Bookstruck

हमी-पत्र

चन्द्र हा एक गरीब तरुण होता. मायारामकडे गुमास्त्याची एक जागा रिकामी असल्याचे कळल्यावरून तो नोकरीबाबत विचारायला त्याच्याकडे गेला. मायाराम चन्द्रला म्हणाला, "मला एका गुमास्त्याची आवश्यकता आहे, ही गोष्ट खरीच. मला दर आठवड्यात एकदा माल खरेदी करायला शहरात जावं लागतं. इथे त्या दिवशी जी विक्री होते, ती सगळी रक्कम त्या दिवशी गुमास्त्याजवळच राहते. यापूर्वीही दोन नोकरांनी मला दगा दिला आहे. आता ही नोकरी तुला हवी असेल, तर अमानत म्हणून तुला माझ्याकडे एक हजार रुपये जमा करावे लागतील. किंवा दोन-तीन प्रतिष्ठित लोकांची शिफारस आणून त्यांच्याकडून हमी-पत्र लिहवून आणावं लागेल." मायारामचे बोलणे ऐकून चन्द्र म्हणाला, "असं करा महाराज, दुकान बंद झाल्यावर आपण माझ्याबरोबर चला. आपल्याला हवी असणारी हमी देववू शकेन." त्या दिवशी संध्याकाळी चन्द्र मायारामला बरोबर घेऊन सावकारी करणाऱ्या सियारामकडे गेला आणि त्याने एक हजार रुपये कर्जाऊ मागितले. यावर व्यंगाने हसून सियाराम म्हणाला, "तू तर माझ्या घराजवळच्याच झोपडीत राहतोस. खूप दिवसांपासून मी तुला ओळखतोय. मुद्दलाची गोष्ट सोडा, पण माझं व्याजही देऊ शकणार नाहीस तू. तुझ्यासारख्याला कर्ज देऊन संकट ओढवून घ्यायला मी मूर्ख थोडाच आहे!" चन्द्र मायारामला म्हणाला, "अमानतीच्या पैशांसाठी मी केलेला प्रयत्न फसला आहे. आता मी प्रतिष्ठित लोकांकडून हमी मिळवायचा प्रयत्न करतो." असे म्हणून त्याला घेऊन गावपाटील गंगाराम याच्याकडे गेला. आश्चर्याने चन्द्रकडे पहात गंगाराम म्हणाला, "ओहो, तुझं नाव चन्द्र होय? मी तुला अनेकदा पाहिलंय. माझा नोकर म्हणत होता की, तू इतर मुलांसारखा कुठलेही वाईट काम करत नाहीस; चांगला मुलगा आहेस तू. पण याचा अर्थ असा नव्हे, की मी तुला हमी-पत्र लिहून देईन." एक शब्दही पुढे न बोलता चन्द्र मायारामला घेऊन गाव कोतवालाकडे गेला. सारी हकीकत सांगून त्याने कोतवालाला हमीपत्र देण्याची विनंती केली. कोतवाल गुरगुरत बोलला, "अरे तू स्वतःला समजतोस कोण? माझ्याकडे हमीपत्र मागायची हिंमत तुला कशी झाली?" आणि रागाने धुमसत त्याने एका शिपायाला बोलावून विचारले, "काय रे, हा कोणी कसलेला गुन्हेगार असावा, नाही का?" पण तो पोलीस उत्तरला, "तसे नाही साहेब, याचे घर त्या तलावाजवळ आहे; आणि तिथले सारे लोक म्हणतात की हा मोठा चांगला मुलगा आहे. तुम्हाला वाटते, तसा हा कोणी चोर किंवा अपराधी नाही. पण बिचारा बेकार आहे." शिपायाच्या या बोलण्याने कोतवाल शांत झाला. पण तरीही तो म्हणाला, "तू काहीही म्हण. पण बेकार माणूस फार दिवस चांगला राहू शकत नाही. तो लवकरच चोऱ्या वगैरे करू लागतो. तू याच्यावर चांगली नजर ठेव." आणि नंतर चन्द्रकडे वळून तो म्हणाला, "लवकर चालू लाग इथून. सज्जनांना इथे यायला मनाई आहे." चन्द्र तिथूनही मायारामसह परत फिरला. वाटेत तो म्हणाला, "महाराज, मी एक अभागी मनुष्य आहे. मी कोणाकडूनही आपल्याला हमीपत्र देऊ शकत नाही." चन्द्रच्या या बोलण्यावर हसून मायाराम म्हणाला, "तुझ्या लक्षात आले नसेल. पण 'नाही, नाही' म्हणत त्या तिघांनीही तुला हमीपत्र दिले आहे; तुझ्या सद्गुणांची पुरेशी प्रशंसा केली आहे. यापेक्षा अधिक मला काय हवे आहे? तू उद्यापासूनच नोकरीवर रुजू हो."