचीच जबाबदारी आहे."
भूस्वामीला वाटले की आता जर लल्लूची देखभाल केली नाही तर गावात आपली बदनामी होईल. म्हणून तो लगोलग लल्लूच्या घरी गेला. त्याची नीट विचारपूस केली आणि त्याच्या बायकोला दोन हजार रुपये देऊन भूस्वामीने सांगितले, "माझ्या मुलाच्या हलगर्जीपणामुळे हे झाले आहे. लल्लू जेव्हा चांगला बरा होईल तेव्हा त्याला जास्त कष्टाची कामे मी करू देणार नाही. त्याने शेतातल्या मजुरांवर नुसते लक्ष ठेवले तरी पुरे!"
भूस्वामीच्या दयाळूपणामुळे लल्लूची पत्नी भारावून गेली. तिचे डोळे पाणावले. भूस्वामी गेल्यानंतर ती लल्लूला म्हणाली, "पाहिलंत, थोरले मालक किती दयाळू आहेत! तेव्हा आता तुमचे हे लागल्याचे नाटक पुरे झाले! तुम्ही आता कामावर जायला लागा."
त्यावर लल्लूने हसतच तिला म्हटले, "मी जर लगेच हिंडायला-फिरायला लागलो तर गाववाले मला खोटा ठरवतील. निदान कमीत कमी महिनाभर तरी मला घरी बसून विश्रांती घेऊ दे! आजपर्यंत मालक माझ्याकडून भरपूर काम करून घेत होते आणि बेताचा पगार देत होते. अशा कंजूष मालकाकडून व्याजासकट वसुली केली हेच मोठे काम मी केलंय. चल, तूही तुझ्या कामाला लाग!"