Bookstruck

धडपडणारी मुले 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“नाहीं. ते सर्वसंग्राहक आहे. सर्व जातींची व धर्मांची मुले आहेत.”

“किती आंनदाची गोष्ट! नाही तर आज पाहावें तो प्रत्येक जाती-जातींचीं छात्रालये निघाली आहेत. गुजर बोर्डिंग, लेवा बोर्डिंग, मराठी बोर्डिंग, शिंपी बोर्डिंग! काय आहे समजत नाही. अशा संकुचित संस्थांतील मुलें आपापल्या जातीपुरतेच पाहाणारी होतात. त्यांना व्यापक दृष्टीच येत नाही. नवभारत निर्माण करावयाचा आहे. परंतु एकीकडे पाहावें तों या छकलेछकलें करणा-या वृत्तीस ऊत येत आहे,” स्वामीजी म्हणाले.

“जोडण्यापूर्वीचें हें तोंडणें आहे. नवीन माळ गुंफण्यासाठी प्रत्येक मणी स्वच्छ होत आहे,” गोपाळराव म्हणाले.
“स्वच्छ होत आहे की अहंकाराने बुजत आहे, कुणास ठाऊक? भारतीय बंधुत्वाचें पुण्यमय अखंड सूत्र स्वत:त घालून घेण्यास हे मणी तयार होतील का?” स्वामींनी शंका प्रकट केली.

“श्रद्धेने व आशेनेंच काम करावे लागते. पदोपदी शंकाच घेत बसले तर थोर ध्येयांना कोणीच हात घालणार नाही.” गोपाळराव निश्चियानें म्हणाले.

“तुमची जगांत निराशा नाहीं होत?” स्वामींनीं विचारलें.

“मी निराशेच्या रानांतून खूप भटकलों आहे. निराशेची विषण्णता मीं अनुभवली आहे. परंतु पुन: पुन: आशेचे पल्लव मी फोडीत असतो. तुमच्याकडेहि मी आशेनें आलों आहे,” गोपाळराव म्हणाले.

“मी तुम्हाला काय देणार? मजजवळ कांहीहि नाही,” स्वामी म्हणाले.

“मजजवळ द्यावयास काहींहि नाहीं असे जो म्हणतो, तो देवाचा अपमान करतो असें मला वाटत असतें. त्या श्रीमंत परमेश्वराची लेंकरे इतकी कशी भिकारी कीं त्यांच्याजवळ देण्यासारखे काहीहि नाही? हा एक प्रकारचा अहंकार आहे. कधीकधी नम्रतेतून अहंकार बाहेर पडत असतो. हा अहंकाराचा नारु कोठून कसा उत्पन्न होईल त्याचा नेम नसतो,” गोपाळराव स्वस्थपणें बोलत होते.

“गोपाळराव! तुम्हाला कांहिहि वाटो. परंतु माझ्या मनांतील तुम्हाला सांगितले,” स्वामी खिन्नपणें म्हणाले.

“काल सायंकाळचे शब्द ज्या पुरुषाच्या हृदयांतून बाहेर पडले, ते श्रीमंत हृदय आहे. तें सागराप्रमाणे उचंबळणारे हृदय आहे. कालचें तुमचें भाषण ऐकून मुलें वेडी झाली,” गोपाळराव भावनेने बोलत होते.

“खरेंच. आम्ही कधीहि असें भाषण ऐकले नव्हतें. तुम्ही दोन तास काल बोलले असतेत, तरी कोणी उठले नसतें,” त्या दोन मुलांतील एका मुलगा म्हणाला.

“तुमचे विचार ऐकावयास तरुण भुकेलेले आहेत. तरुणांच्या मनोभूमि ओसाड आहेत. त्यांच्यावर सहृदय मेघांचा सारखा वर्षाव झाला पाहिजे. स्वामी! तुम्ही तें करुं शकाल. तुम्ही आमच्या संस्थेत येता? ही गोष्ट विचारावयास मी आलों आहे. तुमचा फार उपयोग होईल,” गोपाळराव म्हणाले,

« PreviousChapter ListNext »