All Marathi Stories
सुलतानाचे प्रश्न
सुलतान आपला दोस्त हुसेन याच्यासह अरण्यमार्गाने चालला होता. तो स्वतः सुलतान आणि हुसेन एक मामूली माणूस असूनही दोघांची दाट मैत्री होती. सुलतानाला हुसेनच्या हुशारीची कदर होती. या दोघांपासून थोड्या अंतरावरून आणखी एक माणूसही चालला होता.
सुलतानाने आपल्या दोस्तला विचारले, "हुसेन, जो माणूस, आपल्या पुढे चालतो आहे, त्याच्या बाबतीत काही सांगू शकशील?" त्या माणसाकडे निरखून पाहून हुसेन उत्तरला, "तो सुतार असावा, खाविन्द."
"त्याचं नावही सांगू शकशील?" सुलतानाने विचारले.
"त्यांचंही नाव हुसेनच आहे मालक!" हुसेनने पटकन सांगितले.
"म्हणजे याचा अर्थ असा की, तुला तो माणूस पूर्वीपासूनच माहीत आहे. होय ना?" सुलतानाने विचारले.
"नाही मालक, मी तर त्याला आत्ताच पहातो आहे!" दोस्त बोलला.
"मग त्याचं नाव कसं सांगितलंस तू?" सुलतानाने आश्चर्याने विचारले.
"आपण मला माझ्या नावानं संबोधलंत ना, तेव्हा मला असं दिसलं की, तोही वळून आपल्याकडे पाहू लागला. त्यामुळे मला वाटलं की त्याचं नावही हुसेनच असलं पाहिजे!" मित्राने स्पष्टीकरण केले.
"हे तुझं उत्तर बरोबर असेल, पण तो सुतार असावा असं कशावरून म्हणालास तू?" सुलतानाने विचारले.
"मालक, रस्त्यानं चालताना फळा-फुलांच्या झाडांकडे न पहाता, तो फक्त त्या उंच, विस्तारलेल्या, मजबूत खोडावाल्या झाडांकडेच पहात होता. त्यांचं लाकूड चांगलं काम देतं ना! म्हणूनच मी अंदाज केला की हा सुतार असावा." दोस्त बोलला.
"तुझी नजर चांगलीच तीक्ष्ण आहे. अव्वल दर्जाचा हुशार प्राणी आहेस तू. आता असं सांग, या पुढं चालणाऱ्या माणसानं या अगोदर काय खाल्लं असावं?" सुलतानाने आणखी प्रश्न टाकला.
प्रवाशाकडे पुन्हा एकदा बारकाईने पाहून हुसेन म्हणाला, "थोड्या वेळापूर्वी यानं मध किंवा एखादा गोड पदार्थ खाल्ला असला पाहिजे."
"अच्छा ठीक आहे. चल, आता त्यालाच जाऊन विचारू या." सुलतानाने टाळी वाजवली अन् प्रवाशाला आपल्याजवळ बोलावले. तो आल्याबरोबर आपल्या दोस्ताकडे निर्देश करत सुलतानाने त्याला विचारले, "याला ओळखतोस तू?"
प्रवासी उत्तरला, "नाही बाबा! मी नाही ओळखत!"
"प्रवाशा, आता मी तुला तीन प्रश्न विचारतो, संकोच न करता उत्तरं दे." सुलतान म्हणाला.
"हं विचारा." प्रवासी बोलला.
"तुझं नाव काय? तुझा व्यवसाय काय? अन् आत्ता थोड्या वेळापूर्वी तू काय खाल्लंस?" सुलतानाने प्रश्न विचारले.
"माझं नाव हुसेन. मी सुतार आहे आणि अर्ध्या तासापूर्वी मी उत्तम प्रतीचा मध प्यायलो होतो." प्रवाशाने उत्तरे दिली.
"तुझ्या उत्तरांवर खूश आहोत आपण!" असे म्हणत सुलतानाने आपल्या मनगटावरची पोची काढून त्याला दिली.
ती घेऊन प्रवासी मोठ्या खुशीने आपल्या वाटेने निघून गेला. तो गेल्यावर सुलतानाने दोस्त हुसेनला विचारले, "त्यानं मध प्यायल्याचा अंदाज कसा केलास तू?" "तो एकसारखा हातानं ओठ पुसत होता, तोंडाजवळ येणाऱ्या माश्या तो सारखा वारत होता. ते पाहून त्यानं काही गोड खाल्लं असल्याचं ताडलं मी. अन् या भागात मोठ्या प्रमाणावर उत्तम मध मिळतो, म्हणून मला वाटलं की त्यानं मधच प्यायला असावा." हुसेनने स्पष्ट केले.
"दोस्त, तुझ्या नजरेची तारीफ करायला हवी. तुझ्या बुद्धीला दाद देतो मी." असे म्हणत सुलतानाने त्याला प्रेमाने मिठी मारली.