हरवलेले धान्य
एका गांवात हयग्रीव नावाचा एक गृहस्थ राहत असे. एक तर तो गरीब होता आणि त्यात तो नेहमी आजारी असे. उदरनिर्वाह करणे त्याला अशक्य वाटू लागले. आपल्या बायका-मुलांचे हाल त्याला पहावेनात. म्हणून तो कोणाला काहीही सांगितल्याशिवाय घर सोडून निघून गेला. 'काही मिळकत झाली तरच घरी परत जायचे' असे त्याने आपल्या मनाशी ठरवले होते.
गरीब आणि काडीसारख्या पैलवानाला कोण काम देणार? हयग्रीवला कोठेही काही काम मिळाले नाही. त्याला जीवाचा वीट आला. रानात दूर एका नदीत उडी मारून जीव देण्याचे ठरवून त्याने उडी मारली.
जवळच एक ऋषी स्नान करीत होते. त्यांनी त्याला नदीत उडी मारताना पाहिले. त्यांनीही नदीत उडी मारून हयग्रीवला बाहेर काढले. त्याने आपली करुण कथा त्यांना सांगितली. ऋषी त्याला म्हणाले, "मी तुला एक मंत्र शिकवतो. त्याच्या मदतीने तुला तीन दिवस वाटेल तितके खाद्य मिळेल. त्यानंतर तुला तो मंत्र उपयोगी पडणार नाही. तो मंत्र दुसऱ्या कोणाला शिकवून दिलास तर त्याचा उपयोग त्याला होईल. पण जर मंत्र देण्यालायक तुला कोणी भेटला नाही, तर तू मंत्र तसाच सोडून दे. मंत्रशक्ती असेपर्यंत तू पौष्टिक पदार्थ खाऊन घे व प्रकृती सुधारल्यावर कामधंदा करू लाग."
हयग्रीव तो मंत्रोपदेश घेऊन आनंदाने घरी आला. मुनींनी त्याला शिकवलेल्या मंत्राचा जप करून आपल्या बायका-पोरांना आवश्यक ते तांदूळ, डाळ, गहू, भाजी, दूध, तूप वगैरे पदार्थ मागून घेतले. तीन दिवस सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह आनंदाने झाला. तिसऱ्या दिवशी हयग्रीवाने तीन दिवसांकरिता आवश्यक सर्व पदार्थ पुन्हा मागून घेतले.
त्यानंतर त्या मंत्राचा काही उपयोग होणार नाही असा विचार करून तो मंत्र कोणाला शिकवावा या विवंचनेत तो बसला असता एक भिकारी येऊन दारासमोर उभा राहिला आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडला. हयग्रीवला मनुष्य बेशुद्ध झाला म्हणजे काय होते हे माहित होते, कारण तो स्वतः देखील अन्नाभावी बेशुद्ध झाला होता. म्हणून तो त्या गरीब भिकाऱ्याला आपल्या घरात उचलून घेऊन गेला. औषधपाणी केले व तो शुद्धीवर आल्यावर त्याला खायला प्यायला दिले.
नंतर त्याने त्याला मंत्र शिकवून दिला व म्हणाला, "या मंत्राच्या साहाय्याने तीन दिवस सुखाने खा-पी व त्यानंतर तो दुसऱ्या कोणाला तरी देऊन मोकळा हो." भिकाऱ्याने हयग्रीवकडून मंत्र शिकून घेतला. त्याने एक पोते भरून तांदूळ मागून घेतले. पोते भरून तांदूळ पाहून भिकाऱ्याच्या बायकोला अपरंपार आनंद झाला. भिकाऱ्याने पोत्यातले तांदूळ घेऊन त्याला हवे होते तेवढे ठेवून घेतले व बाकी बाजारात विकून टाकले. जे पैसे मिळाले त्याचा उपयोग त्याने इतर कामाच्या वस्तू विकत घेण्यासाठी केला.
तो मंत्र आणखी दोन दिवस त्याच्या कामाचा होता. त्याने त्या दोन दिवसांत त्या मंत्राचा उपयोग कसा करून घ्यावा याविषयी आपल्या पत्नीचा सल्ला घेतला. तीन दिवस त्याचा उपयोग करून घेऊन तो मंत्र बायकोला शिकवून द्यावा असे ठरले. अशा तऱ्हेने त्याच्या घरी तो मंत्र आणखी पाच दिवस राहू शकला. या पाच दिवसांत सर्व आवश्यकता पूर्ण करून घ्यायच्या होत्या.
दोघेही भिकारी नवरा-बायको फार लोभी होते. गावकऱ्यांनी त्यांना रोज फुकट भिक्षा घालायला तयार नसत. कधी कधी रागावून त्यांना हाकलून लावीत. या मंत्रबळाने त्यांनी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेऊन गावकऱ्यांचा सूड घ्यायचे ठरविले. परंतु तो उद्देश पुरा होण्यास उनकी झोपडी पुरेशी नव्हती. म्हणून भिकारी रानातल्या एका जुन्या पडक्या ओसाड घरात बायकोबरोबर राहायला गेला व मंत्र म्हणून म्हणाला, "आमच्या गावातले सर्व धान्य घेऊन या घरात येऊन पड."
त्याची बायको त्याच्याहून वरचढ होती. मंत्र शिकून घेतल्यावर ती म्हणाली, "देशात जितके धान्य आहे ते सर्व आमच्या या घरात आणून ठेव." त्यानंतर तिच्याजवळची मंत्रशक्ती देखील नाहीशी झाली. दोघा नवरा-बायकोला वाटत होते की आपण सारे जग जिंकले. सर्व देश गरीब आणि श्रीमंत सर्व धान्य कोठे नाहीसे झाले, की मुठालकी (जादू) झाली या काळजीने अन्नाच्या शोधार्थ निघाले. काही लोकांनी कंदमुळे व फळे खाऊन आपला उदरनिर्वाह चालविला. राजाने हे सर्व धान्य कसे व कोठे गेले याचा शोध लावण्यासाठी आपले हेर पाठविले.
इतक्यात एक आश्चर्याची गोष्ट घडली. प्रत्येक घरातून उंदीर बाहेर पळून जाऊ लागले. कारण त्यांना खायला घरात काही नव्हते. परंतु अन्न कोठे आहे हे वासानेच त्यांना कळले व त्यामुळे लक्षावधी उंदीर एकाच दिशेला पळू लागले. ते कळल्यावर राजाने आपल्या शिपायांना उंदरांच्या पाठोपाठ तपास करायला पाठवून दिले.
उंदरांचे थवेच्या थवे रानाच्या दिशेने पळत त्या जुन्या पडक्या घरात शिरू लागले. शिपायांनी त्या घराला चारी बाजूंनी वेढा घातला. काही शिपाई आत गेले. त्यांना हे पाहून आश्चर्य वाटले की घरात शेकडो तांदळाची व गव्हाची पोती भरून ठेवलेली होती. कित्येक खोल्यांत तांदूळ जमिनीवर पसरलेले होते.
शिपायांना पाहून भिकारी व त्याची बायको पळून जाऊ लागली. परंतु शिपायांनी त्यांना कैद केले. त्यांनी त्यांना विचारले, "तुम्ही या रानात का राहता? व तुमच्याकडे इतके तांदूळ कोठून आले?" पण दोघे काय उत्तर देणार? म्हणून शिपायांनी त्यांना राजासमोर नेऊन उभे केले. म्हणाले, "यांच्या जवळ सर्व अन्न जमा झालेले आहे."
भिकाऱ्याने राजाला सर्व वृत्त निवेदन करून माफी मागितली. म्हणाला, "हा सर्व मंत्रप्रताप आहे. मी गावकऱ्यांवर सूड उगवण्याच्या हेतूने हे सर्व केले. हयग्रीवाने मंत्र दिला होता. मी त्याचा स्वतःसाठी उपयोग करून समाधान मानण्याऐवजी त्याचा दुरुपयोग केला."
राजाने हयग्रीवला बोलावून विचारले, तेव्हा त्याने मंत्र खरा असल्याची गोष्ट सांगितली. नंतर राजाने रानातून धान्य मागवून गावकऱ्यांना परत वाटून दिले. भिकारी व त्याची बायको दोघांनाही कैदेची शिक्षा झाली.