Bookstruck

स्वप्न सुंदरी

हट्टी विक्रमादित्य पुन्हा झाडाजवळ गेला, झाडाच्या फांदीला लटकणारे प्रेत त्याने आपल्या खांद्यावर टाकले आणि नेहमीप्रमाणे शांतपणे स्मशानाच्या वाटेने चालू लागला. अशा रीतीने तो चालत असताना प्रेतात वास करणारा वेताळ बोलू लागला— "राजा, मध्य-रात्रीच्या वेळी या भयानक जागी तू कशासाठी संचार करीत आहेस हे मला माहीत नाही. पण एखाद्या गुप्त खजिन्यासाठी वा कोण्या सौंदर्यवतीच्या शोधार्थ तुझी ही भटकंती चालू असेल, तर मी तुला सावध करू इच्छितो. भरपूर परिश्रम करूनही कधी कधी आपली इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. काही लोकांच्या इच्छा पूर्ण होतात ही, पण आपला अविवेक नि मूर्खपणा यांमुळे ते त्याचा सदुपयोग करू शकत नाहीत. उदाहरणादाखल मी तुला एका राजकुमाराची गोष्ट सांगतो. नीट सावधपणे ऐक, थोडा श्रमपरिहार ही होईल तुझा." आणि मग वेताळ गोष्ट सांगू लागला. प्राचीन काळची गोष्ट आहे. मणिद्वीप राज्यावर राजा माणिकवर्मा राज्य करीत असे. त्याला सुधीर नावाचा फक्त एकच मुलगा होता. माणिकवर्माच्या उतार वयात त्याला हा मुलगा झाला होता. तो वीस वर्षांचा झाला, एवढ्यात राजा म्हातारा झाला. त्याचे लग्न करून राज्यकारभाराचा भार त्याच्यावर टाकावा असा राजाने विचार केला. अनेक राजकुमारी बाबत विचार करून शेवटी राजाने रत्नगिरीची राजकुमारी रत्नप्रभा हिला आपली सून म्हणून पसंत केले. रत्नप्रभा सुंदर व शालीन मुलगी होती. ती अनेक कलांत प्रवीण होती. ती फार बोलत नसे, पण बोलेल ते मार्मिक बोलायची. राजाला ती एकदम आवडली. पण आपली आवड सुधीरवर लादणे राजाला पसंत नव्हते. राजाने आपला हा विचार सुधीरला सांगितला. रत्नप्रभेचे रेखाचित्र त्याला दाखवून म्हणाला— "मी तुझ्यासाठी ही राजकुमारी रत्नप्रभा पसंत केली आहे. तुझी संमती असेल तर विवाहाच्या बाबतीत पुढे बोलणे करू. बेटा, मी आता म्हातारा झालो. राज्यकारभार मी आता सांभाळू शकणार नाही. आता हा भार तूच आपल्या शिरावर घेतला पाहिजे." सुधीरने चित्र आपल्या हाती घेतले, लग्नाबाबत उद्या सांगीन असे राजाला आश्वासन देऊन तो आपल्या महालाकडे गेला. त्या दिवशी सुधीरने झोपेत असताना स्वप्नात एक अद्भुत लावण्यवती सुंदरी पाहिली. तिच्या शरीराचा रंग सोनेरी होता. डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे होते. काळे भोर लांबसडक केस नि चाफ्याच्या कळीसारखं नाक असलेली ती सुंदरी सुधीरकडे बराच वेळ पहात राहिली, नि अदृश्य झाली. सुधीर झोपेतून जागा झाला, नि मग त्याला झोप लागेना. त्याच्या मनात ती स्वप्न-सुंदरी बराच वेळ पर्यंत रेंगाळत राहिली. ती कुठे तरी जरूर असली पाहिजे आणि तिच्याशीच लग्न करायचं असा विचार त्याने पक्का केला. हा विचार करीत असताना राजाने पसंत केलेली रत्नप्रभा ही त्याच्या स्मरणात होती. रत्नप्रभेहून ही स्वप्न-सुंदरीच सुधीरला अधिक आकर्षक वाटली. दुसऱ्या दिवसापासून सुधीरने आपल्या वडिलांना सांगितले— "पिताजी, काही दिवस मी एकटाच आपल्या देशात संचार करून प्रजेची सुख-दु:खे जाणून घेऊ इच्छितो. राज्यकारभार सांभाळण्यापूर्वी हा अनुभव घेणे मला आवश्यक वाटते. परत आल्यावर लग्नाबाबत विचार करीन. आपला काय सल्ला आहे?" राजाने मुलाची इच्छा पूर्ण करायचा निर्णय घेतला नि सुधीरला अनुमति दिली. मग सामान्य नागरिकाच्या वेषात सुधीर घोड्यावर बसला नि त्या स्वप्न-सुंदरीच्या शोधार्थ निघाला. तीन महिने अनेक ठिकाणी शोध करून ही त्याला ती सुंदरी कोठे आढळली नाही. धर्मशाळेत दूर दूरच्या प्रांतातून आलेले यात्रेकरू नि व्यापारी यांना ही त्याने विचारलं, पण कोठे ही तिचा पत्ता लागेना. आणखी दोन महिने तो आपल्या स्वप्नातील राणीच्या शोधार्थ भटकत राहिला. शहरातून, खेड्यातून, घरोघरी त्याने तपास केला, पण त्याला आपली प्रेयसी सापडली नाही. आता राजकुमार सुधीर कंटाळून गेला, थकला बिचारा! सतत प्रवास आणि वेळी-अवेळी जेवण यांमुळे राजकुमाराची तब्येत बिघडली. त्याचं संपूर्ण रूप बदलून गेलं. सुधीरने दोन-तीन दिवस पूर्ण विश्रांती घेतली आणि जरा बरा झाल्यावर आपले भ्रमण पुढे सुरु केले. एक दिवशी दुपारी सुधीर एका नदीच्या किनाऱ्यावर पोचला. घोड्याला चरायला सोडलं आणि एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. बराच दमला होता तो. नदीवरून येणारा वारा मोठा सुखद होता. सुधीरला तिथेच झोप लागली. तो जेव्हा जागा झाला तेव्हा संध्याकाळ झालेली होती. त्याला घोडा कोठे दिसेना. घोड्याच्या शोधार्थ सुधीर नदीच्या किनाऱ्याने चालू लागला. एका ठिकाणी मासे पकडण्यासाठी गळ टाकून एक युवती बसलेली त्याला दिसली. सुधीरने तिला विचारले— "या बाजूला एखादा घोडा जाताना दिसला का तुला?" एकदम हा प्रश्न ऐकून दचकून त्या युवतीने मागे पाहिले. अन् काय आश्चर्य? राजकुमार सुधीरची हीच ती स्वप्नसुंदरी! तिला पाहून सुधीर खुश झाला. उत्साहाच्या भरात सुधीर तिला म्हणाला— "शेवटी जिला मी शोधत होतो ती सापडली! मी स्वप्नात पाहिलेली सुंदरी तूच. तुला शोधत मी किती दिवस हा भटकतो आहे बघ. उन्हात तापलो, पावसात भिजलो, पण शेवटी तू एकदाची सापडलीस. चल माझ्या बरोबर. मला तुझ्याशी लग्न करायचंय!" सुधीरचं हे बहकल्यासारखं बोलणं ऐकून ती युवती घाबरली नि जवळच्या आपल्या झोपडीकडे तिने धूम ठोकली. सुधीर ही तिच्या मागे पळू लागला. सुधीर झोपडीपाशी पोचला, एवढ्यात आतून एक म्हातारा बाहेर आला. त्याने सुधीरला आपादमस्तक न्याहाळलं आणि कडवट आवाजात विचारलं— "तू कोण? कुठल्या गावाहून इथं आलास? तुझे आई-वडील कोण? तू माझ्या मुलीला म्हणालास की स्वप्नात तू तिला पाहिलीस नि तुला तिच्याशी लग्न करायचंय! हे काय सभ्य माणसासारखं बोलणं आहे होय? अगोदर तुझं नाव सांग, माझ्या प्रश्नांची नीट उत्तरं दे पाहूं!" म्हाताऱ्याचे सगळे प्रश्न ऐकून सुधीर गडबडला! जरा शुद्धीवर आल्यावर कापऱ्या आवाजात म्हणाला— "बाबा, तुमच्या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर मी देऊ शकतो—मी एक मूर्ख माणूस आहे!" एवढं सांगून सुधीर राजधानीकडे परतला. राजधानीत येऊन त्याने रत्नप्रभेशी विवाह केला आणि अनेक वर्षे सुखा-समाधानाने राज्य केले. जनतेची सेवा करून तो मोठा लोकप्रिय राजा झाला. वेताळाने आपली गोष्ट पूर्ण केली आणि राजाला विचारले— "राजन्, सुधीरने अनेक हाल-अपेष्टा सहन केल्या, शेवटी तो आपल्या स्वप्न-सुंदरीला पाहू शकला. तरी पण म्हाताऱ्याला तो म्हणाला— 'मी एक मूर्ख माणूस आहे.' हाती आलेली संधि त्याने सोडली! तो खरंच का मूर्ख होता? माहीत असून ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर तुझे मस्तक फाटून त्याचे शतश: तुकडे होतील." यावर राजा विक्रम म्हणाला— "सुधीर मूर्ख नव्हता व बुद्धिहीन पण नव्हता. तो फार विवेकी आणि बुद्धिमान होता असं ही म्हणता येणार नाही. स्वप्नात पाहिलेल्या सुंदरीच्या शोधार्थ चारी दिशांना धावणं हा अविवेकच आहे. म्हाताऱ्याने विचारलेले प्रश्न ऐकून आपली चूक सुधीरच्या लक्षात आली. एका सामान्य माणसाने आपल्या मुलीशी लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणाला इतके प्रश्न विचारले! मग आपण स्वतः राजकुमार असताना राणी बनणाऱ्या मुलीची योग्यता नीट पारखायला नको का? नुसतं सौंदर्य पाहून कुणाला राणी बनवणं मूर्खपणा आहे हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून सुधीरने आपल्या वडिलांना स्वप्न-सुंदरी बद्दल काही ही सांगितलं नाही. विवेकपूर्वक त्याने आपले कर्तव्य पार पाडले." अशा रीतीने राजाचा मौन-भंग झाल्यावर वेताळ प्रेता सह अदृश्य झाला आणि झाडावर चढून लटकू लागला.