All Marathi Stories
वाटण्या
मीनाक्षी आपल्या दोघा भावांच्या पाठीवर जन्मली. म्हणून दोघे भाऊ तिचे सर्व लाड पुरवीत. तिचे लग्नाचे वय झाले तेव्हा दोघां भावांनी योग्य स्थळाचा शोध सुरू केला. सुदैवाने त्यांना रामपूरच्या विश्वनाथरावांचे स्थळ योग्य वाटले. तिचे लग्न करून दोघां भावांनी आपापली लग्ने करून घेतली व संसार थाटला.
विश्वनाथराव स्वभावाने फार सुशील व्यक्ती होते. त्यांच्यात काही दोष दाखविण्यासारखे नव्हतेच. ते मुख्य करून व्यापार करीत. जमीन जुमलापण त्यांच्याकडे खूप होता. सासरी मीनाक्षीला कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती. परंतु तिच्या मोठ्या जावेच्या हातात घरातले सर्व व्यवहार होते. ते तिला सहन होत नव्हते. तिची जाऊ तिच्याशी चांगलीच वागे, परंतु मीनाक्षीला घरातला व्यवहार तिच्या अधिकारात हवा होता.
मीनाक्षीने ती गोष्ट कधी पतीजवळ उघडपणे सांगितली नाही. विश्वनाथरावांना सर्व कळत होते, परंतु ते त्यांना काही माहीत नसल्यासारखेच दर्शवीत. शेवटी मीनाक्षीला बोलावेच लागले. म्हणाली— "ऐकलं का, आपण निराळं राहू लागलो तर बरं होईल, नाही का?"
विश्वनाथरावांना ऐकून थोडे आश्चर्य वाटले. नंतर म्हणाले— "मला थोडा विचार करू दे."
त्यानंतर विश्वनाथरावांनी त्या विषयावर मौनच धारण केले. मीनाक्षीमात्र कित्येक दिवस वाट पहात राहिली.
मध्यंतरी विश्वनाथरावांना धंद्यांच्या कामाने सोनपूरला जावे लागले. पतीला मीनाक्षी म्हणाली— "म्हटलं, सोनपूरच्या वाटेवर अण्णाला आणि तात्याला भेटून याल का?"
विश्वनाथरावांनी होकार दिला. परतल्यावर मीनाक्षीने विचारले— "जाऊन आलात का अण्णाकडे?" तेव्हा विश्वनाथराव म्हणाले— "हो गेलो होतो तर! तुझे दोघे भाऊ मजेत आहेत. परंतु तुझ्या दोघी वहिनी, त्या मात्र भांडत असलेल्या दिसल्या!"
"ते कां?" मीनाक्षीने विचारले.
"दोघी तुझ्या भावांना वाटण्या करून घ्यायला सांगत आहेत. तुझ्या दोघां भावांना ते नको आहे. त्यांनी मलाच त्याविषयी सल्ला विचारला." विश्वनाथराव म्हणाले.
"तुम्ही काय सल्ला दिला?" मीनाक्षीने विचारले.
"त्यांचे दोघींचे पटत नसेल तर वाटण्या करून घेणेच बरं नव्हे का? असेच मी सांगितले. आणखी काय सांगणार?" विश्वनाथराव म्हणाले.
"वा रे वा! हा सल्ला दिलात? हा काही सल्ला झाला?" मीनाक्षी बोलून गेली. कारण भावांनी वाटण्या करून घेणे तिला मुळीच मान्य नव्हते. आपला राग दर्शविण्यासाठी ती उठून निघून गेली.
त्यानंतर आणखी काही दिवसांनी मीनाक्षीने पतीला वाटण्या करून घ्यायची आठवण करून देत विचारले— "मग तुम्ही काय ठरविलेत?"
"ठरवायचे काय? तुझ्या सल्ल्याप्रमाणे मला करावयाचे नाही." विश्वनाथराव म्हणाले.
"कां?" मीनाक्षीने विचारले.
"कारण, तुझा विचार काय विचार झाला?" विश्वनाथराव म्हणाले.
"माझा विचार तुम्हांला अविचार वाटला वाटतं?" मीनाक्षीने विचारले.
"जर मी तुझ्या भावांना दिलेला सल्ला तुला अविचार वाटला, तर तू तोच अविचार करू लागली आहेस, असं नाही का झालं?" विश्वनाथरावांनी उलट प्रश्न केला.
मीनाक्षीला तोंडात बसल्यासारखं झालं. तिने पुन्हा तो विषय कधी काढलाच नाही.