Bookstruck

संग्रह ९२

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

चिक्कण सुपारी अखंड माझ्या पोटी

मायबहिणी तुझ्यासाठी

सुखदुःखाच्या बांधुनी केल्या पुडया

मायबहिणी झाली भेट उकलते थोडया थोडया

घराची घर रीत पाहून गेला व्याही

मनी ठसला जावई

अग सुने ग मालनी राखून घ्यावा मान

तुझा कंथ माझा प्राण

सुनेला सासुरवास कशाच्या कारणं

पोवळ्याची आली लड मोत्यांच्या भारानं

जावई गृहस्थाला समईची नाही चाड

मैना माझ्या लाडणीचा चंद्रज्योतीचा उजेड

सोयर्‍याचे बोल जसे निंबाहून कडू

समर्थ सख्याचं मन कशी मोडू

सोयर्‍याचे बोल जसे पाण्याचे शिंतोडे

सांगते सख्याला उभे रहा पलीकडे

उभ्या भिंती सारवल्या काढले ताम्हण

तुझ्या लग्नाचे सामान मैनाबाई

उभ्या भिंती सारवल्या काढले स्वस्तिक

तुझ्या लग्नाचे कौतुक मैनाबाई

साखळ्या तोरडयाचा पाय पडला शाईमध्ये

तुला दिली वाईमध्ये मैनाबाई

माहेरा जाता बाई बसायाला पाट पेढे

भाचे कौतुकाचे पुढे

बापानं घेतली साडी, साडीला नाही दशा

लेकी समजाविल्या कशा

गोड जेवण जेवली माझ्या माऊलीच्या ताटी

भरल्या काठोकाठ दह्यादुधाच्या ग वाटी

कशी जेवण जेवली गुळमांडा शिरापुरी

वाटया मांडल्या दोहिरी ताटाच्या हारोहारी

जन्मली मी तुझ्या पोटी कशी म्हणू तू ओंगळ

गंगेपरीस निर्मळ तू ग केळी मी कंबळ

सासरला जाता गणगोताची मालन

भेटी भलाईनं सारा गेला दिवस कलून

सासरला जाता नको रडू फुसूं फुसूं

सुजले रडून डोळे किती शालीनं मी पुसू

सासरला जाता बाई गाडी उभी केली

भेटीला उतरली मैना पाया लागू आली

सासरला जाता रडते का सांग तरी

पाठीचा बंधुराजा देतो तुला धूरकरी

सासरला जाता मैना मुळूमुळू रडे

पाहे बाई तोंडाकडे ढकली गाडी पुढे

माहेरा मी जाते बाई मान कोणाचा पाहीन

सून पित्याची लहान माझ्या बंधूची कामीन

माहेरा मी जाते बाई धुते पाय माझी माय

उभी राहते अंगणी गर्वानं भावजय

माहेरा मी जाते बाई माहेरी भाऊ भासे

नांदे भरले गोकुळ वाडा आनंदाचा दिसे

माहेरा मी जाते बाई भावजय चंद्रकळा

वाळू घालते बंधुच्या ओल्या धोतराचा पिळा

« PreviousChapter ListNext »