All Marathi Stories
लायकीची परीक्षा
कलिंगदेशच्या वृद्ध मंत्र्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे राजा कीर्तिवर्धनसमोर कठीण समस्या उभी राहिली. कलिंग हा केवळ विशाल देश होता एवढेच नव्हे, तर तो एक सुसंपन्न राज्यही होते. त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे आसपासच्या राजांवर त्याचा दबदबा निर्माण झाला असून, प्रत्येकाला या देशाबद्दल आकर्षणही वाटे. कसेही करून हे राज्य आपल्या ताब्यात यावे यासाठी प्रत्येक जण आतुर होता. अन् यासाठी ते सर्व योग्य संधीच्या शोधात होते. असे राज्य सुस्थिर ठेवण्यासाठी अन् सुचारू पद्धतीने चालवण्यासाठी सुयोग्य व दक्ष अशा महामंत्र्याची आवश्यकता असते, अन् त्याला चतुर व राजतन्त्राबाबत पूर्णतया माहीतगार असणे जरुरीचे असते.
मृत महामंत्री हा केवळ प्रतिभावानच नव्हे, तर खूपच अनुभवी होता. त्याच्यासारखा कोणी सुयोग्य माणूस राजाला राजधानीत आढळला नाही.
खूप विचार केल्यानंतर कीर्तिवर्धनने राज्यात एक दवंडी पिटवली. दवंडीत असे जाहीर करण्यात आले की, "कलिंगदेशच्या मन्त्रीपदासाठी एक योग्य व समर्थ व्यक्तीची आवश्यकता आहे. त्याने बुद्धिमान, प्रतिभावान व ज्ञानी असणे जरुरीचे आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर तेज असेल व ज्याला पाहताच 'महामंत्री' म्हणून रुबाबदार वाटतील अशाच व्यक्तींनी आवेदन पाठवावे. त्याच्या योग्यतेची परीक्षा पाहून निवड केली जाईल."
महामंत्री बनण्यासाठी चतुर, बुद्धिमान, प्रतिभावान वगैरे असणे जरूर ही गोष्ट ठीक, परंतु चेहऱ्यावर तेज व कांति असावी ही अट नागरिकांना फारशी रुचली नाही. पण याकडे राजाचे लक्ष वेधायचे धाडस मात्र कोणातही नव्हते.
खरे तर कलिंगदेशात प्रतिभावंतांचा दुष्काळ अजिबात नव्हता. परंतु तेज व चमक यांचा जो उल्लेख दवंडीत होता, ते गुण नसल्यामुळे अनेक बुद्धिमान व प्रतिभावान माणसे मन्त्रीपदासाठी पुढे येईनात. जे स्वतःला पूर्ण योग्य समजत होते, असे काही उमेदवार राजाला भेटले; परंतु त्याला ते आवडले नसल्याने सर्वजण निराश होऊन परतले.
त्याच राजधानीत श्रीधर नावाचा एक बुद्धिमान, चलाख व प्रतिभावान माणूस होता. त्याने शास्त्रांचे सखोल अध्ययन केले होते. राजनीति-शास्त्रातही तो पारंगत होता. राज्य-शासनाची पद्धत त्याला उत्तम प्रकारे अवगत होती. त्याच्या योग्यतेच्या परीक्षेत आपली निवड होईल याबद्दलला त्याला खात्री होती. परंतु मुख्य अडचण होती, ती त्याच्या चेहऱ्याची! तो कुरूप होता, रंगाने एकदम काळा असून त्याच्या चेहऱ्यावर देवीचे व्रणही होते. तरीही श्रीधरने मन्त्रीपदासाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्यासाठी त्याने एक योजना बनवली. भल्या सकाळी राजा आपल्या खास उद्यानात फिरत असताना, तो त्याला भेटायला गेला.
त्यावेळी उद्यानाचा पहारेकरी कोणाशी तरी बोलण्यात गुंतला आहे, असे पाहून त्याने सरळ आत प्रवेश केला. राजाच्या डोक्यावर त्यावेळी मुकुटही नव्हता, अन् अंगावरचे कपडेही भरजरी वगैरे नव्हते. अगदी साध्या वेषात तो तिथे शतपाशुली करत होता.
श्रीधर सरळ राजाकडे जाता तेथे झाडांना पाणी घालणाऱ्या माळ्याकडे जाऊन त्याला काकुळतीने विनवू लागला, "महाराज, कशा भरपूर अन् पिळदार आहेत; डोळेही याचे छान चमकदार आहेत. त्यामुळे यालाच राजा समजलो मी. आपला अपमान करायचा उद्देश नव्हता माझा!"
राजा काहीसा रागावून श्रीधरजवळ गेला व त्याने विचारले, "कोणत्या देशाचा आहेस तू?"
श्रीधर उत्तरला, "मी कलिंग देशचा आहे महाराज!"
"या देशाचा नागरिक आहेस, अन् देशाचा राजा कोण आहे, हे नाही माहीत तुला? मी आहे राजा, अन् ज्याच्या समोर ग यावया करत आहेस ना, तो आहे इथला माळी. समजलं?" राजा म्हणाला.
श्रीधरने ताबडतोब राजाला लवून नमस्कार करत म्हटले, "क्षमा असावी महाराज! मी आजपर्यंत आपणाला पाहिलं नव्हतं, म्हणून अशी चूक झाली. आपल्या डोक्यावर आता मुकुट नाही अन् अंगावरची वस्त्रेही भरजरी नाहीत, म्हणून ओळखलं नाही आपल्याला. हा माळी कसा अुंचबिंच अन् तगडा आहे. याचं शरीरही चांगलं मजबूत दिसतंय, मिश्याही छान आहेत. त्यामुळे यालाच राजा समजलो मी. आपला अपमान करायचा उद्देश नव्हता माझा!"
श्रीधरचे हे स्पष्टीकरण ऐकून राजाला आपल्या दवंडीचा मजकूर लक्षात आला. त्याला कळून चुकले की, 'मन्त्रीपदासाठी बुद्धी आणि प्रतिभा असणं पुरेसं आहे. त्या पदासाठी त्याची रूपरेषाही आकर्षक असायची काही गरज नाही.' अन् हसतच राजा म्हणाला, "मन्त्रीपदासाठी दिलेल्या दवंडीच्या मजकुरातला दोष तू मला चातुर्याने दाखवून दिला आहेस. तुझ्यासारख्या बुद्धिमन्ताला साधारण नोकरीच का? तू मन्त्रीपदासाठी अर्ज कर. आता मी मन्त्र्याच्या रूपाबाबतची अट मागे घेत आहे. तेंव्हा उद्या होणाऱ्या योग्यतेच्या परीक्षेत आपलं भाग्य आजमावून पहा."
दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेत श्रीधरचीच निवड झाली अन् तो महामंत्री बनला. राजाला उत्तमोत्तम उपयुक्त सल्ला देत राहून एक 'समर्थ मन्त्री' म्हणून तो नावारूपास आला.