Bookstruck

संग्रह ९१

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भाऊ खातो पान चुना लावतो देठाला

मायबाईचे लाल लाली सरजाची ओठाला

भाऊ भाऊ करु भाऊ चालला दुरुन

होती माझी माया नेत्र आले हे भरुन

मोठे मोठे लोक माझ्या भाऊचे संगती

शिर्‍याच्या पंगती आडव्या लाविल्या बनाती

तुझा माझा भाऊपणा मुसलमान तुझी बीबी

हाती काजळाची डबी माझ्या महालाशी उभी

रामाचे देऊळ दिसते शोभीवंत

गोरी भावजय पति-पुत्रानं भाग्यवंत

दिवाळी चोळी शिंपीणीला आला शीण

पुसती आयाबाया कोणा हौशाची बहीण

भाऊला झाला लेक बहीण भेटे बाजारात

सोन्याची परात पेढे वाटी नगरात

भाऊची आस्तुरी रुसली माझ्यावरी

हाती पैठणीची घडी समजाऊ कवण्यापरी

दसर्‍याच्या दिशी आपटा लुटी सारा गाव

मानकरी भाऊ सर्वांआधी हात लाव

सासरी जाताना डोळ्याला येते पाणी

सासरी जाते तान्ही सई माझी

सासरी जाताना डोळ्याला येते गंगा

महिन्याची बोली सांगा सई माझी

सासरी जाताना उन्ह लागतं शालीतून

गाडी चालवा बागेतून भाईराज

सासूचा सासूरवास नणंदा करी खसखस

आशिलाच्या लेकी सोस सई माझी

सासूचा सासुरवास नणंदबाई हळू बोला

जाशीला परघरा हीच गति तुम्हाला

सासुराचे बोल लिंबाचा कडू पाला

माझ्यासाठी गोड केला बापाजींनी

सासूराचे बोल रेशमाच्या गाठी

सोडाव्या माझ्यासाठी भाईराजा

माय तो माहेर बाप तो येऊ जाऊ

पुढे आणतील भाऊ लोकचारा

माय तो माहेर बाप तो माझी सत्ता

नको बोलू भाग्यवंता भाईराज

भावाच्या घरी गेले भाऊराया पाहे वाट

पायांनी सारी पाट भावजयी

भावजय बाई उगीर बोलाची

मला गरज लालाची भाईरायाची

भाऊ गेला बाजारात भावजय मारी हाका

आपुल्या बहिणीसाठी खण भारी घेऊ नका

आम्ही चौघी बहिणी चवी गावच्या चिमण्या

तुझ्या घरच्या पाहुण्या वहिनीबाई

आम्ही चौघी बहिणी डोंगराच्या आड

खुशालीचे पत्र धाड भाऊराया

माझ्या दारावरुन गेला माझ्या घरी नाही आला

काय अपमान झाला भाईराजा

.

आपण गुज बोलू गुजाला आली गोडी

माय बहिणीची शेज थोडी

« PreviousChapter ListNext »