Bookstruck

स्फटिकाच्या डोंगरावर राजकुमारी

उत्तान देशाचा राजा स्वाभिमानी व पराक्रमी होता. युद्ध नसले म्हणजे तो शिकारीला जाई. तो भयंकर व क्रूर अशा जनावरांची शिकारच करीत असे. इतर शिकाऱ्यांसारखी लहान गरीब प्राण्यांची शिकार त्याला आवडत नसे. एकदा तो शिकारीला गेला असता त्याला एक देखील क्रूर जनावर दिसले नाही. काळोख पडल्यावर तो घरी परत निघाला असता त्याला झुडपाआड काहीतरी हलल्याचा भास झाला. राजाने त्याचा पाठलाग केला. ते जनावर नसून तो एक खुजा रानटी जातीचा मनुष्य होता. त्याचे केस पिंजारलेले होते व दाढी लांब होती. त्या रानटी माणसाला धरून राजा आपल्या घरी घेऊन गेला. त्याच्यासाठी राजाने एक खोली बनविली. त्या खोलीला खिडक्या नव्हत्या. खाली जमिनीजवळ अन्न व पाणी पोहोचवण्यापुरते एक भोक ठेवले होते. त्याने खोलीला बाहेरून कुलूप लावले व किल्ली अंत:पुरात ठेवली. राजाने असे जाहीर केले की, जो कोणी या रानटी माणसाला पळून जाण्यास मदत करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. काही दिवसांनी उत्तान देशाच्या शेजारच्या राज्यावर शत्रूने स्वारी केली. त्या देशाच्या राजाने उत्तान देशाच्या राजाकडे मदत मागितली. राजा मदतीला गेला व त्याने जाताना त्या रानटी माणसाला कोंडून ठेवलेल्या खोलीची किल्ली आपल्या राणीजवळ ठेवून दिली. राणी ती किल्ली सतत आपल्या पदराला बांधून ठेवीत असे. उत्तान देशाच्या राजाला एकुलता एक मुलगा होता. त्याचे नाव प्रमद्द्र असे होते. राजाचे त्याच्यावर फार प्रेम होते. तो मुलगा चेंडू घेऊन खेळत खेळत रानटी माणसाच्या खोलीकडे गेला. चुकून त्याचा चेंडू नेमका भोकातून खोलीत गेला व आश्चर्य म्हणजे पुन्हा बाहेर तो तसाच परत आला. मुलाला गंमत वाटली. त्याने पुन्हा चेंडू आत टाकला व चेंडू पुन्हा बाहेर आला. असे दोन-तीनदा झाले. त्याने पुन्हा चेंडू आत टाकला. या खेपेस चेंडू बाहेर आला नाही. प्रमद्द्रने भोकाजवळ जाऊन आत पाहिले. रानटी माणसाच्या हातात चेंडू होता. तो त्याला म्हणाला, "माझा चेंडू आहे, परत दे मला!" "मला या खोलीतून सोडवलंस तर मी देईन," रानटी मनुष्य म्हणाला. मुलाने आपल्या आईच्या पदराला बांधलेली किल्ली तिच्या नकळत काढून घेतली व कुलूप काढून खोलीचे दार उघडले. रानटी मनुष्य बाहेर आला. त्याने राजकुमाराला त्याचा चेंडू देऊन टाकला. राजकुमाराने पुन्हा किल्ली नेऊन आईच्या पदराला बांधून ठेवली. राजधानीभर रानटी खुजा पळून गेल्याची वार्ता पसरली, पण तो कसा पळून गेला हे कोणाला कळले नाही. दुऱ्या दिवशी राजा परत आला. त्याने आपल्या शेजारच्या राजाला जय मिळवून दिला होता. रानटी खुजा मनुष्य नाहीसा झाल्याचे त्याला कळले. राजाला मनस्वी राग आला व त्याने चौकशी सुरू केली. वडिलांना राग आला होता तरी प्रमद्द्रने खरे काय ते सर्व सांगून टाकले. राजा धर्मसंकटात पडला की आपणच जाहीर केले होते आणि आता जाहीर केल्याप्रमाणे आपल्या हाताने स्वतःच्या एकुलत्या एका मुलाला मृत्यूच्या मुखात लोटावे लागणार. तरी स्वतःच्या स्वाभिमानाखातर त्याने दोघा सैनिकांना हुकूम दिला की, राजकुमाराला रानात घेऊन जाऊन त्याचा शिरच्छेद करावा व त्याचे हृदय काढून आणून हजर करावे. राजाज्ञा ऐकून राजधानीभर हाहाकार उडून गेला. सैनिक राजकुमाराला घेऊन रानात गेले. परंतु त्या लहान मुलाचा वध करण्यास त्यांचा हात धजेना. ते प्रमद्द्रला दूर रानात घेऊन गेले व म्हणाले, "राजकुमार, तुमचा वध करण्यास आम्ही तयार नाही. तुम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन राहावे. या राज्यात तुम्ही कधी आलात व दिसलात तर आमचा शिरच्छेद झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर तुमचे रक्षण करो!" प्रमद्द्र रानात दूर निघून गेला. सैनिकांनी एक डुकराचे हृदय काढून राजाला दाखविले. रानात बराच वेळ चालत राहािल्यावर प्रमद्द्रला दुरुन एका किल्ल्याचा तट दिसला. तो त्या किल्ल्याकडे निघाला. वाटेत त्याला एक धनगर भेटला. त्याचे कपडे त्याने मागून घेतले व स्वतःचे त्याला दिले. धनगराचे कपडे घालून तो किल्ल्यात गेला. तो राजाला म्हणाला, "महाराज, मला आपल्या पदरी काहीतरी काम द्यावे. आपण जे काम द्याल ते मी करीन." राजाने त्याला बकऱ्या व मेंढरे चरायला घेऊन जाण्याचे काम दिले. त्या राजाचे नाव शशिवर्ण असे होते. त्याला शशिकाला नावाची एक रूपवती मुलगी होती. दहा-बारा वर्षे लोटली. शशिकाला लहानाची मोठी झाली. तिच्या सौंदर्याची कीर्ती जगभर पसरली. शशिवर्ण आपल्या मुलीला म्हणाला, "मुली, तुला मागणी घालायला शंभरवर राजकुमार आले आहेत. तू कोणा एकाला निवड." शशिकाला म्हणाली, "बाबा, मी स्वयंवराला तयार आहे. जो कोणी आपल्या राजवाड्यालगतच्या स्फटिकाच्या डोंगरावर घोडा दौडवत येऊन माझ्या हातातील फळ घेईल, मी त्याच्याशीच लग्न करीन." राजाने ही अट मान्य केली. अनेक राजकुमार आले, पण स्फटिकाचा डोंगर इतका निसरडा होता की कोणाचेच घोडे वर चढू शकले नाहीत. अनेकांचे हात-पाय मोडले. प्रमद्द्र हा सर्व प्रकार दुरून पाहत होता. त्यालाही शशिकालेशी लग्न करण्याची इच्छा होती, पण तो धनगराच्या वेशात होता. तो उदास बसलेला असताना तोच रानटी खुजा मनुष्य तिथे आला. त्याने प्रमद्द्रला विचारले, "काय रे, असा खिन्न का बसला आहेस?" प्रमद्द्रने आपली अडचण सांगितली. खुजा म्हणाला, "तू काळजी नको करू, मी तुला राजकुमाराला साजेसा पोशाख व एक उत्तम घोडा देतो." प्रमद्द्रने राजेशाही पोशाख घातला व उत्तम घोड्यावर बसून तो स्फटिकाच्या डोंगरापाशी पोहोचला. त्याने घोड्याला टाच मारली आणि त्याचा घोडा बाणासारखा डोंगराच्या टोकाला जाऊन पोहोचला. राजकुमारीने पुढे होऊन त्याला ते फळ दिले. प्रमद्द्र ते फळ घेऊन तसाच खाली आला व सरळ निघून गेला. त्याने पुन्हा आपले धनगराचे कपडे घातले आणि कामाला लागला. राजाला व राजकुमारीला प्रश्न पडला की तो राजकुमार कोण होता? राजाने आज्ञा काढली की राज्यातील सर्व तरुणांनी हजर राहावे. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्व आले. शशिकाला प्रत्येकाला न्याहाळून पाहत होती, पण तिला तो राजकुमार कोठेच दिसेना. शेवटी धनगरांची पाळी आली. प्रमद्द्रला पाहताच ती आनंदाने ओरडली, "हाच! हाच तो राजकुमार!" बाकीचे सर्व लोक हसले, पण शशिकाला आपल्या निर्णयावर ठाम होती. राजाने प्रमद्द्रला जवळ बोलावून विचारले, तेव्हा त्याने आपले सर्व आत्मचरित्र सांगितले. आपली मुलगी ज्याची निवड केली आहे तो खरोखरच एक राजकुमार आहे हे कळल्यावर राजाला खूप आनंद झाला. त्याने उत्तान राजाकडे दूत पाठवून ही आनंदाची बातमी कळविली. उत्तान राजा व राणी लवाजम्यासह लग्नाला आले. प्रमद्द्र व शशिकाला यांचे लग्न मोठ्या थाटात झाले.