Bookstruck

सासू-सुना

सीतापूरमध्ये श्रीकंठ नावाचा एक प्रसिद्ध व्यापारी होता. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलाचे नाव श्रीनाथ आणि मुलीचे नाव श्रीवल्ली होते. श्रीनाथ मोठा झाल्यावर आपल्या पित्याच्या व्यापारात त्यांचा उत्तम उजवा हात बनला. तो सर्व दृष्टींनी योग्य असल्यामुळे त्याला विवाहासाठी अनेक मुलींची मागणी येऊ लागली. एके दिवशी श्रीकंठची बायको भानू आपल्या नवऱ्याला म्हणाली, "श्रीनाथचं लग्न लवकर करून दिलं तर बरं होईल ना! रामपूरवाल्यांनी निरोप पाठवलाय की, ते एक लाख हुंडा द्यायला तयार आहेत." यावर हसून श्रीकंठ म्हणाला, "अं? पोराला दुसरी मुलगी का पाहायची? सुदर्शनची मुलगी सुलोचना आता अठरा वर्षांची झाली असेल ना?" हे ऐकताच भानूच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू लागली. पंधरा वर्षांपूर्वी सुदर्शनकडूनच भांडवल घेऊन श्रीकंठने आपला व्यापार सुरू केला होता. घसरत्या परिस्थितीत श्रीकंठच्या कुटुंबाला सुदर्शननेच मदतीचा हात दिला होता. इतकेच नव्हे, तर रक्कम देताना सुदर्शनने बजावले होते की ही रक्कम म्हणजे कर्ज नव्हे. तेव्हा श्रीकंठ त्याला म्हणाला होता, "तर मग माझंही म्हणणं ऐक. पैसे परत घेणार नसशील तर ऐकून ठेव. तुझी मुलगी वयात आली की मी तिला आपली सून करून घेईन. अर्थात ते तुला तेव्हा मान्य असेल तरच हं!" पण आता काळ पालटला होता. सुदर्शन बिचारा एक अगदीच सामान्य माणूस बनून राहिला होता, जवळजवळ निर्धनच! अन इकडे भानू म्हणत होती की, एक लाख रुपये हातचे जाऊ देऊ नयेत. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, "लग्नासारख्या महत्त्वाच्या बाबतीत, एकाद्या विशिष्ट मुलीशी लग्न करण्याबाबत मुलावर दबाव आणणं योग्य होईल का, याचा काही विचार?" "असं मुळीच नाही. श्रीनाथला सुलोचना पसंत पडली नाही, तर मी तिचं लग्न दुसरीकडे जमवीन अन् चांगला भरपूर हुंडा देऊन थाटामाटात लग्न करून देईन." श्रीकंठने आपल्या मनातले सांगून टाकले. दुसऱ्याच दिवशी ते सुलोचनाला पाहायला गेले. तिला पाहिल्याबरोबर श्रीनाथने आपली पसंती व्यक्त केली. सुलोचनाला बिचारीला कळलेच नाही की, आपण आपल्या नणंदेला व सासूला पसंत नाही आहोत. अशा परिस्थितीतच ती सून म्हणून त्या घरी आली. सहा महिने सुलोचनाला आपल्याच भाग्याचा हेवा वाटत राहिला. परंतु अचानक तिचा सासरा श्रीकंठ स्वर्गवासी झाला अन् तेव्हापासूनच तिच्या हालांना सुरुवात झाली. पित्याच्या मृत्यूमुळे श्रीनाथची जबाबदारी दुप्पट वाढली. तो फारसा घरी राहीनासा झाला आणि इकडे नणंद व सासूकडून सुलोचनाचा छळ सुरू झाला. सासू सुनेला टोचून बोले, टोमणे मारी— "हो, लाखाचा हुंडा आणणारी मुलगी सोडून या अष्टदरिद्री मुलीला आणलं घरात!" नणंद श्रीवल्ली चिमटे काढत म्हणे, "अन् घरात पाऊल ठेवल्याबरोबर सहा महिन्यात घराचं स्मशान केलं या शनीनं!" आता स्वयंपाकाचे सारेच काम सुलोचनावर येऊन पडले. भानू घरातलं ढीगभर काम तिच्याकडून करून घेऊन आपल्या मनाचा सूड घेऊ पाही. श्रीवल्ली वहिनीला थोडीसुद्धा मदत करीत नसे, उलट आपल्याला जे हवे असेल ते सुलोचनाला आपल्या खोलीत आणून द्यायला लावी. पण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल सुलोचना श्रीनाथजवळ ब्र ही काढत नसे. एकदा सुलोचनाला खूप ताप आला. थंडीने कापत त्या असह्य अवस्थेतही घरातलं सारं काम तिने एकटीनेच उरकले. अशातच सासू व नणंदेने गावापासून दहा मैल दूर असणाऱ्या देवीच्या दर्शनाला जायचे ठरवले. भानूनी रात्रीच सुलोचनाला सांगितले, "सकाळच्या गाडीने निघालो की यायला रात्रच होईल. देऊळ तर डोंगरावर आहे, तिथे खायला काहीच मिळत नाही. पहाटेच उठून आमच्यासाठी गोड खिचडी बनवून बांधून दे." दुसऱ्या दिवशी पहाटेच खिचडीच्या आठवणीने सुलोचना चटकन अंथरुणातून उठली. पण चार पावले चालताच चक्कर येऊन जवळच्या टेबलावरच ती कोसळली. त्या आवाजाने श्रीनाथ जागा झाला. सुलोचनाला नीट अंथरुणावर बसवून त्याने प्रेमाने विचारले, "आत्ताच का उठलीस ग?" सुloचनाने त्याला खिचडीबद्दल सांगितले, तेव्हा तो म्हणाला, "तू फार कमजोर झालेली दिसतेस, झोप तू. खिचडी मी बनवतो." आणि जबरदस्तीने तिला झोपवून श्रीनाथ स्वयंपाकघरात गेला. थोड्याच वेळात त्याने गरम गरम गोड खिचडी तयार केली. खिचडी एका भांड्यात आणून ती सुलोचनाच्या स्वाधीन करत श्रीनाथ म्हणाला, "जा, खिचडी आपल्या सासूला नेऊन दे. मी बनवलीय म्हणून सांगू नकोस हं!" सुलोचनाने तसेच केले. सासू व नणंद गाडीतून देवीला जाण्यासाठी निघून गेल्या. नंतर श्रीनाथही बाहेर गेला. सुलोचना बिचारी काही न खाता दरवाजा बंद करून पडून राहिली. रात्र होता होता दरवाजा खटखटला. सुलोचनाने दरवाजा उघडला तर समोर दोघींची जोडगोळी उभी होती! "आम्हाला भुकेनं मारायचा विचार होता तुझा? नाहीतर असली खिचडी केली नसतीस तू!" असे म्हणून रागातच श्रीवल्ली घरात घुसली. सासू कडक आवाजात म्हणाली, "दुपारी चांगली भूक लागली, तेव्हा छान दूध, तांदूळ, काजू-बेदाणा अन् वेलदोड्याच्या वासानं तोंडाला पाणी सुटलं. पण कसं काय! खिचडी तोंडात घातली अन् तशीच थुंकावी लागली! त्यात तू साखरच नव्हती घातलीस. मुद्दामच केलंस तू असं!" सासू सुलोचनाचा दंड पकडून तिला हलवत होती. तेवढ्यात श्रीनाथ घरी आला. त्याने हसतच विचारले, "काय झालं आई? आपल्या आजारी सुनेवर राग काढते आहेस असं दिसतंय?" मुलाचे बोलणे ऐकून भानू म्हणाली, "या घरात हिला काय कमी आहे? इतक्या उंची साड्या अन् दागिने जन्मात तरी पाहिलेत का तिनं? कसला त्रास आहे हिला इथं? उगीचच मला अन् आपल्या नणंदेला सतावतये ती!" "आई, कोण कुणाला सतावतंय हे काही मला कळत नाही, असं नाही! चांगलं दूध अन् काजू वगैरेचं तू म्हणालीस ते ऐकलं मीही. हे सारं असूनही साखर नसली तर खिचडी खाववत नाही. तसंच सगळं काही असून जीवनात केवळ प्रेम नसेल, तर असं आयुष्य कोणालाही आवडणार नाही. ती खिचडी मीच बनवली होती; अन् हे सांगण्यासाठी जाणूनबुजूनच त्यात साखर घातली नाही मी आई!" "म्हणजे तुला म्हणायचंय की आमचं सुलोचनावर प्रेमच नाही?" भानूने विचारले. श्रीनाथ म्हणाला, "मला जे सांगायचं होतं, ते लवकरच ओळखलंस तू! सुनेला ताप असून नणंद अन् सासूनं देवाला जायचं ठरवावं, अन् वर खूप तापलेल्या सुनेलाच पहाटे उठून गोड खिचडी करून द्यायला सांगावं—याला काय प्रेम म्हणतात? तुम्हा दोघींना चांगल्या-वाईटातला फरक दाखवण्यासाठीच मी बिनसाखरेची खिचडी बनवली. तुम्हाला नीट मिळून-मिसळून राहता येत नसेल, तर मला सांग. म्हणजे आम्ही दोघं नवरा-बायको निराळं विऱ्हाड करू." श्रीनाथने कडक आवाजात सांगून टाकले. हे बोलणे ऐकताच भानू व श्रीवल्ली यांना अंगावर वीज कोसळल्यासारखे झाले. पण सुलोचना मध्ये पडून नवऱ्याला म्हणाली, "हे काय बोलताय तुम्ही? मी जिवंत असेपर्यंत निराळ्या विऱ्हाडाचा कधी विचारही नाही करणार! अन् घरातल्या गोष्टी आमच्या आम्ही पाहून घेऊ. तुम्ही आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळलात की पुरे!" आपली सून स्वभावाने किती चांगली आहे, हे आता भानूच्या लक्षात आले. तिने हेही ओळखले की धनदौलतीपेक्षा माणसात आपलेपणा अन् प्रेम हेच जास्त महत्त्वाचे आहे. ती म्हणाली, "श्रीनाथ, तू बनवलेल्या खिचडीमुळे आमचे डोळे उघडले. पुन्हा कधी या घरात असं भांडण होणार नाही." अन् तिने सुलोचनाला प्रेमाने जवळ घेतले.