Bookstruck

शास्त्रीबुवांची सून

रायपूरमधे रामशास्त्री नावाचा एक संपन्न पुरोहित होता. त्याला कृष्णशास्त्री नावाचा एक विवाहयोग्य मुलगा होता. या मुलाने एक उत्तम बुद्धिमान मुलगा म्हणून गावात चांगले नाव मिळवले होते. रामशास्त्रीला वाटे, की आपल्या या मुलाचा विवाह एकाद्या सुयोग्य बुद्धिमान मुलीशीच व्हावा. त्यांनी तीन-चार मुली पाहिल्याही होत्या. त्या सर्व दिसायला सुंदर होत्याच; पण रामशास्त्रीच्या मते त्यातली एकही आपल्या मुलायोग्य बुद्धिमान नव्हती. त्यांच्या दृष्टीने याहून सरस मुलगी आपल्या मुलाला मिळायला हवी. शेजारच्या सीतारामपूरहून त्यांचा एक नातेवाईक एक स्थळ सांगून आला. तो म्हणाला की, त्याच्या गावच्या धर्मशास्त्री याची मुलगी आपल्या कृष्णशास्त्रीसाठी अगदी योग्य अशी आहे. अगदी निःसंकोचपणे रामशास्त्रीने तिला आपली सून करून घ्यावी. मुलगी पहाण्यासाठी बायको व मुलाला बरोबर घेऊन रामशास्त्री त्या गावी गेले. घरासमोर टांग्याचा आवाज ऐकून धर्मशास्त्री बाहेर आला. टांग्यातून उतरणारा रामशास्त्री त्याने पाहिला व लगेच पुढे होऊन त्याने त्या सर्वांचे स्वागत केले. तो म्हणाला, "तुमचे बंधु सीताराम शास्त्री यांनी तुम्ही येत असल्याबद्दल सांगितलं होतं." अन् तो त्यांना घरात घेऊन गेला. थोड्याच वेळात धर्मशास्त्रीची बायको आपली मुलगी राधा हिला जरा ठीकठाक सजवून बाहेर घेऊन आली. पाहुण्यासमोर येऊन राधाने त्यांना वाकून नमस्कार केला अन् समोर चटईवर खाली मान घालून बसली. मुलीचे सौंदर्य व तिची नम्रता पाहून रामशास्त्री प्रसन्न झाला. आजपर्यंत पाहिलेल्या मुलीत ही सर्वाहून सरस होती निश्चितच! आता फक्त तिच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घ्यायचा बाकी होता. धर्मशास्त्री रामशास्त्रीला आपल्या कुटुंबाची माहिती देत म्हणाला, "मला तीन मुली अन् एक मुलगा आहे. राधाच सर्वात मोठी. बाकीच्या दोघीजणी कालच सणानिमित्त आपल्या मामाकडे गेल्या आहेत. त्या एक आठवडा भर मामाकडेच राहतील. त्यांना मामाचा गाव फार आवडतो." रामशास्त्री त्याला म्हणाला, "धर्मशास्त्री, तुमची मुलगी तर अगदी सोन्याची पुतळीच दिसतेय. तिच्या बुद्धिमत्तेची परीक्षा माझा मुलगा कृष्णशास्त्रीच करील. त्यात ही उत्तीर्ण झाली, तर हा संबंध पक्का झाला असंच समजा. माझ्या मुलाने तिला प्रश्न विचारायला आपली हरकत नाही ना?" "होऽ, खुशाल घेऊ देत परीक्षा. माझी राधा दिसायला फक्त रतीच नव्हे, तर विद्येतही सरस्वती आहे. आपणाला प्रत्यक्ष दिसेलच. हवे ते प्रश्न विचारू देत कृष्णशास्त्री." धर्मशास्त्री म्हणाला. पित्याने इशारा करताच कृष्णशास्त्रीने राधाला पहिला प्रश्न विचारला, "तुमच्या घरात मूलतःच आरशाचे शत्रू किती? अमळ विचार करून उत्तर दिले तरी चालेल." राधा हसून उत्तरली, "माझ्या बहिणी अन् माझा भाऊ सर्वचजण आरशाचे उत्तम मित्र आहेत. शत्रू कोणीच नाहीत आमच्या घरात." कृष्णशास्त्रीने पटकन विचारले, "स्वतः बद्दल नाही सांगितलंत?" "हातचं काकणही कोणी आरशात पहातं काय?" राधाने प्रतिप्रश्न केला. "ठीक आहे. आता असं सांगा की, अगोदर तुमच्या घरात आरशाचे मित्र किती होते? अन् आता त्यातले किती शत्रू बनलेत?" कृष्णशास्त्रीने विचारले. "माझ्या आजीतच फक्त असं परिवर्तन झालंय. पण ती ही नुकतीच वारली." राधाने उत्तरादाखल सांगितले. "तुमच्या गावातही महिन्यातून एकदा अमावास्या असते? की त्याही रात्री पौर्णिमाच असते?" कृष्णशास्त्रीने राधाला निरुत्तर करण्याच्या आवेशाने पुढचा प्रश्न केला. "आमच्या गावात अमावास्येच्या रात्रीही पौर्णिमाच फुललेली असते. खरं म्हणजे आजपर्यन्त आमच्या गावात कोणी अमावास्या कधी पाहिलीच नाही." राधाने आत्मविश्वासाने उत्तर दिले. "उन्हाळ्यातही तुमच्या गावच्या शेतात पक्षी येतात?" कृष्णशास्त्रीने पुढचा प्रश्न विचारला. "आमच्या गावच्या सर्वच शेतात, सगळ्या ऋतूंत पक्षी येत रहातात." राधाने चतुराईने उत्तर दिले. "हं! ठीक. तुमचे वडील आकाशासारखा विशाल मांडव अन् भूदेवीसारखं मोठं बोहलं बनवून आपला विवाह करून देऊ शकतील काय?" कृष्णशास्त्रीने खोडसाळ प्रश्न विचारला. "इतक्या मोठ्या प्रमाणावर लग्न करून दिलं, तर आमचं घर म्हणजे आकाशच बनेल. असं नाही का तुम्हाला वाटत?" राधा धीटपणे उत्तरली. रामशास्त्री इतका वेळ सारी प्रश्नोत्तरे लक्षपूर्वक ऐकत होता. आता मधेच मुलाला थांबवत म्हणाला, "आता आणखी प्रश्न विचारायची गरज नाही. मुलगी केवळ सुंदरच नव्हे, तर त्याही पेक्षा अधिक बुद्धिमानही आहे." अन् धर्मशास्त्रीला तो म्हणाला, "आपली मुलगी आम्हाल एकदम पसंत! आता उशीर नको. पंचांग पाहून मुहूर्त नक्की करा." प्रसन्न होत धर्मशास्त्री म्हणाला, "वा! फारच छान!" धर्मशास्त्री व त्याच्या पत्नीचा निरोप घेऊन रामशास्त्री परिवारासह परत निघण्यासाठी टांग्यात बसला. थोडे अंतर गेल्यावर रामशास्त्रीची पत्नी म्हणाली, "कृष्णानं विचारलेले प्रश्न अन् मुलीची उत्तरं मला मुळीच कळली नाहीत." यावर हसून रामशास्त्री म्हणाला, "तुला कळलं नाही, हे माझ्या लक्षात आलंच. थांब, सांगतो समजावून. कृष्णानं प्रथम विचारलं की, मूलतः तुमच्या घरात आरशाचे शत्रू किती. याचा अर्थ असा की त्यांच्या घरात जन्मापासून कुरूप माणसं किती? राधाचं उत्तर आलं की आपली सारीच भावंडं आरशाचे चांगले मित्र आहेत. तिचं उत्तर चांगलंच चातुर्याचं होतं. उत्तराचा अर्थ असा की ते सर्वजण दिसायला सुस्वरूप आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना अप्रत्यक्षपणे तिने सुचवले की हातच्या काकणासारख्या आपल्या सौंदर्याला आरशाची गरजच नाही." "प्रथम आरशाचे मित्र असून नंतर शत्रू बनले- याचा अर्थ असा की तारुण्यात चांगले सौंदर्य असूनही, आता वृद्धत्वामुळे आरशात रूप पहाण्याची गरज नसणारे लोक असतात. कृष्णाच्या प्रश्नाचा रोख घरातल्या वृद्धांकडे होता, अन् त्या चतुर मुलीनं सांगितलं की, अशी फक्त आजीच त्यांच्या घरी होती, पण आता ती स्वर्गवासी झालीय." "नन्तर आपल्या मुलानं विचारलं की सीतारामपुरात महिन्यातून एकदा अमावास्या असते की त्याही दिवशी पौर्णिमाच असते. अन् ती म्हणाली की, अमावास्येचा प्रश्नच नाही. इथे तर नेहमी पौर्णिमाच असते. अर्थ असा की, गावात भरपूर उजेडाची सोय असल्याने कोणी अमावास्या अनुभवलीच नाही. पुढला प्रश्न होता की, उन्हाळ्यात शेतात पक्षी येतात का. या गावात उन्हाळ्यातही पिकं येतात, कारण गावातले तलाव आणि विहिरींना भरपूर पाणी असल्याने वर्षभर पिकं येतच असतात. लोकांना पावसावर अवलंबून रहावं लागत नाही. म्हणूनच राधा म्हणाली की, सर्वच ऋतूत इथे पक्षी येत असतात. शेवटचा प्रश्न होता आकाशाएवढा मांडव अन् भूदेवी इतकं विस्तृत बोहलं घालण्याचा. तिनं उत्तर दिलं की इतका अधिक खर्च केला तर आकाशच आमचं घर होईल. म्हणजेच विवाहानंतर तिच्या मातापित्यांना घरदार विकून आकाशाखालीच रहावे लागेल. समजलं ना, आपली भावी सून किती अक्कलवान आहे?" यावर आश्चर्य प्रकट करत कृष्णशास्त्रीची आई म्हणाली "ओहो! त्यांच्या प्रश्नोत्तरात इतका गूढार्थ लपलेला होता काय?"