Bookstruck

धडपडणारी मुले 129

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शेतकरी हो शेतकरी
घ्यावी सत्ता स्वीय करी ||शेत०||
शेतांमध्ये श्रमतो आपण
घेतो विश्रांतीही व क्षण
घरांत खाया नाही परि कण
दीन दुर्दशा कोण हरी ||घ्यावी०|

झेंडै हाती घ्या क्रांतीचा
झेंडा हाती घ्या शांतीचा
निर्भयतेचा स्वात्रंत्र्याचा
सोडा आता दास्यकरी ||घ्यावी०||

मिळेल नि:संशय तो विजय
होईल दारिद्र्याचा विलय
व्हावे सर्वांनी परि निर्भय
संघटना ती हवी परि ||घ्यावी०||

भविष्य आहे अपुला आता
खाऊ कुणाच्या आता न लाथा
वरती करू या आपुला माथा
पळतील सारे दूर अरी ||घ्यावी०||

देवपुरांतील शेतक-यांची मुले खड्या आवाजात गाणे म्हणत होती. मजूरही त्यात सामील झाले. सारा गाव दुमदुमून गेला.

“भाऊ ! तू गाणे सांगितलेस ते किती छान होते. मला नाही उतरून दिलेस ते?” वेणूने विचारले.

“ते काल रात्री मी लिहले. तुझ्या भाऊने ते गाणे रचले आहे,” रघुनाथ म्हणाला.

“भाऊने केलेले गाणे! माझ्या भाऊने केलेले गाणे ! भाऊ ! तुझे ते दुसरे मित्र नाही का रे करीत गाणी ? त्यांचेही दे न मला गाणे. सा-यांची गाणी माला दे. माझ्या वहीत सा-यांची हवीत गाणी. स्वामींची आहेत हे तुझें आणि त्यांचे ?” वेणूने विचारले.

“नामदेव कवि नाही. तो चित्रकार आहे. तो सुंदर चित्र काढतो. तो वाजवतो बासरी, गाणीही सुंदर गातो,” रघुनाथ म्हणाला.

“त्यांना का नाही आणलेस ? आश्रम पाहिला असता त्यांनी. त्यांनी बासरी वाजवली असती व मी गाणे म्हटले असते,” वेणू म्हणाली.

“त्याचे वडिल आजारी आहेत,” रघुनाथ म्हणाला.

“आता बरे आहेत का रे,” वेणूने विचारले.

“बरे आहेत, जमले तर एक दिवस तो येणार आहे येथे,” रघुनाथ म्हणाला.

« PreviousChapter ListNext »