वीरचे साहस
आपल्याच गावातील एक मुलगी गौरीवर वीरचे प्रेम होतं. तिच्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती. पण गौरीच्या मनात एका हिऱ्याच्या हाराची लालसा होती. तो खरेदी करण्यासाठी निदान दहा हजार अश्रफ्यांची आवश्यकता होती. एवढी मोठी रक्कम बिचारा वीर कोठून आणणार?
अधिकाधिक पैसे कमवता येतील, असा काही उद्योग-धंदा वीरला माहीत नव्हता. म्हणून तो आचाऱ्याचे काम शिकला. जो बोलावील त्याच्या घरी जाऊन भाज्या चिरणे, वाटण वाटणे व स्वयंपाकात मदत करणे असली कामं तो करू लागला. या कामांतून त्याचा उदर-निर्वाह कसा-बसा होई, पण हजार अश्रफ्या शिल्लक टाकणं फार कठीण काम होतं. काही झालं तरी गौरीशी लग्न करण्याची जबर इच्छा त्याच्या मनात होती.
अशा परिस्थितीत त्या देशाच्या राजाने एक घोषणा केली, राजाने जाहीर केले की जो कोणी अचाट साहस करून दाखवील, त्याला दहा हजार अश्रफ्यांचे बक्षिस दिले जाईल.
एखादं साहस करायची वीरची इच्छा होती. पण तो भित्रट स्वभावाचा होता. स्वप्नात बेडूक दिसला तरी भयाने त्याचा थरकाप होई, म्हणून तो शेतीचे काम ही करीत नसे. त्या गावचा रहिवासी राम दादा मोठा कल्पक माणूस होता. तो अनेकांना सल्ला देत असे. वीर त्याच्याकडे गेला नि म्हणाला- "राम दादा, माझ्या आवाक्यातलं एखादं छान साहस सुचवाल?"
राम दादाला वीरचा स्वभाव चांगला माहीत होता. तो म्हणाला- "हे बघ वीर, भय हा एक भयंकर रोग आहे. ज्याला साहस करता येत नाही, त्याने औषध घेऊन या रोगावर उपचार केला पाहिजे. जर मनातील भय नष्ट झालं तर अनेक साहसाची कामे करता येतील. तू चंद्रपूरला जा. तिथे डोंगरावरील एका गुहेत एक साधू राहतो. भय कमी करण्यासाठी काही जडी-बूटी त्याच्या जवळ आहेत."
वीर लगेच गौरीला भेटला आणि म्हणाला- "तुझ्यासाठी मी चंद्रपूरला निघालो आहे. तिथे जाऊन जडी-बूटी खाईन आणि निर्भय होईन. तिथून पुढे राजधानीत जाईन, राजाला साहस करून दाखवीन आणि दहा हजार अश्रफ्यांचे बक्षिस मिळवीन. मग तुझ्यासाठी हिऱ्यांचा हार खरेदी करीन!"
गौरी हसून म्हणाली- "आता तू चंद्रपूरला जाणार म्हणतोस. भैरव तर राजधानीकडे गेला सुद्धा, जर तुझ्या अगोदर त्याने मला हिऱ्यांचा हार आणून दिला, तर मी त्याच्याशीच लग्न करीन."
गौरीवर भैरवचे पण प्रेम होतं. तो वीर सारखा सुंदर नव्हता, पण मोठा साहसी होता. तो सापाला सहज पकडून आपल्या हातात घेई. ज्या वडाच्या आसपास भुतं वावरतात, त्या झाडाखाली मध्य-रात्री भैरव आरामात झोपी जाई. वीर विचार करू लागला की आपल्याला भैरवची बरोकरी करता येईल का? तरी पण मनाचा हिय्या करून तो चंद्रपूरला गेला. वैराग्याला भेटून आपल्या मनातील गोष्ट सांगितली. वीरची प्रार्थना ऐकून वैरागी म्हणाला- "जवळच्या गुहेत ती जडी-बूटी आहे. जा आणि घेऊन ये."
वीर गुहेत प्रवेश करू लागला आणि त्याने जिकडे-तिकडे बेडूकच बेडूक पाहिले. तो चांगलाच घाबरला, धावत-पळत वैराग्याकडे येऊन म्हणाला- "स्वामीजी, गुहा तर बेडकांनी भरलेली आहे, मी कसा जाऊ आत?"
"साप डसतात, बेडूक काही इजा करीत नाहीत. जा, नि जडी-बूटी घेऊन येत. बेडकांशिवाय तिथे अन्य हिंस्त्र प्राणी नाहीत." वैराग्याने सुचविले.
वीर नम्रतापूर्वक म्हणाला- "स्वामीजी, दया करा माझ्यावर. आपणच जाऊन ती जडी-बूटी घेऊन या. आपले उपकार मी जन्मभर विसरणार नाही."
"स्वत: जाऊन आणलीस, तरच त्या जडी-बूटीचा उपयोग होईल." वैराग्याने वीरला समजावून सांगितले. आपल्या दुर्भाग्याला दोष देत बिचारा वीर परत निघाला. रस्त्यात त्याला एक टांगा दिसला. टांग्यात त्या भागातील पहिलवान रुस्तुम व त्याची मुलगी रागमती बसली होती. वीरला पाहून रागमतीने टांगा थांबवला. ती मोठ्या कडवट स्वभावाची व घमेंडखोर होती. यामुळेच वीस वर्षांची झाली तरी अजून कोणी तिच्याशी लग्नाला तयार झाला नव्हता. रुस्तुमने ही अनेक प्रयत्न केले, पण आपल्या मुलीचे लग्न करू शकला नाही.
वीर टांग्याजवळ पोहोचला, तेव्हा रागमती त्याला म्हणाली- "किती सुंदर आहेस रे तू! मी पहिलवान रुस्तुमची मुलगी आहे. तुझ्याशी लग्न करायची माझी इच्छा आहे."
"माझं तर गौरीवर प्रेम आहे. तिला सोडून दुसऱ्या कोणाशी मी लग्न करणार नाही." वीरने स्पष्टपणे सांगून टाकले. रागमतीने गौरी बाबत पूर्ण माहिती करून घेतली आणि मग म्हणाली- "तू तर मूर्खच आहेस की रे! तो दरिद्री गौरी कुठे, अन् मी पहिलवान रुस्तुमची मुलगी कुठे? मला नकार देऊन तिच्याशी लग्न करणार तू?" नाराज होत रागमती म्हणाली.
वीरने मान हलवीत आपला निश्चय पक्का असल्याचे दर्शविले. एवढ्यात एक झुरळ त्याच्यावर येऊन पडले. वीर घाबरून जोराने ओरडू लागला. रागमतीच्या लक्षात आलं की हा तर एक नंबरचा भेकड आहे. तिने वीरला धमकावलं- "जर तू माझ्याशी लग्न करणार नसलास, तर झुरळांनी भरलेल्या खोलीत तुला कैद करून ठेवीन, समजलं?"
हे ऐकून वीरने तेथून धूम ठोकली. रागमती टांग्यातून त्याचा पाठलाग करू लागली. त्याच वेळी भैरव तिकडून येत होता. टांगा थांबवून त्याने विचारले- "ही काय जबरदस्ती चाललीय?" रागमतीने भैरवला सारी हकिगत सांगितली.
"बेडूक आणि झुरळांना सुद्धा भिणारा हा भित्रट रुस्तुम पहिलवानाच्या मुलीशी लग्न करणार! असला माणूस पहिलवानाचा जावई झाला तर सर्व लोक हसतील नाहीतर काय करतील?" भैरवने प्रश्न विचारला.
"हं, तुझं म्हणणं बरोबर आहे. एकाद्या साहसी माणसाशीच मी लग्न करीन. भित्रटाशी नाही. आता राहिली सौंदर्याची बाब, त्याबाबत नंतर विचार करीन." असं म्हणत तिने टांगा वळवला आणि निघून गेली.
घाबरट वीरने भैरवचे आभार मानले. आणि मग म्हणाला- "तू आता राजधानीहून परत येत आहेस होय? तिथं कुठलं साहस करून दाखवलंस ते तर सांगशील?"
वीरच्या या प्रश्नावर भैरव आनंदित झाला. सांगू लागला- "दोन मगरींशी एकाच वेळी सामना केला नि यशस्वी होऊन आलो. राजाने खुश होऊन दहा हजार अश्रफ्या दिल्या मला. त्या सुवर्णकाराकडे देऊन हा हिऱ्यांचा हार खरेदीला आहे बघ. आता जाऊन गौरीला हा देतो आणि तिच्याशी लग्न करतो." तो बोलत होता, इतक्यात झाडावरून एक जाळे खाली पडले नि दोघे ही त्यात चांगलेच गुरफटले.
जाळ्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी वीर व भैरव यांनी खूप प्रयत्न केले. पण व्यर्थ! तितक्यात झाडावरून चार चोरांनी उड्या मारल्या. भैरवच्या जवळ असलेला हिऱ्यांचा हार बळकावून त्यांनी धूम ठोकली. थोड्या वेळाने भैरव व वीर कसे-बसे जाळ्यातून बाहेर पडले. भैरव वीरला म्हणाला- "झाडावर चोर लपून बसलेत हे तर आपल्याला माहीतच नव्हतं. माझ्याजवळ हिऱ्यांचा हार आहे हे समजताच त्यांनी झाडावरून जाळं टाकलं. मी चोरांना असं-तसं सोडणार नाही. त्यांना पकडीन आणि आपला हार परत मिळवीन. तोपर्यंत तू गावात जा आणि गौरीला मी येत असल्याची खबर दे."
ज्या दिशेला चोर पळून गेले, तिकडे भैरव पळत सुटला. वीर गावात आला आणि गौरीला सर्व हकिगत सांगितली. भैरवची प्रशंसा करीत गौरी म्हणाली- "चार चोरांना पकडण्यासाठी एकटा गेला हं? खरोखरीच बहादूर आहे माझा भैरव!"
गौरीने लग्न केलं तर आता ती भैरवशीच करणार निश्चित. थोड्या वेळात हिऱ्यांचा हार घेऊन तो निश्चित येणारच, असा विचार करून वीर धाडसाने गौरीला म्हणाला- "हिऱ्यांच्या हाराशी लग्नाचा काय संबंध आहे? तुला धन महत्त्वाचं वाटतं की प्रेम? मी तर हिऱ्यांचा हार तुला देऊ शकणार नाही. पण माझं प्रेम आहे तुझ्यावर! गौरी, तू माझ्याशी लग्न कर ना."
हसून गौरी म्हणाली- "माझं पण तुझ्यावर प्रेम आहे. तू ही गोष्ट अगोदरच सांगितली असतीस, तर तेव्हांच मी लग्नाला संमति दिली असती. निदान आता तरी तू हे साहस केलंस हे बरं झालं. मी लग्न तुझ्याशीच करीन."
वीरचा आनंद गगनात मावेना. इतक्यात भैरव हिऱ्यांचा हार घेऊन तेथे येऊन पोचला. "तू उशीर केलास. तू जे साहस करू शकला नाहीस, ते वीरने करून दाखविले. म्हणून मी आता वीरशीच लग्न करणार आहे." गौरी भैरवला म्हणाली.
आश्चर्याने भैरवने विचारले- "याने कुठलं साहस केलं? बेडूक नि झुरळांना भिणारा हा वीर साहस काय करणार? त्याने केलं तरी काय ते सांग."
"साहस करण्यासाठी तलवारींनी लढायला पाहिजे असं नाही. मनातली गोष्ट साहसपूर्वक सांगणं सर्वांना जमत नाही. वीर धैर्यवान आहे, म्हणून पहिलवानाच्या मुलीशी लग्न करायला त्याने साफ नकार दिला. हिऱ्यांच्या हारासाठी जर मी तुझ्याशी लग्न केले तर हा एक व्यापारच नाही का होणार?" गौरी म्हणाली.
गौरीचं म्हणणं भैरवला ही पटलं. तो म्हणाला- "तुझा विचार योग्य आहे. साहस करण्याची माझी इच्छा होती, म्हणून मी राजधानीला गेलो. पहिलवानाच्या मुलीचं सौंदर्य पाहून मी तिच्यावर मोहित झालो. एकाद्या साहसी माणसाशी लग्न करीन असं जेव्हा ती म्हणाली, तेव्हा तिच्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. पण आपल्या मनातील गोष्ट तिला सांगायचं धाडस मी करू शकलो नाही. आवश्यक अशा वेळी जे साहस करता येत नाही त्याचा काय फायदा? खरोखरीच वीर माझ्याहून अधिक साहसी आहे."
आता वीरचा उत्साह वाढला. तो म्हणाला- "तर मग 'मी साहसी आहे' हे तू मानलंस हं! चल, पहिलवानाच्या मुलीशी तुझं लग्न व्हावं म्हणून मी तुला यथाशक्ति मदत करतो. तुझं साहस एक प्रकारचं आहे, माझं एका वेगळ्या प्रकारचं!"
हसत गौरी म्हणाली- "होय, प्रत्येकाचं साहस आपलं आपलं असतं!" काही दिवसात साहसी भैरवचे रागमतीशी व साहसी वीरचं गौरीशी थाटामाटात लग्न झाले.