शिल्लकेचा महिमा
कधी काळी उज्जयनी येथे कुंभीराम नावाचा एक फार गरीब मनुष्य राहत असे. तो रोज गवत कापून ते श्रीमंतांच्या घरी विकत असे. तेवढ्यावर त्याचा उदरनिर्वाह चाले. त्याचे घर राजधानीच्या एका टोकाला होते. रोज अडीच आणे त्याची प्राप्ती होती. दोन आण्यांत स्वतःच्या पोटापाण्यापुरते तो विकत घेई आणि अर्धा आणा शिल्लक टाकी. त्याला बायको नव्हती व मुलेबाळे पण नव्हती.
एके दिवशी त्याने मडक्यात ठेवलेली शिल्लक जमिनीवर ओतली. त्या शिल्लकेचा एक ढीग झाला. त्याने विचार केला की एवढ्या पैशांचा मला काय उपयोग? स्वतःच्या घरावरचे छप्पर गवताचे होते ते बदलून कौलारू करण्याची इच्छा सुद्धा त्याच्या मनात उपजली नाही.
त्याला एक दिवशी पहाटे स्वप्न पडले. स्वप्नात एक सुंदर तरुण स्त्री दिसली. झोप मोडल्यावर देखील ती डोळ्यासमोरून दूर होत नव्हती. आपल्या पैशाचा आता कसा उपयोग करावा हे त्याला कळले. तो शिल्लकेतले सर्व पैसे घेऊन गावातल्या एका प्रख्यात जव्हेऱ्याच्या दुकानात गेला. त्याने आपल्या जवळचे सर्व अर्धे आणे जव्हेऱ्याच्या समोर ओतले आणि म्हणाला— "ही माझ्या आयुष्यभराची शिल्लक आहे. ही रक्कम घेऊन मला एक सुंदर दागिना द्या."
जव्हेऱ्याच्या मुनीमाने पैसे मोजून पैसे किती आहेत हे सांगितल्यावर जव्हेऱ्याने कुंभीरामला एक सोन्याची माळ व बांगड्या आणून दाखवल्या व म्हणाला— "तुला यांपैकी जे पाहिजे ते या पैशावर विकत घेता येईल." कुंभीरामला एक बांगड्यांची जोडी फार आवडली. त्यात पन्ना व नीलमणी जडलेले होते. ती जोडी आपल्या उपरण्यात बांधून तो एका व्यापाऱ्याच्या घरी गेला.
तो त्याला म्हणाला— "तुम्ही व्यापारासाठी देशोदेशी हिंडत असता. कोठे तुम्ही त्या सुंदर सोळा वर्षांच्या मुलीविषयी ऐकले आहे का?" असे विचारून त्याने स्वप्नात पाहिलेल्या मुलीचे वर्णन त्याला सांगितले.
ते ऐकून व्यापारी म्हणाला— "ती मुलगी म्हणजे सागर देशाची राजकन्या असावी. तिच्या सौंदर्याचे वर्णन सर्वत्र ऐकले आहे. ती स्वभावाने पण चांगली मुलगी आहे."
कुंभीरामला ते वर्णन ऐकून आनंद झाला. त्याने उपरण्यातली बांगड्यांची जोडी काढून व्यापाऱ्याला देत म्हटले— "या खेपेस तुम्ही सागर देशात व्यापाराला जाल तेव्हा या बांगड्या त्या राजकन्येकडे पोहोचत्या करा. परंतु या कोणी दिल्या हे मात्र तिला कळता कामा नये."
व्यापारी आपल्या ताफ्याबरोबर निघाला. सागर देशात जाऊन त्याने ती भेट राजकन्येला दिली. राजकन्येला त्या बांगड्या फार आवडल्या. तिने विचारले, "या कोणी पाठवल्या?" व्यापाऱ्याने नाव सांगण्यास नकार दिला. राजकन्या चकित झाली. तिने विचारले, "पण त्याने कोणत्या आशेने ही भेट पाठवली आहे?"
व्यापारी म्हणाला, "त्याला याबद्दल काही हवे असेल असे दिसले नाही. तुम्ही ही कांकणे स्वीकारावीत एवढीच त्याची इच्छा दिसली."
राजकन्येने विचार केला की काही न देणे बरोबर दिसणार नाही. तिने पुरुषी पोशाखाला शोभतील अशी रेशमी वस्त्रे व पुष्कळ धन दिले. व्यापारी स्वदेशी परतला व त्याने ते धन कुंभीरामसमोर ठेवले. कुंभीराम म्हणाला, "मला काय करायची आहेत ही वस्त्रे? ही वापरण्याची आवड असणारा कोणी तुमच्या ओळखीचा असेल तर सांगा."
व्यापारी म्हणाला, "विदर्भ देशाचा राजा तरुण व सुंदर आहे." कुंभीरामने ती वस्त्रे विदर्भ राजाला भेट म्हणून देण्यास सांगितले. विदर्भ राजाने ती वस्त्रे स्वीकारली आणि परतभेट म्हणून उत्तम जातीचे बारा घोडे व्यापाऱ्याला दिले.
कुंभीरामने ते घोडे पाहून व्यापाऱ्याला सांगितले, "यातले दोन घोडे तुम्ही ठेवा आणि बाकी दहा सागरच्या राजकन्येकडे पोहोचवा." अशा प्रकारे भेटींचा सिलसिला सुरू झाला. राजकन्येने वीस उंट आणि चांदी पाठवली. कुंभीरामने ती सर्व विदर्भ राजाला धाडली. विदर्भ राजाने त्या बदल्यात वीस घोडे, वीस उंट आणि वीस हत्ती पाठवले.
शेवटी व्यापारी म्हणाला, "मी आता सागरला जायला तयार आहे, पण हे सांगायला हरकत नसेल तर की आपल्या गावचा गवत विकणारा ही भेट पाठवत आहे?"
कुंभीराम म्हणाला, "असे सांगा की आपल्याला माहित नाही का हे कोणी दिले आहे? हे त्यांनीच दिले आहेत. त्यानंतर तुम्हाला काही उत्तर देण्याचे कारण नाही."
व्यापारी सर्व लवाजमा घेऊन सागर देशात पोहोचला. सागर राजाला वाटले कोणी शत्रू चालून आला आहे, पण व्यापाऱ्याने सांगितले की हा राजकन्येसाठी नजराणा आहे. शेवटी व्यापाऱ्याने गुपित उघड केले की ही भेट विदर्भच्या राजकुमाराने पाठवली आहे (कारण कुंभीरामने तसे सुचवले होते).
सागर राजाला वाटले विदर्भ राजकुमार लग्नाच्या हेतूने हे करत आहे. त्याने विदर्भ राजाकडे दूत पाठवला. नंतर सागर राजा मुलीला घेऊन तीर्थयात्रेच्या निमित्ताने विदर्भ देशात आला. विदर्भ राजकुमाराने सागरच्या राजकन्येचे सौंदर्य पाहिले आणि तो मोहित झाला. त्याला व्यापाऱ्याकडून कळाले की या सर्व भेटी राजकन्येकडूनच येत होत्या.
त्या दोघांचा विवाह थाटामाटात पार पडला. त्यांच्या विवाहास कारण कुंभीराम होता हे दोघांपैकी एकालाही कळले नाही. तो नेहमीप्रमाणे रानात जाऊन गवत कापून आणत होता व त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालू होता. तो दोन आण्यांत आपले पोटापाणी करी व अर्धा आणा शिल्लकेत टाकी.