Bookstruck

"तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या."

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१८६०-६१
"तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या."
गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्री जेव्हा हिमालयाकडे जाण्यास निघाले तेव्हा तुकामाई स्वतः उमरखेडपर्यंत त्यांना पोचविण्यास आले. आपल्या नव्या शिष्याला म्हणजे श्रींना, आपल्या गुरूंच्या म्हणजे चिन्मयानंदस्वामींच्या पायावर घालावे हा तुकामाईंचा मुख्य हेतू होता. ही गुरु-शिष्याची जोडी दर्शनासाठी स्वामींच्या समाधीपाशी गेली. त्यावेळी दोघांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. गोचरस्वामी तेथे हजर होते. ( गोचर स्वामी हे श्रीतुकामाईंचे गुरूबंधू ) तुकामाई बोलले, "स्वामी, बाळाला आपल्या चरणापाशी आणला आहे. त्याला पदरात घ्यावा." असे म्हणून तुकामाईंनी आणि श्रींनी समाधीवर घातलेला मोठा हार श्रींच्या अंगावर पडला. हीच स्वामींची संमती व हाच त्यांचा प्रसाद अशी खात्री होऊन सर्व मंडळी बाहेर आली. श्रींना फारच आनंद झाला. तुकामाईंच्या पायांवर मस्तक ठेवून श्री पुढे जाण्यासाठी निघाले. सदूगुरूंची भेट व्हावी म्हणून वयाच्या बाराव्या वर्षी घर-दार वगैरे सर्व काही सोडून बाहेर पडलेले श्री, तुकामाईंची गाठ पडल्यावर नऊ महिने छायेप्रमाणे त्यांच्या सहवासाला राहिले. तुकामाईनीही त्यांच्यावर जिवापलीकडे प्रेम केले. श्री तेथून निघाले. ते मजल दरमजल करीत उज्जैनला आले. तेथील जवळच्या अरण्यात अगदी निर्मनुष्य ठिकाणी एका गुहेमध्ये श्री बरेच दिवस राहिले. श्रींचे तेथे वास्तव्य असेपर्यंत रोजसकाळ-संध्याकाळ एक गाय गुहेच्या तोंडापाशी येऊन उभी राही. श्रींची द्दष्टी तिच्याकडे वळल्याबरोबर तिने हंबरडा फोडला व आपला पान्हा सोडला. दूध खाली पडू लागल्यावर धार काढण्यासाठी जवळ भांडे नसल्याने तिच्या आचळाला तोंड लावून श्री पोटभर दूध प्याले. रोजसकाळ-संध्याकाळ ती गाय श्रींना दूध पाजून जात असे. पुढे उज्जैनहून निघाल्यावर श्री पुन्हा नैमिषारण्यात गेले. दोन वर्षांपूर्वी ( १३ व्या वर्षी ) श्री ज्या गुहेत रहात होते त्याच गुहेत श्री पुन्हा राहण्यास गेले. श्री दोन वर्षे येथे राहिले. या वेळी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा परिचय झाला. राघोबा नावाच्या विश्र्वासू नोकराला घेऊन ते नैमिषारण्यात रहात होते. श्रींची गाठ पडली व या गुहेपासून जवळच पण आणखी आतमध्ये असलेली मोठी गुहा श्रींनी त्यांना दाखवून दिली. श्रींनी त्यांना अभय दिले व म्हणाले, "येथे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, तुम्ही निर्धास्त असा. तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." श्रींच्या भेटीने त्यांचे औदासीन्य कमी झाले. जेव्हा जेव्हा श्री नैमिषारण्यात जात तेव्हा ते नानासाहेब पेशव्यांना भेटून येत. येथे मोठमोठे तपस्वी भगवंताच्या चिंतनात काळ घालवीत असतात. त्यांच्या दर्शनासाठी मी येथे येतो असे श्री म्हणत यावेळी श्रींची दोन वर्षें केव्हाच निघून गेली.

« PreviousChapter ListNext »