लांचखाऊ
एका देशात कापूस खूप पिकत असे. परदेशातले लोक पुष्कळ किंमत देऊन कापूस विकत घेत. त्यामुळे कापसाचे भाव फार वाढत गेले. तरी देशातल्या गरजा भागविण्या इतका पैसादेखील देशात उरत नसे.
म्हणून राजाने परदेशात जाणाऱ्या कापसावर कर लावून त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी आणि तो वसूल करण्यासाठी एक विशेष अधिकारी नेमला. तो कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांकडून लांच घेऊन त्याला पसंत पडेल तो कापूस निर्यात होऊ देई. त्याने सर्व हिशोब मात्र खोटाच ठेवला. हळूहळू त्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांकडून जास्त जास्त लांच घ्यायला सुरवात केली. प्रजेला कापूस पिकविण्यासाठी केलेला खर्चदेखील मिळणे अशक्य वाटू लागले. तेव्हां त्यांनी सर्वांनी मिळून शेतकी खात्याचे जे मंत्री होते त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे नेले. म्हणाले-"या राज्यातले अधिकारी लबाड आहेत. हा कापसावरचा अधिकारी तर नुसता लांचखाऊ आहे. याला काढून टाकून दुसऱ्या चांगल्या अधिकाऱ्याला नेमावे." अशी विनंती केली.
मंत्र्याने सहानुभूती दाखवीत म्हटले-"तुम्ही सर्वजण प्रत्येकी मला एक एक हजार रुपये द्या. मी त्याला काढून टाकून दुसऱ्याला नेमतो."