Bookstruck

"रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !"

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१८६२-६३
"रामनामाने भवरोग नाहीसा होतो,
तर देहाचा रोग बरा होणार नाही का !"
नैमिषारण्यातला आपला मुक्काम संपल्यावर श्री अयोध्येस आले. तेथे त्यांची रामशास्त्री नावाच्या मोठया पंडिताशी गाठ पडली. रामशास्त्री सहकुटुंब यात्रेला निघाले होते. शास्त्रीबुवा वेदान्तामध्ये फार निष्णात होते पण सगुण उपासनेला म्हणजे भजन, नामस्मरण इ. गोष्टींना तुच्छ व व्यर्थ मानीत. नामाच्या सामर्थ्याबद्दल श्रींचा व शास्त्रीबुवांचा रोज काथ्याकूट व्हायचा. शास्त्रीबुवा श्रींना म्हणाले, "तुम्ही स्वतः भ्रमात आहात ब लोकांनाही का उगीच भ्रमात घालता ?" त्यावर श्री म्हणाले, "मला भ्रम झाला असला तरी तो नामाचा आहे, घरदार व कुटुंबाचा नाही, ही तर गोष्ट खरी ? रामाला त्याची लाजाआहे, आपण सध्या त्याच्या गावात आहोत, येथून आपण निघायच्या आत तो माझा तरी भ्रम दूर करील, नाही तर तुमचा तरी करील." दुपारी हे बोलणे झाले, शास्त्रीबुवा घरी गेले. संध्याकाळी शास्त्रीबुवा सहकुटुंब नदीवर गेले, तेथे दोघांनी टरबूज खाल्लो. रात्री अकराच्या सुमारास शास्त्रीबुवांच्या बायकोला जुलाब सुरू झाले. ८/१० जुलाब झाल्यावर त्या बाईंची जीभ आत ओढू लागली. शास्त्रीबुवांनी लगेच गावात जाऊन २/३ चांगले वैद्य आणले आणि औषधपाणी दिले. रात्री २ वाजता बाईंची अवस्था कठीण झाली. काय करावे ते शास्त्रीबुवांना समजेना. इतक्यात त्यांना श्रींची आठवण झाली. श्री नेहमी म्हणायचे "रामनामाने भवरोग नाहीसा होतो तर देहाचा रोग बरा होणार नाही का ?" हा विचार शास्त्रीबुवांच्या मनात येऊन त्यांनी बायकोच्या जवळ बसून नामस्मरणाला आरंभ केला. काही वेळाने बाईला डोळा लागला. सकाळी तिला बरे वाटू लागले. शास्त्रीबुवा लगेच उठले, स्नान-संध्या उरकली व थेट श्रींच्याकडे आले व त्यांच्यासमोर आडवे पडले. श्रींनी त्यांना उचलले व हे आज नवीन काय आरंभले म्हणून विचारले. त्यावर डोळ्यांत पाणी आणून शास्त्रीबुवा म्हणाले, "मी अपराधी आहे. मला क्षमा करा " श्रींनी त्यांचे सांत्वन केले, त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे आणून आणखी औषधपाणी केले. श्रींकडे पाहण्याची शास्त्रीबुवांची द्दष्टी एकदम बदलली.  ते फार नम्रतेने व आपलेपणाने वागू लागले. श्रींनी दोघांना "रामनाम " दिले. आपली यात्रा सफल झाली असे त्यांना वाटले. त्यांची मुले काशीस होती म्हणून मोठया आग्रहाने त्यांनी श्रींना काशीस नेले व आपल्या घरीच श्रींचा बरेच दिवस मुक्काम राहिला. श्री विश्र्वेश्र्वराच्या दर्शनाला गेले असता देवळात एका श्रीकांत बंगाली कुटुंबाशी त्यांची ओळख झाली. ते जमीनदार व घरची अलोट संपत्ती पण, मूल नाही. तीन लग्ने केली, वय ५५ वर्षांचे. श्रींना भेटल्यावर पहिल्या बायकोच्या ओटीत ( ज्या बाईचे वय ४०/४२ वर्षांचे होते ) श्रींनी नारळ टाकला व सांगितले, "बाई रामनामाचा साडेतीन लाख जप करा, हा नारळ जपून ठेवा. आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटूना टाका." त्याप्रमाणे बाईला मुलगा झाला. अशा प्रकारे काशीमध्ये श्रींची खूप प्रसिद्धी झाली.

« PreviousChapter ListNext »