हरवलेली अंगठी
एका शबर राजाच्या पदरी इल्लू आणि मल्लू नावाचे दोन नोकर होते. दोघे विश्वासपात्र नोकर होते. परंतु राजाची मर्जी, का कोणास ठाऊक, इल्लूवर जास्त होती. एकदा राजाने दोघांना बोलावले व म्हणाला— "जा, तुम्ही आपापल्या घरी जाऊन चार दिवस बायकापोरांबरोबर राहून या. चार दिवसांनी एक मेळावा आहे, तेव्हा या." असे सांगून राजाने दोघांना इनाम म्हणून एकेक वस्तू दिली. इल्लूला एक दगड मिळाला आणि मल्लूला सुरणाचा कांदा मिळाला. दोघे आश्चर्य करीत राजाचा निरोप घेऊन आपापल्या गावी निघाले.
इल्लूला राजाने इनाम म्हणून एक दगड का दिला, हे कळले नाही. त्याला त्याबद्दल राग आला. त्याचे ओझे उचलून नेण्याऐवजी तो कोठेतरी ठेवून देण्याचे ठरवून त्याने एका झुडपात तो ठेवला. ते पाहून मल्लू म्हणाला— "अरे, हा सुरणाचा कांदा तरी कमी वजनाचा आहे का? पण त्याची भाजी करून तरी खाता येईल. म्हणून तू पाहिजे तर हा घे. मी राजाने दिलेला दगड ठेवून घेतो." इल्लू त्या गोष्टीस कबूल झाला आणि दोघांनी परस्परांच्या बक्षिसांची अदलाबदल करून घेतली. इल्लूच्या बायकोने सुरणाची भाजी केली आणि दोघांनी ती खाल्ली. मल्लू घरी गेल्यावर चांदण्यात बसून तो दगड खालीवर करून पाहू लागला, तेव्हा त्याला दगडाला एक चीर गेलेली दिसली आणि आत काही चमकल्याचा भास झाला. त्याने काळजीपूर्वक तो दगड उघडून पाहिला, तेव्हा त्याला आत सोन्या-चांदीचे दागिने दिसले.
मल्लूने विचार केला, आपली राजावर मर्जी होती म्हणून त्याला राजाने हे दागिने गुप्तपणे दिले होते, पण आपलेच नशीब बलवत्तर आहे म्हणून ते आपल्याला मिळाले. चार दिवसांनी दोघे महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मेळाव्यात भाग घ्यायला आले. मेजवानी चालू होती. पंगतीत एका जागी मल्लू बसला होता. त्याच्या अंगावर इल्लूला दिलेले सोन्याचे दागिने पाहून राजाला आश्चर्य वाटले. त्याने त्याला विचारले— "तुला हे दागिने कोठे व कसे मिळाले रे?"
मल्लूने घडलेली गोष्ट जशीच्या तशी सांगितली. इल्लूने स्वखुशीने टाकून दिलेला दगड त्याने कसा उचलला आणि सुरणाच्या कांद्याबरोबर इल्लूने दगडाची अदलाबदल कशी करून घेतली, ते सांगितले. इल्लूने माफी मागितली व राजाने त्याला क्षमा केली. परंतु राजाला मल्लूला फुकटात मिळालेले दागिने पाहून राग आला. म्हणून राजा मेजवानी संपल्यावर त्याला बोलावून म्हणाला— "तू इल्लूपेक्षा जास्त समजूतदार निघालास म्हणून मी तुला ही अंगठी बक्षीस देतो. ही तू सांभाळून ठेव आणि एका आठवड्यानंतर पुन्हा मी बोलवीन तेव्हा ती घेऊन येऊन मला दाखव. परंतु जर का तू ती दाखवली नाहीस, तर तुझे डोके उडवले जाईल."
राजाने आपल्यावर राग काढण्यासाठी हा उपाय केला आहे, हे मल्लूने ओळखले. तरी काही बोलला नाही व ती अंगठी कोणाच्या नजरेस पडू नये यासाठी त्याने ती लपवून ठेवण्याचे ठरवले. रात्री त्याची बायको व मुले झोपी गेल्यावर त्याने घराच्या भिंतीला एक लहानसे भोक करून त्यात अंगठी ठेवली व ओली माती लावून भोक बुजले आहे हे कळणार नाही अशा तऱ्हेने सारखे करून ठेवले. उजाडण्यापूर्वी ओली माती वाळून गेली, म्हणून बुजविल्याचे चिन्हसुद्धा राहिले नाही. तेव्हा त्याला जिवाला धोका नसल्याचे समाधान वाटले.
दुसरीकडे, राजाने मल्लूच्या बायकोला बोलावून सांगितले की, तिच्या नवऱ्याने घरात अंगठी कोठे लपवून ठेवली आहे ती शोधून आणून दिली तर तिला पुष्कळसे सोने इनाम म्हणून दिले जाईल. त्याने तिला बजावून ठेवले की अंगठीची किंवा ती शोधून दिल्याबद्दल मिळालेल्या इनामाची गोष्ट तिच्या नवऱ्याला कळता कामा नये. एकदम इतके सोने कोठून मिळाले हे जेव्हा त्याला मागाहून कळेल, तेव्हा तो आश्चर्यचकित होईल. मल्लूच्या बायकोला राजाच्या मनातला खरा हेतू तिच्या नवऱ्याचा जीव घेण्याचा होता हे माहीत नव्हते. म्हणून तिने घरी गेल्यावर नवऱ्याचे कपडे, पेटी वगैरे सर्व जागा शोधून पाहिल्या, परंतु तिला ती अंगठी सापडली नाही. म्हणून रात्री नवरा आल्यावर तिने नवऱ्याला विचारले— "का हो, तुमच्याजवळ जी अंगठी आहे ती आम्हालासुद्धा कळू नये अशी ठेवली आहे वाटते लपवून?" मल्लूला बायकोने अंगठी पाहिली असावीसे वाटले. म्हणून एवढेच म्हणाला— "भिंतीत लपवून ठेवली आहे."
दुसऱ्या दिवशी मल्लू कामावर निघून गेला, तेव्हा त्याच्या बायकोने घराच्या सर्व भिंती लक्षपूर्वक पाहिल्या आणि जिथे भोक होते ती जागा शोधून काढली. शेवटी एका जागी अंगठी सापडलीच. तिने ती लगेच राजाला नेऊन दिली. राजाने अंगठी ठेवून घेतली आणि तिला वचन दिल्याप्रमाणे पुष्कळसे सोने बक्षीस म्हणून दिले. ती आनंदाने ते सोने घेऊन घरी आली आणि घराच्या परसात एक बेताचा खड्डा खणून तिने ते सोने पुरून ठेवले.
बरोबर एका आठवड्यानंतर राजाने नोकराला मल्लूकडे पाठवून अंगठी घेऊन यायला सांगितले. मल्लूने खुणेच्या जागी भिंत खणून पाहिली, पण तिथे अंगठी नव्हती. तो एकदम ओरडला— "आपले आयुष्य आजच संपणार!" त्याने बायकोला बोलावून, तिने अंगठी कोठे पाहिली आहे का, असे विचारले. परंतु नवरा मारील या भीतीने तिने अंगठीची गोष्ट नवऱ्यापासून लपवून ठेवली. मल्लू निराश होऊन राजाकडे गेला. म्हणाला— "महाराज! माझी अंगठी कोठे दिसत नाही." राजा म्हणाला— "तर मग, तुला शिक्षा भोगावीच लागणार!" मल्लू हात जोडून म्हणाला— "मला शिक्षा कबूल आहे. पण एका दिवसाची मुदत दिलीत तर बरे होईल. मी आपली कामे उरकून घेतो व शिक्षा भोगण्यास तयार होऊन हजर होतो."
राजाने एक दिवसाची मुदत दिली व म्हणाला— "उद्या सकाळच्या आत अंगठी आणून दाखवली नाहीस, तर चांडाळाला तुझ्याच घरी पाठवीन." मल्लू अत्यंत दुःखी होऊन घरी गेला. त्याने विचार केला की उद्या मरावेच लागणार. आज ओढ्यावर जाऊन एखादा मोठा मासा पकडून खावा आणि मनातली एवढी इच्छा तरी पुरी करून घ्यावी. त्याप्रमाणे त्याने गळ आणून पाण्यात टाकला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एक मासा गळाला अडकला. मल्लूला फार आनंद झाला. त्याने घरी जाऊन स्वतःच मासा कापून शिजवून खायचे ठरवले व बायको येण्यापूर्वी सुरी घेऊन मासा कापला. परंतु त्याचे भाग्य बलवत्तर होते, म्हणून माशाच्या पोटातून अंगठी बाहेर आली. तो अंगठी हातात घेऊन मोठ्याने ओरडला— "माझे आयुष्य वाढले! अंगठी सापडली." तो तसाच "आयुष्य वाढले, अंगठी सापडली!" असा ओरडत राजाकडे गेला आणि म्हणाला— "महाराज, ही घ्या अंगठी! आता माझी शिक्षा रद्द करावी."
मल्लूच्या पाठोपाठ मोठी गर्दी राजवाड्यात शिरली होती. राजाने सर्वांसमक्ष त्याची शिक्षा रद्द केली. परंतु ती अंगठी मल्लूला कशी मिळाली, हे राजाला कळले नाही. त्या दिवसापासून मल्लूच्या विरुद्ध काही न करण्याचे राजाने ठरवले. झाले असे की मल्लूच्या बायकोने अंगठी आणून दिल्यावर राजाने ती अंगठी उशाजवळच्या तिपाईवर ठेवून दिली होती. त्या दिवशी रात्री एक उंदीर तिपाईवर आला व त्याचा धक्का लागून अंगठी पाण्याच्या मडक्यात पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाच्या नोकरांनी नित्याप्रमाणे मडक्यातील पाणी ओढ्यात फेकून दिले आणि मडके धुवून ताजे पाणी भरून ठेवले. राजाला ती गोष्ट माहीत नव्हती. म्हणून मल्लूला अंगठी कशी मिळाली हे राजाला कळले नाही व त्याला कल्पनाही करता आली नाही.