स्वप्नाचा जादू
शेखर व विठ्ठल दोघे जीवश्चकंठश्च मित्र होते. दोघे एकाच वर्गात लहानपणी शिकत होते. शिक्षण संपल्यावर शेखरला विठ्ठलपेक्षा चांगली नोकरी मिळाली. दोघे एकाच गावी बिऱ्हाड करून राहू लागले होते.
परंतु विठ्ठलची बायको रखमाबाई व शेखरची बायको पार्वती दोघींमध्ये सख्य नव्हते. कारण शेखरची बायको श्रीमंत घराण्यातून सासरी आली होती व म्हणून ती रखमाबाईचा योग्य मान राखीत नसे. दुर्दैवाने एकदा विठ्ठलच्या घराला आग लागली. परंतु विठ्ठलने जिवावर उदार होऊन आपल्या बायकोला व मुलांना वाचविले. तरी त्याच्याजवळ जे काही थोडेफार होते ते सर्व अग्नि नारायणाच्या आहारी गेले. विठ्ठलवर ओढवलेल्या घोर दैवी प्रकोपाबद्दल शेखरला फार वाईट वाटले. विठ्ठलचे शेखरसारखेच आणखी काही मित्र होते. सर्वांनी मिळून विठ्ठलला मदत करायची ठरविले असते, तर घर पुन्हा उभे राहू शकले असते.
परंतु नेमका त्यावेळीच शेखरचा हात रिकामा होता. त्याच्या बायकोजवळ माहेरून आणलेले दागिने होते. पार्वतीला तिचे दागिने जिवापेक्षा मोठे वाटत. झोपताना सुद्धा ती सर्व दागिने घालूनच निजे. ते फार मौल्यवान होते. शेखरला काय करावे, सुचेना. त्याला त्यावेळी पैसे देणे तर शक्यच नव्हते. निदान बायकोचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढून काही मदत करता आली असती, आणि विठ्ठलने त्याची स्थिती सुधारल्यावर कर्जाची रक्कम फेडलीही असती. परंतु पार्वती त्या गोष्टीस कशी कबूल होणार?
बराच विचार केल्यानंतर शेखरला एक युक्ती सुचली. पार्वतीचा स्वप्नांवर फार विश्वास होता. ती सांगे की जे स्वप्नात घडते ते कधी ना कधी खरे होतेच! कारण त्यापूर्वी तिला किंवा शेखरला जी स्वप्ने पडली होती, ती योगायोग असा की सर्व खरी ठरली होती. म्हणून शेखरने बायकोचा स्वप्नांवर जो विश्वास आहे, त्याचा उपयोग या प्रसंगी करून घेतला पाहिजे असे ठरविले.
एके दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास शेखर दचकल्यासारखा झोपेतून उठला. पार्वतीसुद्धा जागी झाली व आपल्या अंगाखांद्यावर दागिने आहेत की नाही, याची प्रथम खात्री करून घेऊन तिने नवऱ्याला विचारले— "काय झालं हो?"
शेखर म्हणाला— "अगं, मला एक मोठे वाईट स्वप्न पडले. आपल्या घरात चोर शिरले आहेत."
"बरं मग आता काय करायचे म्हणता?" पार्वतीने विचारले.
"करायचं काय? अगं, हे तर स्वप्नच होतं ना! सकाळी उठल्यावर मी कदाचित विसरेन म्हणून आता सांगून टाकलं, एवढंच!" शेखर म्हणाला.
"तुम्ही अशी उडवाउडवी करून टाळू नका! तो पहा, कोंबडा सुद्धा आरवला. पहाटेची स्वप्न कधी खोटी होत नाहीत. यापूर्वी पहाटे पडलेली स्वप्न खरी नाही का झाली?" पार्वती म्हणाली.
"तू म्हणतेस ते अगदी खरं आहे गं! पण काय करावं म्हणतेस?" शेखरने तिला विचारले.
"आपण हे सर्व दागिने घरातच कोठे तरी पुरून ठेवूया! चोरांना पत्ता लागणार नाही!" पार्वतीने सुचवले.
"चोर घरात शिरल्यावर दागिने मिळाले नाहीत तर नुसते सोडून देतील का आपल्याला? दागिन्यांसाठी आम्हाला मारायला तयार होणार नाहीत का?" शेखरने विचारले.
पार्वतीने होकारार्थी मान हलविली. कसे मान्य होणार. म्हणून शेखरने थोडा वेळ थांबून म्हणाला— "एक काम करूया. आपला एक श्रीमंत मित्र आहे. अशा वाईट स्वप्नांचा परिणाम वर्षा-दोन वर्षांनंतर राहत नाही. म्हणून आपण सर्व दागिने त्याच्याकडे नेऊन ठेवूया. हे सुद्धा तुझ्या मनाच्या समाधानासाठी! तसं म्हणालीस तर माझा तुझ्यासारखा स्वप्नांवर विश्वास नाही."
पार्वतीला ती सूचना मान्य झाली. दुसऱ्या दिवशी तिने अंगावरचे सर्व दागिने नवऱ्याच्या हातात दिले. शेखर ते दागिने घेऊन विठ्ठलच्या घरी गेला. परंतु विठ्ठलला ते मान्य नव्हते. परक्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढणे त्याला मान्य होणार नव्हते. म्हणून शेखरने स्वतःच बायकोचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले व विठ्ठलला आणून दिले. विठ्ठलचे डोळे शेखरच्या या उपकाराने डबडबून आले.
काही दिवसांनी पार्वतीने दागिने परत आणायला सांगितले. पण शेखरने त्याचा तो श्रीमंत मित्र परगावी गेला असल्याचे सांगून ती गोष्ट टाळली.
त्यानंतर तीन दिवसांनी एक चोर तोंडावर बुरखा घालून एक सुरा घेऊन शेखरच्या घरात शिरला. त्याने शेखरला व त्याच्या बायकोला सुरा दाखवून विचारले— "घरात दागिने कोठे ठेवले आहेत सांगता की भोसकू सुरा?"
पार्वती तर घाबरून थरथर कापू लागली. तिला समजावून सांगून शेखर चोराला म्हणाला— "तुला आमचे घर पाहून वाटत असेल आम्ही खूप श्रीमंत आहोत व पुष्कळ दागिने असतील आमच्या घरात. परंतु खरी गोष्ट ही आहे की तुला वाटते तसे आमच्या घरात दागिने व पैसे तर नाहीतच नाहीत, उलट आमच्यावर कर्ज आहे, कर्ज!"
चोर थोडा वेळ गप्प राहिल्यावर चिडून म्हणाला— "तू चोराला आपल्या कर्जाचे रडगाणे सांगणारा कसाला मर्द आहेस रे? नक्कीच काही तरी फसवाफसवी दिसते आहे. मी पुन्हा येईन तेव्हा चांगली खोल चौकशी करून येथे येईन. मला जर कळलं की तू मला फसवलं आहेस तर मात्र तुझी अशी खोड मोडीन की तुला जन्मभर आठवण राहील." असे सांगून व पुन्हा एकदा सुरा दाखवून चोर निघून गेला.
चोर निघून गेल्यावर पार्वतीने स्वतःला सावरून म्हणाली— "पाहिलंत, तुम्हाला पडलेलं स्वप्न खरं ठरलं! आपलं नशीब चांगलं होतं, म्हणून आपण वेळीच सावध झालो. नाही तर त्या चोराने आपणास मारून टाकले असते."
पुष्कळ दिवसांनी विठ्ठलने आपले कर्ज फेडले आणि शेखर दागिने सोडवून घेऊन घरी परत आला. बायकोला दागिने परत देत म्हणाला— "आता पुष्कळ दिवस होऊन गेले, आता चोराची भीती बिलकूल राहिली नाही."
पार्वतीने देवाचे आभार मानून सर्व दागिने पाहिले आणि आनंदाने अंगावर घातले. बायकोच्या या भोळेपणावर शेखरला हसू आले. स्वप्नावरचा तिचा विश्वास त्याच्या चांगलाच पथ्यावर पडला. एका मित्राला तो संकटातून वाचवू शकला. त्याने ही घडलेली गोष्ट चुकूनसुद्धा आपल्या बायकोला कळू दिली नाही की त्याच्या घरात शिरलेला चोर त्याचाच एक मित्र होता.