Bookstruck

सन्मित्र

एका श्रीमंत व्यापाऱ्याला एकुलता एक मुलगा होता. त्याच्या भोवती उडाणटप्पू खुशालचेंडू मुलांचा नेहमी घोळका असे. बापाने मुलाला पुष्कळ समजावून सांगितले की बाळ, अशा मुलांच्या संगतीत आपला वेळ फुकट घालवू नकोस. परंतु त्याचा त्याच्या लबाड मित्रांवरच जास्त विश्वास होता. म्हणून त्याने बापाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. मुलावर आपल्या उपदेशाचा काहीच परिणाम होत नाही हे पाहून बाप एकदा त्याला म्हणाला - "बाळ! व्यापारासाठी आपल्याला परदेशात जावे लागणार आहे. आपल्याकडे जे दागदागिने आहेत ते आपण कोणाकडे तरी सुरक्षित ठेवून दिले पाहिजेत." मुलाने लगेच आपल्या एका मित्राचे नाव सुचविले. बापाने एका पेटीत सर्व दागिने ठेवून मुलाच्या हाती ती त्याच्या मित्राकडे पाठवून दिली. नंतर दोघे परदेशात व्यापारासाठी निघून गेले. काही दिवसांनी दोघे परदेशात व्यापाराची कामे उरकून परत आले. बापाने मुलाला सांगितले, मित्राकडे जाऊन दागिन्यांची पेटी घेऊन ये. मुलगा रागाने घरी परत येऊन म्हणाला - "बाबा! माझा मित्र म्हणाला - 'पेटीत सर्व दगड होते.'" बाप म्हणाला - "ते त्याला पेटी उघडल्यावरच ना कळले?" नंतर पुढे म्हणाला - "मी माझ्या एका मित्राकडे दागिने पेटीत घालून ठेवले आहेत. तू ती पेटी घेऊन ये." मुलाने पेटी आणून दिली. बापाने पेटी उघडली. त्यातदेखील दगडच होते. मुलाला आश्चर्य वाटले. तेव्हा बाप म्हणाला - "तुझ्या मित्राने पेटी उघडून पाहिली व माझ्या मित्राने पाहिली नाही. हाच फरक मित्रामित्रात असतो." तुला हा बोध व्हावा म्हणून मी हे सर्व नाटक केले होते. दागिने दुसरीकडे तिजोरीत सुरक्षित आहेत.