वेळेची किंमत
दीक्षित हा त्या गावातला प्रसिद्ध वैद्य होता. तो अतिशय हुशार होता. रोग्याला योग्य औषध देण्यात तो निष्णात होता असे सर्व लोक म्हणत असत. एकदा कमलशेठ नावाचा एक सावकार त्याला भेटायला गेला.
कमलशेठला पाहून दीक्षिताने "या, बसा शेठजी, एक मिनिटभर जरा थांबा" असे म्हणत औषधाच्या पुड्या त्याने आत नेऊन ठेवल्या.
दुसऱ्याच क्षणी बाहेरून एका भिकाऱ्याची हाक ऐकू आली. "मालक, मी लंगडा आहे, चालता येत नाही, दोन्ही डोळ्यांनी दिसत पण नाही, मला काहीतरी दान द्या मालक!" दीक्षिताने त्या भिकाऱ्याला पुढे जायला सांगितले आणि तो भिकारी पुढे निघून गेला.
कमलशेठ काहीतरी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात आणखी एक भिकारी तिथे ओरडत आला. "साहेब, मी म्हातारा आहे, माझ्या अंगात काम करण्याची ताकदसुद्धा नाही. मला काहीतरी दान द्या आणि पुण्य मिळवा!" यावेळेस दीक्षिताने कठोर स्वरांत म्हटले, "जा जा, चल जा इथून." हे ऐकल्यानंतर तो म्हातारा भिकारी तिथून निघून गेला.
तेव्हा कमलशेठने बोलणे सुरू केले, "दीक्षितजी, मी इथे अशा कारणासाठी आलो होतो की...." तितक्यात बाहेर जोरजोरात ढोलके वाजवण्याचा आवाज सुरू झाला. आपल्या चेहऱ्यावर रंग लावलेला एक बलदंड माणूस स्वतःला चाबकाचे फटके मारीत होता. त्याच्या जवळच एक बाई होती ती ढोलके वाजवीत होती. त्यांना पाहून दीक्षित लागलीच बाहेर आला आणि त्याने आपल्या खिशांतून एक रुपया काढून त्या बाईला दिला. ती दोघेही लगेच तिथून निघून पुढे गेली.
ह्याच्यावर आश्चर्य वाटून कमलशेठने म्हटलं, "मला एक छोटीसी शंका आहे."
"शंका ती शंकाच असते. त्यात छोटी मोठी असा फरक नसतो. काही का असेना, तुम्ही सांगा, तुम्हाला कसली शंका आहे?" दीक्षिताने विचारले.
"पहिले जे दोन भिकारी आले होते, त्यांना तुम्ही काहीच दिलं नाहीत, पण नंतर ढोलके वाजवत जी बाई कडकलक्ष्मीबरोबर आली, तिला तुम्ही एक रुपया दिलात. वास्तविक पहिला भिकारी लंगडा होता, दुसरा म्हातारा व अशक्त होता, पण ढोलकेवाले दोघेही धष्टपुष्ट होते. ज्यांना भिक्षेची गरज होती त्यांना दान न देता आपण या दोघांना दान का दिलेत? तुम्ही असं का केलंत ते मला सांगता कां?"
"शेठजी, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात. खरं म्हणजे भीक देताच कामा नये. मी देखील आता कुणालाच भिक्षा किंवा दान दिलेले नाही. जर मी लंगड्या भिकाऱ्याला किंवा म्हाताऱ्याला भिक्षा दिली नसली तरी ते मरणार थोडेच होते? आणखी कुठेंतरी जाऊन ते भीक मागणारच. मी जे ढोलकीवाल्या बाईला दिलं, ती भीक नव्हतीच." दीक्षिताने म्हटलं.
"मग त्याला काय म्हणायचं?" शेठजींनी विचारलं. "तर मग ऐका. शेवटी जे दोघे आले ते खरे भिकारी होते. तिने ढोलकें वाजवायचे आणि त्याने स्वतःला चाबकाने मारून घ्यायचे हे पाहणे मला सहन झाले नाही. पैसे दिले नसते तर ही कटकट चालूच राहिली असती आणि आपल्याला घाणेरड्या शिव्या देत ते नंतर गेले असते. केवळ यासाठी मी ताबडतोब पैसे दिले व त्यांना घालवून दिले. पंधरा मिनिटे कटकट झाली असती आणि मनाला त्रास झाला असता तो वाचला." दीक्षित म्हणाला.
इतक्यात अचानक कमलशेठला काहीतरी सुचले व त्याने खिशातून एक रुपया काढून म्हटले, "घ्या हा रुपया, माझ्या शंकेला उत्तर देण्यात तुमचीही पंधरा मिनिटे खर्च झालीच. आणि हा वेळही आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे."
दीक्षिताने तो रुपया घेतला नाही. शेठजींच्या जवळ जरा सरकून दीक्षित उत्तरला, "हे बघा, शेठजी, आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी त्या भिकाऱ्याचा वेळ खरेदी केला आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत मी एक रुपयापेक्षा जास्त देणार नाही. त्याच्यासाठी मी एकच रुपया खर्च केला. परंतु तुम्ही या वैद्याचा मूल्यवान वेळ घेतला आहे. त्यासाठी एक रुपया पुरेसा होणार नाही. माझ्या या वेळेची किंमत मी आपले बोलणे ऐकल्यानंतरच करीन. आपण इथे कोणत्या कामाकरता आला आहात?" दीक्षिताने विचारले.
हा प्रश्न ऐकून शेठजी आपले डोकें खाजवू लागला आणि आठवू लागला की आपण कोणत्या कामासाठी इथे आलो आहोत ते! दीक्षिताने जोरात हसत म्हटले, "विसराळूपणावर औषध मागण्यासाठी तुम्ही आला आहात. खरं ना?"
कमलशेठने आनंदाने म्हटलं, "हो हो, आता आठवलं. आजकाल मी फारच विसराळू होत चाललो आहे."