स्वयंपाकी
पालीच्या बाजारात गोपू व रघू हे बालमित्र कित्येक दिवसांनी परस्परांना अचानक भेटले. लग्न झाल्यानंतर दोघे निरनिराळ्या गावात राहू लागले होते. गोपू व्यापार करू लागला. त्याच्या बायकोचे नाव शांताबाई होते. दोघांना एक मुलगा होता, त्याचे लग्नाचे वय झाले होते.
रघू शेतकामात रमला होता. त्याची बायको रुक्मिणी हुशार होती. त्यांना सतरा-अठरा वर्षांची एक मुलगी होती व तिचे लग्नाचे वय झाले होते.
दोघांचा व्यवसाय निराळा होता, परंतु एका गोष्टीत त्यांच्या आयुष्यात साम्य होते. दोघांच्या बायका फार आळशी होत्या. त्या कधी स्वयंपाक करीत नसत. नवऱ्याला सुद्धा भात उकडून वाढत नसत. त्यांना स्वयंपाक करता येत नव्हता असे मुळीच नाही, परंतु स्वयंपाक करणे त्यांना आवडत नसे. नाइलाजाने त्यांना स्वयंपाक करावा लागे तेव्हा त्या असा करीत की खाववत नसे व सर्वांना उपाशी राहावे लागे. म्हणून दोघे मित्र घरी आल्यावर स्वतः स्वयंपाकही करीत.
दोघे बाजारात भेटले तेव्हा दोघांना त्यांच्या बायकांचा हा आळशीपणा घालवण्याला एक युक्ती सुचली. असे ठरले की गोपूच्या घरी रघूने व रघूच्या घरी गोपूने जायचे व स्वतःची ओळख न सांगता पाहुणे म्हणून राहायचे. त्याप्रमाणे दोघे मित्र परस्परांच्या घरी अचानकपणे पोहोचले.
रघू शांताबाईंना म्हणाला— "अहो वहिनी, म्हणजे गोपू घरी नाही म्हणता? मग कसं व्हायचं हो? अहो, मी तुमच्याकडे आपल्या मुलीकरिता स्थळ पाहायला आलो होतो."
शांताबाईंना परमानंद झाला. रघू बाजाराकरिता आला होता, म्हणून त्याचा पोशाख त्या दिवशी श्रीमंतासारखा दिसत होता. मुलाला चांगला हुंडा मिळण्याची आशा तिला वाटू लागली. ती म्हणाली— "येतील हो, बाजारात गेले आहेत!" असे सांगून शांताबाईंनी सुग्रास जेवण तयार करून पाहुण्यांना वाढले. गोपू घरी परतला नाही, तरी शांताबाईंनी रघूला आग्रह करून म्हणाली— "भावजी, उद्या नक्की परत येतील, तुम्ही थांबलंच पाहिजे."
चार दिवस झाले, तरी गोपू परतला नाही. रघूने गोपूच्या घरी चारही दिवस खूप मेजवान्या उडवल्या. शेवटी शांताबाईंना हे सांगून की आता मला घरी परतलेच पाहिजे, गोपू आपल्या गावी निघाला.
तिकडे रघूच्या बायकोने (रुक्मिणीने) गोपूचा आतिथ्य सत्कार चार दिवस केला. दररोज नवे पक्वान्न तयार होई. तिचा आळशीपणा कोठे गेला कोणास ठाऊक? गोपूला मेजवान्या मिळत होत्या. त्याने सुद्धा रघू येईल म्हणून चार दिवस वाट पाहण्याचे नाटक केले आणि पाचव्या दिवशी आपल्या वहिनीचा निरोप घेतला.
दोघे आपापल्या घरी आले तेव्हा त्यांना त्यांच्या बायकांनी त्यांचे मित्र स्थळाच्या चौकशीसाठी आल्याचे सांगून वाट पाहून शेवटी निराश होऊन परतल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांच्या बायकांनी लग्नाविषयी बोलणी करायला आपापल्या नवऱ्यांच्या मागे टुमणे लावले. दोघे मित्र पुढच्या आठवड्याच्या बाजारात भेटले आणि त्यांच्या बायकांकडून कसा पाहुणचार झाला याच्या गमती परस्परांना सांगून आपली युक्ती यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला.
गोपू परतल्याबरोबर शांताबाईंनी त्याला विचारले— "मग काय झालं हो? भावजी काय म्हणाले स्थळाविषयी?"
गोपू मुद्दाम रागाचे सोंग करून उत्तरला— "ते किती श्रीमंत झाले म्हणून काय झालं, इतका गर्व करण्याची त्यांना गरज काय होती? हे स्थळ नकोच!"
"असे झाले तरी काय?" शांताबाईंनी विचारले.
"व्हायचं काय? म्हणाला, त्यांची मुलगी म्हणे स्वयंपाक करणार नाही. म्हणजे लग्नानंतर आपला मुलगा तिला स्वयंपाक करून वाढणार का?" गोपूने रागाचा आव आणून विचारले.
"इश्श! ते कसं होईल? काहीतरीच बाई!" शांताबाई म्हणाली.
"रघूला कोणीतरी सांगितल्यासारखं दिसतं आहे की आपल्या घरात स्वयंपाक मलाच करावा लागतो म्हणून! आणि मला कळलं आहे की त्याची बायको सुद्धा स्वयंपाक करीत नाही!" गोपू म्हणाला.
शांताबाईंना वाटू लागलं की आपल्या अशा वागणुकीमुळे एक चांगलं आलेलं स्थळ हातातून निसटणार. ती नवऱ्याला म्हणाली— "तुम्ही जाऊन त्यांचा गैरसमज दूर करा. सांगा की माझी तब्येत कधी बरोबर नसली, म्हणजे तुम्हांला स्वयंपाक करावा लागतो. बाकी नेहमी मीच स्वयंपाक करते."
"हे गं काय तुझं म्हणणं? त्यांनी मला येऊन तोंडावर हे थोड़ेच सांगितले! मी आपल्यातर्फे हे जाऊन सांगू लागलो तर माझंच हसं होईल. एक चांगलं स्थळ हातातून निसटतं आहे, एवढं मात्र खरं!" गोपू असं म्हणत गप्प झाला.
तिकडे रघू उदास चेहरा घेऊन घरी परतला व म्हणाला— "आता मी तरी काय सांगू? आपल्या नशिबातच नाही, हे चांगलं स्थळ चालून आलेलं परत गेलं!"
"म्हणे झालं तरी काय?" रुक्मिणीने विचारले.
"ते म्हणाले, लग्न झाल्याबरोबर स्वयंपाक्याला काढून आमच्या मुलीकडून ते स्वयंपाक करविणार म्हणे! त्यांना कळलं म्हणे की आमच्या घरी पुरुषच स्वयंपाक करतात!"
"पण, हे काय बोलणं झालं? तुम्ही स्वतःच हौशीने स्वयंपाक करता! मी स्वयंपाक करणार नाही असे कधी म्हटलं का? तुम्ही घरी नव्हतात तेव्हा मी नव्हता का सर्व स्वयंपाक करून त्यांना वाढला? दररोज नवं पक्वान्न वाढलं! भावजींना चार दिवस मीच स्वयंपाक करून वाढलं नव्हतं का?" रुक्मिणी म्हणाली.
"मग तुझं म्हणणं काय?" रघूने विचारलं.
"आमची मुलगी स्वयंपाक कां नाही करणार? एक स्वयंपाक करण्याची गोष्ट घेऊन का चांगलं स्थळ हातातून जाऊ द्यायचं? तुम्ही आताच जाऊन मुहूर्त ठरवून या." रुक्मिणीने रघूला आग्रह केला.
रघू गोपूंकडे जाऊन म्हणाला— "मित्रा आणि वहिनी! माझी मुलगी स्वयंपाक करायला तयार आहे. मग ठरवायचा का मुहूर्त?"
ते ऐकून शांताबाईंना भांड्यात जीव पडल्यासारखं वाटलं. रुक्मिणीला रघूकडून मुहूर्त ठरल्याचे कळलं तेव्हा ती शपथ घेऊन म्हणाली— "देवा! मी कान धरते, यापुढे मी यांना कधी स्वयंपाकघरात पाऊल टाकू देणार नाही."
लग्नकार्य उरकल्यावर सर्व गुपित प्रकट झालं. कृत्रिम परिस्थिती नाहीशी झाली आणि रघूला आणि गोपूला स्वयंपाकाच्या कामातून कायमची सुटका मिळाली.