Bookstruck

सद्बुद्धीची गोळी

चतुर, विदुर, व प्रवर या नावांचे तिघे भाऊ होते. पित्याच्या मृत्यूनंतर आपल्या विशाल घराचे तीन भाग करून ते आपले आयुष्य कंठू लागले. दिवस जात राहिले पण या तिघांच्या आयुष्यात कसलीही सुधारणा झाली नाही; त्यांची काही प्रगतीही झाली नाही. अर्थात, त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही केले नव्हते. ‘कसेतरी दिवस निघाले, म्हणजे पुरे’, इतकीच त्यांची अपेक्षा होती. कोणाच्या बायकोने आपल्या नवऱ्याला, “अमुक केल्याने लाभ होईल” असे सांगितले, तरी तो तिकडे दुर्लक्ष करी. बायका बिचाऱ्या आपल्या विवशतेमुळे मनातल्या मनात दुःखी होत. पण यामुळे सर्व ‘जसे होते तसेच’ राहिले. एके दिवशी एक बैरागी त्यांच्या घरासमोर उभा राहून ‘भिक्षांदेही’ म्हणून ओरडू लागला. त्यावेळी तिघेही भाऊ काही कामासाठी शेजारच्या गावी गेलेले होते. तिघी जावा बसून आपसात गप्पा मारत होत्या. आवाज ऐकून त्यांना वाटले की, ‘हा कोणी नवा भिकारी असावा; नाहीतर या घरासमोर उभा राहून तो असा ओरडला नसता. घर कोणाचे आहे, हे याला माहीत नसावे.’ इतक्यात बैरागी ‘भिक्षांदेही’ म्हणून पुन्हा एकदा ओरडला. तिघी बाहेर येऊन त्याला म्हणाल्या, “हे घर कुणाचे आहे, ते माहीत नाही का तुम्हाला? इथे भिक्षा नाही मिळायची.” जराही निराश न होता बैरागी म्हणाला, “पण मी कोण हे तुम्हालाही माहीत नसावं, म्हणूनच तुम्ही असं बोलताय. मला भिक्षा द्यायला नकार देताय. तुमचं भाग्य आज चांगलं आहे, म्हणूनच मी तुमच्या दारी आलोय. सर्वांकडे भिक्षा मागायला जात नसतो मी! मला भिक्षा दिलीत, तर कल्याण होईल तुमचं.” तिघींना असे वाटले की हा कोणी सामान्य बैरागी नसावा. पण मनातल्या भीतीमुळे त्या काहीच बोलल्या नाहीत. कुणास ठाऊक, कोणत्या बिळात, कसला साप आहे - या विचाराने थोरली म्हणाली, “तुझ्यासारखे भिकारी कित्येक असतील. जे ‘कल्याण’ म्हणतोयस, ते काय हे सांग बरं! भिक्षा मिळावी, म्हणून खोटं तर नाही बोलत आहेस?” “तुमच्या घरामागे धन सापडेल, असा उपाय सांगेन बघा!” बैरागी बोलला. धनाचे नाव काढताच तिघी जावांच्या मनात आशा उत्पन्न झाली! आता बैराग्याला भिक्षा देण्यात त्यांनी उत्साह दाखवला. बैराग्याने त्यांची सगळी माहिती विचारून घेतली अन् म्हणाला, “घर तिघा भावांचं म्हणजे पर्यायानं तुम्हा तिघींचीही आहे. तुमचे अधिकार सारखेच आहेत. आता एक काम करा. एकीनं घरात भात शिजवा, दुसरीनं भाजी, तर तिसरीनं दह्याची व्यवस्था करा, आपापल्या घरात. तिघी मिळून मला पोटभर खायला घाला. नंतर सांगेन तुम्हाला धन कुठे अन् कसं मिळेल ते!” मोठ्या आतुरतेने तिघींनी एकदमच विचारले, “पण धन कुणाच्या घरामागे सापडेल?” बैरागी उत्तरला, “तिघींनाही आपापल्या हिस्श्याच्या घरामागे धन मिळेल.” तिघींनी बैराग्याला भरपूर जेवण दिले. ढेकर देत तो म्हणाला, “मी खूप संतुष्ट झालोय. तुमचे पती परत आल्यावर त्यांना सामान्य माणसाचं भलं होईल, असं एखादं चांगलं काम करायला सांगा. तिघं जेव्हा अशी भली कामं करतील, तेव्हा त्यांना आपल्या घरामागे आपल्या आवडेल तिथे खणल्यावर धन मिळेल. मी अजून तीन दिवस याच गावात असेन माझ्या म्हणण्याप्रमाणे धन न मिळालं, तर भेटा मला.” त्याचे बोलणे ऐकून तिघी जावांचे चेहरे निस्तेज झाले. त्यांना असे चिंतित पाहून बैराग्याने कारण विचारले. “तिघा भावांचा स्वभाव एकसारखाच आहे. परोपकारापासून दूरच राहतात ते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याकडून एखादं भलं काम करवून घेणं अशक्यच! नुसतं आम्ही तुम्हाला भोजन दिल्याचं कळलं तरी आकाशापाताळ एक करतील ते! आम्हाला शिव्या देतील, तोंडाला येईल ते बडबडून चांगला उद्धार करतील आमचा! ते कुठं बाहेर गेलेत, म्हणून इतकं तरी धाडस करू धजलो आम्ही!” थोरली जाऊ म्हणाली. क्षणभर विचार करून बैरागी म्हणाला, “माझ्याजवळ सद्बुद्धीच्या गोळ्या आहेत. तुम्हा तिघींना एक-एक देतो मी. रात्री झोपण्यापूर्वी गोळी पाण्यात विरघळवून आपापल्या नवऱ्याला द्या. सकाळी उठल्या-उठल्या त्यांच्यात सद्बुद्धी जागी होईल. त्या गोळीचा परिणाम सूर्यास्तापर्यंत टिकेल.” प्रत्येकीच्या हातावर एक-एक गोळी देऊन बैरागी तिथून निघून गेला. तिघे भाऊ परत आल्यावर रात्री त्यांच्या बायकांनी त्यांना न कळत पाण्यातून गोळी दिली. दुसऱ्या दिवशी चतुर खूप लवकर उठला. दरवाजा उघडल्याबरोबर त्याला असे दिसले की, तिथे काही शिपाई अन् राघव उभे आहेत. राघवला जोरजोरात रडताना पाहून चतुरने त्याला कारण विचारले. शिपाई म्हणाले, “यानं खूपजणांकडून कर्ज घेऊन शेत आणि घर घेतलं. घर बायकोच्या नावे अन् शेत मुलांच्या नावे. ते कर्ज चुकवायला आता याच्याजवळ काही उरलंच नाहीय. सावकारांनी तक्रार केल्यावरून आम्ही याला तुरुंगाकडे नेत आहोत.” “अरे पण तुरुंगात डांबलंत, तर कर्ज कसं चुकवू शकेल तो? बाहेर राहिला, तर काही मार्ग शोधेल, प्रयत्न करील होय ना?” चतुर बोलला. “कर्ज घेणाऱ्याला बाहेर रहायचं असेल, तर शंभर अशर्फींचा जामीन द्यायला हवा. त्याची बायको अन् मुलगा द्यायला तयार नाहीत. याच्या स्वतःजवळ तर तितकं धनही नाहीय. मग आम्ही तरी काय करावं? म्हणूनच आता तुरुंगात नेतोय याला.” एका शिपायाने सांगितले. चतुर ताबडतोब म्हणाला, “केवळ शंभर अशर्फींसाठी एका सज्जन माणसाला तुरुंगाची कोठडी? सोडा राघवला; हवं ते धन मी देतो.” अन् आत जाऊन शंभर अशर्फी आणून शिपायांच्या हवाली करत तो म्हणाला, “माझीही आर्थिक स्थिती विशेष चांगली नाहीय. मी दोन बैल घेण्यासाठी हे पैसे जमवले होते. बाजारात जाऊनही मनासारखी खरेदी होऊ शकली नव्हती. राघवचं भाग्यच म्हणायचं हे!” अशर्फी घेऊन अन् राघवला सोडून देऊन शिपाई निघून गेले. नंतर चतुरने राघव, त्याची बायको, त्याचे मुलगे अन् सावकार अशा सर्वांना एकत्र बसवून उपदेश केला; राघवच्या कुटुंबाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. सावकारांनी चतुरचे जामीनकीने धन परत केले अन् संतुष्ट होऊन निघून गेले. तेव्हा राघवची बायको चतुरला म्हणाली, “तुम्ही अन् माझे पती बऱ्याच काळापासून एकमेकांचे शत्रू आहात. यात दोष माझ्या पतीचाच असल्याचं मला छान ठाऊक आहे. असल्या आपल्या शत्रूला आज तुम्ही मोठीच मदत केलीत. तुम्ही फार उत्तम माणूस आहात. पती तुरुंगात जाताना मी चूप राहिले याबद्दल मला दोष नका देऊ. त्यातली खरी गोष्ट जाणून घ्या. यांचा हट्ट होती की, ‘तुरुंगात जाईन, पण कर्ज चुकवणार नाही.’ आमच्याकडूनही त्यांनी तसं वचन घेतलं; म्हणूनच आम्ही गप्प राहिलो. शत्रूलाही आज तुम्ही जी चांगली वागणूक दिलीत, त्यामुळे आज यांच्यातही परिवर्तन झालंय. आता यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही कर्ज परत करू. आमच्या चुकीबद्दल आम्हाला पश्चात्ताप वाटतोय. ऋणी आहोत आम्ही तुमचे!” राघवही चतुरला म्हणाला की, ‘आजपासून शत्रुत्व संपवून आपण दोस्त बनू.’ चतुरही संतोषाने घरी परतला. त्याच दिवशी विदुरलाही दुसऱ्याला मदत करायची संधी मिळाली. तिघा भावात तोच अधिक बलवान होता. समोरच्या घरी विहीर खणायचे काम चालू होते. एक मोठा दगड अडचण बनून राहिला होता. तो फोडणेही शक्य होत नव्हते. काही लोकांचा असा सल्ला होता की, पाच माणसांची शक्ती एकवटलेल्या माणसाच्या हातूनच हातोड्याच्या दणक्याने तो फोडता येईल. विदुरच्या कानी ही गोष्ट पडली. पण त्याला तर ताबडतोब शेजारगावी जायचे होते. त्याच्या जवळचे नारळ त्या गावचा माणूस चांगल्या किमतीला खरेदीला तयार होता. नारळ ताबडतोब दिले नाहीत तर संधी हातची जाणार होती; अन् कमीत कमी शंभर अशर्फींचे नुकसान होणार होते. समोरच्या घरच्यांची अडचण दुसरीच होती. चार मजूर तीन दिवस ही विहीर खणायचे काम करत होते. आजचा शेवटचा दिवस होता काम सोडून ते निघून गेले, तर खणलेली विहीर पुन्हा मातीने भरून जायची शक्यता होती, अन् आतापर्यंतचा सारा खर्च वाया जाणार होता. त्यामुळे घरमालक चिंतित होता. काय करावे हे कळत नव्हते त्याला. विषय कळल्याबरोबर विदुर तिथे गेला. पुऱ्या बळाने चारपाचदा हातोड्याचा प्रहार केल्याबरोबर पत्थर फुटला अन् ताबडतोब विहिरीला पाणी लागले. हे काम संपल्याबरोबर नारळ घेऊन तो शेजारगावी गेला अन् चांगल्या किमतीला नारळ विकूनही आला. प्रवरच्या हाती आणखी एक निराळी संधी आली. मेहनती वरुणला साप डसला. गाववैद्याने औषध सांगून म्हटले की, ‘या औषधाने तो वाचेल.’ एक दिवसाच्या आत याला उरगंध लेह खायला घालायला हवा. तसं न केल्यास याचे पाय कामातून जातील. अन् नंतर ते कधीच बरे करता येणार नाहीत.” हे औषध शहरातल्या प्रमोदजवळच मिळण्यासारखे होते. तिथे जाण्यायेण्यात कमीतकमी एक दिवस जाणार होता. अन् त्या अवधीत जे घडायला नको, ते घडून जाणार होते. गावपाटलाकडे एक उत्तम घोडा होता. त्यावर बसण्यासारखा घोडेस्वार सुट्टी घेऊन सासुरवाडीला गेला होता. आता एकटा प्रवर काय तो शहरातून औषध घेऊन येण्यासारखा घोडेस्वार गावात होता. पण महिन्यापूर्वी झालेल्या पोटदुखीमुळे वैद्याने त्याला घोड्यावर बसायला मनाई केली होती, त्यामुळे त्याच्या जिवाला अपाय होता. तरीही वरुणला वाचवण्यासाठी प्रवर घोड्यावरून प्रमोदकडे गेला. जाताना वरुणलाही त्याने बरोबर नेले. प्रमोदने वरुणला औषध दिले अन् प्रवरच्या परोपकारबुद्धीची तारीफ करून त्यालाही कायाकल्प नावाचे औषध देऊन ‘हे औषध घेतलंस तर तुझी तब्येत अगदी ठणठणीत होईल’ असे सांगितले. वरुणला सुखरूप शहरातून परत आणल्यावर गावकऱ्यांनीही प्रवरची खूप स्तुती केली. आपल्या नवऱ्याच्या या सत्कार्यामुळे तिघी जावाही फार खूश झाल्या. बैराग्याच्या सांगिनुसार आपापल्या घरामागे खणल्यावर प्रवरला तांब्याच्या नाण्यांनी भरलेला घडा, विदुरला चांदीच्या नाण्यांचा, तर चतुरला सोन्याच्या नाण्यांचा घडा मिळाला. चतुरची बायको आनंदाने वेडीच झाली, पण बाकी दोघांच्या बायका मात्र मन मारून गप्प झाल्या. त्या बैराग्याला शोधायला गेल्या. बैरागी भेटल्यावर प्रवरच्या पत्नीने सगळी हकीकत सांगून रडत विचारले, “तुमच्यामुळेच तिघांच्यात सद्भाव जागा झाला. मग तिघांना फळ मात्र निरनिराळी कशी मिळाली?” “माझ्या गोळीचा प्रभाव तात्पुरता असतो. पण फळ मात्र ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून असतं.” बैरागी उत्तरला. “पण सर्व भावांची बुद्धी तर सारखीच आहे!” विदुरची बायको बोलली. बैरागी म्हणाला, “नाही, प्रवरनं काम तर चांगलं केलं; एका माणसाचा जीव वाचवला. पण गोळीचा प्रभाव नाहीसा झाल्याबरोबर त्याला वाटलं की आपण केलं, ते बरं नव्हे! पुन्हा कधी असं काही चांगलं काम न करायचा निर्धारही केला त्यानं! त्यामुळेच त्याच्या परिश्रमानुरूप फळ त्याला मिळालं. चांगलं काम केल्यानंतर विदुरला वाटलं की, असल्या कामात आपण आपला वेळ का वाया घालवावा? त्यानं ठरवलं की, असली कामं पुढे कधीकधीच करायची. त्यामुळे त्याला थोडं अधिक फळ मिळालं. पण चतुरला मात्र ते काम करण्यात आनंद वाटला अन् पुढेही अशी कामं करत रहायचं ठरवलं त्यानं. त्यामुळे त्याला सोन्याची नाणी मिळाली.” इतके सगळे बैराग्याने सांगूनही त्या दोघी जावा काहीशा असंतुष्टच राहिल्या. त्या जेव्हा आपापल्या घरी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या नवऱ्यांनी आपल्याजवळची सोन्याची नाणी दाखवत त्यांना म्हटले, “चतुरचं असं म्हणणं आहे की या घरात जे काही मिळेल ते तिघांनी सारखं वाटून घ्यावं, त्यानं आम्हालाही त्याच्या नाण्यांत सारखा वाटा दिला.” आता सिद्ध झाले की तीन भावात चतुरच सर्वात सुशील व सद्भावना राखणारा आहे. विदुर व प्रवरच्या बायकांनाही कळून चुकले की सद्बुद्धीवाल्या व्यक्तीलाच सोन्याची नाणी कशी मिळाली.