Bookstruck

हिकमती भुतं

कनकपूरचा कमलाकर शहरातील कचेरीत नोकरी करत असे. त्यासाठी त्याला रोज एका जंगलातल्या वाटेनं जावं-यावं लागे. बाप लहानपणीच मरून गेल्यामुळे खूप अडचणी सोसून त्याच्या आईनं त्याला वाढवलं. कमलाकरचा आवाज मोठा गोड होता. आईच्या सांगण्यावरून एक दिवस रात्रीच्या वेळी तो गाणं गाऊ लागला. त्या सुस्वर गाण्याच्या आनंदात आईने डोळे मिटून घेतले. पण ते डोळे पुन्हा उघडलेच नाहीत! स्वतःचा स्वयंपाक त्याला स्वतःच करून घ्यावा लागे. त्याचे कष्ट पाहून एकदा त्याचा मित्र त्याला म्हणाला, "कमलाकर, अरे किती दिवस असे कष्ट उपसत बसशील? एखादी मुलगी पसंत करून लग्न करून घे ना!" लग्नाची गोष्ट निघाल्याबरोबर त्याला शेजारच्या पार्वतीची आठवण आली. पार्वतीच्या बापाचा लहानसा व्यापार होता. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. रोज संध्याकाळी ती गावाबाहेरच्या देवळात देवदर्शनाला जात असे. देव-पूजेसाठी ती रोज कमलाकरच्या घरासमोरच्या बागेतून फुलं तोडून नेत असे. पण आतापर्यंत तो कधीच तिच्याशी काही बोलला नव्हता. एक दिवशी तो कचेरीतून परत आला तेव्हा पार्वती, फुलं तोडत असलेली त्याला दिसली. तेव्हा त्याने तिच्याशी बोलायचं धाडस केलं. "पार्वती, तू मला फार आवडतेस. तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे माझी, तू आहेस कबूल लग्नाला?" त्यानं बेधडक तिला विचारलंच. कमलाकरचं बोलणं ऐकून पार्वती थोडा वेळ स्तब्धच राहिली. नंतर तिनं विचारलं, "तू खूप छान गातोस हे माहीत आहे मला. पण तुला तलवार येते चालवता? आहेस इतका साहसी तू? खाली मुंडी घालून गल्लीतून चालतोस म्हणून लोक तुला मोठा विनयशील समजत असतील. पण काय रे, डोकं ताठ ठेवून चालण्याइतकं आर्थिक बळ आहे तुझ्या पाठीशी? इतर माणसांसारखे नाकडोळे आहेत तुला; पण कधी आरशात आपला चेहरा पाहिलायस? तुझे डोळे बारीक आहेत अनं नाक बसकं आहे, ते दिसलं नाही कधी तुला? पुन्हा कधी माझ्यापुढे असला प्रस्ताव मांडायचं धाडस करू नको." कमलाकर यावर काही बोलणार, इतक्यात हाताची फुलं खाली टाकून त्याचं ऐकायलाही न थांबता रागाने फणफणत पार्वती तिथून निघूनही गेली. कमलाकरला हा अपमान जिव्हारी लागला. अन् अंधारातच तो जंगलाकडे चालू लागला. ती चांदणी रात्र होती. कमलाकर जंगलातल्या एका मोठ्याशा खडकावर जाऊन बसला. त्याला आईची आठवण आली, अन् तिला प्रिय असणारं एक गाणं तो गाऊ लागला. त्यानं गाणं संपवलं, तेव्हा एका झाडाच्या मागून आवाज आला, "काय अद्भुत गाणं हे! किती मधुर! कोणता राग वगैरे आम्हाला काही कळत नाही, पण ते ऐकता ऐकता आमचं भानच हरपलं. संगीत प्रवाहात आम्ही जणू वहात होतो!" टाळी वाजवत तीन भुतं त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. जीवनाला कंटाळलेल्या कमलाकरला भुतं पाहून भीती वगैरे मुळीच वाटली नाही. भुतं म्हणू लागली, "गाणं तर छानच होतं, पण दु:खाचं होतं ते. एखादं उल्हासभरलं गीत गा ना! खूप आनंद वाटेल आम्हाला." "माझ्या जीवनातला आनन्दच जर संपलाय, तर उल्हासभरं गाणं कुठून आणू मी? माझ्या तोडून रडकं गाणंच निघणार." "तू तर चांगला तरणाताठा आहेस. वय तरी कितीसं असेल तुझं? इतकं कसलं दुःख झालंय तुला, सांग तरी! नीट सांग सगळं!" भुतांनी सहानुभूतीनं कमलाकरची चौकशी केली. कमलाकरनं आपलं दुःख त्यांच्यासमोर प्रकट केलं, अन् पार्वतीनं आपला तिरस्कार कसा केला, ते सांगितलं. भुतांनी यावर आपसात चर्चा करून कमलाकरला म्हटलं, "हं! बरीच गर्विष्ठ दिसतेय ही पार्वती. पण आता दुःख करू नको. या लग्नाची सारी जबाबदारी आमच्यावर सोपव. तू इथून सरळ शहरात निघून जा. पुढल्या पौर्णिमेला इथेच येऊन भेट आम्हाला." भुतांच्या बोलण्यावर कमलाकरचा मुळीच विश्वास बसला नाही, पण पुन्हा घराकडे जाणं त्याला आवडण्यासारखं नसल्यानं तो शहराकडेच वळाला. दुसऱ्या दिवशी पार्वती देवळाकडून परत फिरली तेव्हा अंधार पडू लागला होता. झाडाझुडुपांनी वेढलेल्या पाऊलवाटेनं चालत असताना एक वाघ एका सशाचा पाठलाग करत असलेला तिला दिसला. वाघ अगदी तिच्या समोर आला, अन् तेवढ्यात ससा झुडपात दिसेनासा झाला. पार्वतीला अचानक समोर पाहून जोरानं डरकाळी फोडून वाघाने तिच्यावरच झडप घालण्याचा पवित्रा घेतला. भयानं ओरडून पार्वतीने एकदम आपले डोळे मिटून घेतले. वाघाची उडी अंगावर पडायला उशीर झाल्याने तिने डोळे उघडून पाहिलं. समोरचं दृश्य पाहून ती आश्चर्यचितच झाली. तिला कमलाकर एक चमकती तलवार म्यानात खोचत असलेला दिसला! त्याच्या पुढ्यातच मान अर्धी कापली गेलेल्या अवस्थेतला, तडफडत जमिनीवर पडलेला वाघ होता! 'हा कमलाकर तर मोठाच महावीर आहे!' असे पार्वतीला वाटले. प्राण वाचवल्याबद्दल आपली कृतज्ञता प्रकट करण्यासाठी तिनं आपलं पाऊल उचललं. पण तिला मुळीच अवसर न देता कमलाकर अंधारात अदृश्यही झाला. कदाचित तिचे धन्यवाद स्वीकारायची त्याची इच्छाही नसावी! मन काहीसं दुखावलेली पार्वती घराकडे चालू लागली अन् इकडे ससा, वाघ अन् कमलाकरची रूपं धारण केलेली भुतं आपापल्या खऱ्या रूपात प्रकट झाली! आपल्या पहिल्या प्रयत्नात मिळालेल्या यशाबद्दल ती खूपच खूश होती! दुसऱ्या दिवशी अशीच पार्वती देवळातून परत येताना वाटेपासून थोडं दूर एक नवंनसंच भवन तिला दिसलं. ते पाहून तिला आश्चर्य वाटलं. त्याकडे थबकून पाहताना तिला दिसलं की आतून कमलाकरने बाहेर येऊन नोकरांना काही आज्ञा दिली अन् तो आत निघून गेला! पार्वतीचा तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खात्री करून घेण्यासाठी नोकरांजवळ जाऊन तिनं विचारलं, "कुणाचं भवन आहे हे?" ते उत्तरले, "हे श्रीमान् कमलाकर यांचं भवन आहे. जुन्या घरात राहणं त्यांना आवडत नसल्यानं त्यांनी हे नवं भवन बांधवून घेतलंय." तोंडात बोट घालत पार्वतीनं विचारलं, "एकाच दिवसात कसं काय बांधता आलं हे?" "कमलाकरना सर्व शक्ती अन् युक्ती अवगत आहेत ना! असले प्रश्न ऐकायला आवडत नाही त्यांना," असं चिडून म्हणत ते नोकर आत निघून गेले. हे सर्व कसं घडलं असावं, ते पार्वतीला कळेना! ती तशीच आपली वाट चालू लागली, अन् इकडे ते भवनही अदृश्य झालं. आपल्या दुसऱ्या सफलतेचीही भुतांना खूप समाधान वाटलं. पार्वती रात्रभर जागीच राहिली. कमलाकरचं साहस अन् त्याच्या संपत्तीबद्दलचे विचारच राहून राहून तिला सतावत राहिले. तऱ्हेतऱ्हेच्या विचारांमुळे थकलेली पार्वती दुसऱ्या दिवशी देवळातही गेली नाही. पण अंधार पडू लागल्यावर ती कमलाकरच्या घरासमोरील फुलबागेकडे गेली. तिथे तिला अनुपम सुन्दर अशा तीन तरुणी दिसल्या. पार्वतीने चकित होऊन त्यांना विचारलं, "तुम्ही कोण आहात? मी तर कधी या गावात पाहिलं नाही तुम्हाला?" "आम्ही तिघी मैत्रिणी आहोत. शहरातल्या कचेरीत काम करणारा कमलाकर फार आवडतो आम्हाला; आमचं खूप प्रेम आहे त्याच्यावर! आमच्यातली जी आवडेल तिच्याशी लग्न करावं असा प्रस्ताव घेऊन आलो आहोत आम्ही. कमलाकरचं घर हेच समोरचं ना?" तिघी सुंदरानी विचारलं. "होय, घर तर त्यांचंच आहे; पण हल्ली तो इथं नाही रहात. पण मला वाटलेलं आश्चर्य दूर करा बरं! डोळे दिपवणारं सौन्दर्य आहे तुम्हा तिघींचं. मग तुम्ही त्या अगदी सामान्य अशा कमलाकरवर कशा भाळलात?" पार्वतीनं त्यांना विचारलं. तिच्या या प्रश्नावर एक सुंदरी हसून म्हणाली, "किती मूर्ख तू तरी? तुझं फक्त बाह्य सौंदर्यावरच लक्ष आहेसं दिसतंय. अशाच सौंदर्याच्या मागे लागून माझ्या ताईनं लग्न केलं. पण काय झालं? गाडी उलटली अन् तिचा नवरा..." पण तिला मध्येच थांबवत दुसरी सुंदरी म्हणाली, "आता इतकं सारं सांगत बसायची काय गरज? आपली मैत्रीण सुकुमारी हिला विसरलीस? मोठा मदनाचा पुतळा समजून जमीनदाराच्या मुलाशी लग्न केलं तिनं, अन् काय? तो तर मेला अगदीच लंपट निघाला! कोणता दुर्गुण त्याच्यात नव्हता सांग बरं? तो तर तुझ्या मैत्रिणीला छळत राहिला, अन्..." तिच्या तोंडावर हात ठेवत तिसरी म्हणाली, "या अंधारात त्या दुष्टाबद्दल कशाला बोलत राहिलीस? नावसुद्धा काढू नकोस त्याचं! माझ्या मावशीच्या नातीचंच माहीत नाही का? चांगला सहा फूट उंच, तगडा, सुरेख लांब नाक अन् तिरप्या मिशांच्या त्या महाबळेश्वरच्या साठी वेडी होऊन लग्न केलं तिनं त्याच्याशी. पण त्याचं वागणं तर बघ! तो तर तिला एखाद्या बटकीपेक्षाही वाईट वागतोय. तिचं बिचारीचं आयुष्य म्हणजे नरक बनलाय नुसता!" त्या तिघींच्या वक्तव्यावर चिडत पार्वती म्हणाली, "शेवटी म्हणायचंय तरी काय तुम्हा तिघींना? हेच ना, की कमलाकर दिसायला सुंदर नसला तरी मोठा गुणी आहे? तुम्हाला इथं यायला जरा उशीरच झाला बरंका. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की कमलाकरचं लग्न ठरूनही गेलंय." तिघींनी एकदम विचारलं, "कुणाशी?" "माझ्याशीच. आता जाऊ शकता तुम्ही तिघी." असं म्हणत पार्वती वेगाने तिथून निघून गेली. आता सांगायची गरजच नाही की त्या तरुणी म्हणजे आपली तीन भुतंच होती! त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच पार्वतीच्या मनात बदल घडवण्यात ती यशस्वी झाली! खूप आनंदाने वटवाघळांचं रूप घेऊन ती तिथून उडून गेली. पौर्णिमेच्या दिवशी तिन्ही भुतं ठरल्याप्रमाणे त्या खडकापाशी आली. पण कमलाकरबरोबर पार्वतीलाही तिथं पाहून ती घाबरून गेली. त्यांचं रूप पाहून पार्वती हसतच म्हणाली, "तुम्ही तिघांनी माझा गर्व नाहीसा केलात, माझा अविवेक दूर केलात. मी ज्याला गारगोटी समजत होते, तो तर अस्सल हिरा निघाला हिरा! तुम्हा तिघांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच आलेय मी इथं! अगदी मनापासून आभारी आहे मी तुमची." भुतांचं भय दूर झालं अन् ती म्हणाली, "इतकं चांगलं काम इतक्या थोड्या काळात आम्ही पुरं करू शकलो, याचाच आनन्द वाटतोय आम्हाला. आता तुम्ही दोघं मिळून एखादं आनंदी गाणं म्हणा अन् आमचा आनन्द द्विगुणित करा." पार्वती अन् कमलाकर गाऊ लागले अन् भुतं आनंदाने टाळ्या देत नाचत राहिली!