Bookstruck

हिमालयाची शिखरे 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कोणी मुंबईस कळविले की दादाभाई एका इंग्रज मुलीशी लग्न लावणार आहेत !  आईचे पत्र आले, “ मी तुला दुसरी बायको कर म्हणत होते. आता असे करुन कलंक लावणार ?”   दादाभाई तिकीट काढून लगेच मुंबईला आले. रात्री १२ वाजता घरी आले. टकटक केले. मायलेकरांची, पतीपत्नींची भेट झाली. संशय गेले. जाताना आई, पत्नीला घेऊन गेले. परंतु पुढे धंदा बुडाल्यावर ते स्वदेशी परत आले. बडोद्यांत मल्हारराव गायकवाड यांची कारकीर्द. कारभारी, अधिकारी सारे भ्रष्ट. रेसिडेंटची मिजास. मल्हाररावांनी दादाभाईंना दिवाण व्हा विनविले. दिल्ली सरकारने चौकशी कमिटी नेमून मल्हाररावांच्या कारकीर्दीवर रिपोर्ट लिहविला. याला उत्तर द्या म्हणून कळविले. दादाभाईंनी  “ उत्तर काय लिहायचें ? मागील चर्चेत अर्थ नाही. पुढे कारभार सुरळीत राहण्याची हमी देतो, ” असे उत्तर द्यायला सांगितले. कमिशनचा रिपोर्ट खोटा म्हणते तर अंगलट येते. दादाभाईंनी निर्धारपूर्वक हेच उत्तर द्या म्हणून महाराजांस सांगितले. आणि प्रकरण निवळलें.

दिवाणगिरी सोडून ते विलायतेत आले. प्रचार करु लागले. निबंध, लेख, भाषणें यांनी जागृति करु लागले. हिंदुस्थानचे उत्पन्न वर्षाला सरासरी फक्त २० रु. असे सिध्द केले. पार्लंमेंटमधील निवडणुकीला उभे राहिले.
लॉर्डं सॅलिसबरी म्हणाले, “ या काळया आदमीला का निवडणार ?”  परंतु काळा आदमी निवडून आला. इंग्लंडमध्ये ते हिंदची बाजू सारखी मांडीत. हिंदी लोक बुध्दिमान नाहीत, त्यांच्यात नीति नाही, असे कोणी लिहिताच ते त्यांचे दात त्यांच्या घशात घालीत.

काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस ते होते. परंतु त्यांचे जीवन विलायती चळवळीत गेले. कलकत्त्यास मतभेद तीव्र होणार म्हणून त्यांना अध्यक्ष व्हावयास बोलाविले. ते आले. स्वराज्य शब्द त्यांनी उच्चारला. स्वदेशी, बहिष्कार शब्द जन्मले. दादाभाईंना पुण्याच्या कांबळी नावाच्या गृहस्थाने स्वदेशी छत्री दिली. ते म्हणाले, “या स्वदेशी छत्रीखाली राष्ट्र एकवटो.”  ते पुन्हा विलायतेत गेले. परंतु १९०७ मध्यें परत आले. १९१६ मध्ये त्यांना विद्यापीठाने डॉक्टर पदवी दिली.

अ‍ॅनी बेझंट बाईंनी होमरुल चळवळ सुरु केली. ७० वर्षांची ती वृध्दा ९० वर्षांच्या दादाभाईंना म्हणाली, “ तुम्ही अध्यक्ष व्हा लीगचे.”   ते झाले. परंतु १९१७ मध्यें ऑगस्टच्या २० तारखेस ९२ वर्षाचे होऊन ते देवाघरी गेले. त्यांच्या पुण्य पावन स्मृतीस भक्तिमय प्रणाम. भारताचे ते पितामह.

अनेक इंग्रजांनी साधुतुल्य पुरुष त्यांना म्हटले. महात्माजींचा त्यांच्याशी दक्षिण आफ्रिकेतून नेहमी पत्रव्यवहार. दादाभाई त्यांना स्वहस्ते पत्राचे उत्तर देत. थोर पुरुष. नि:स्पृह, निर्भय !  चंदनाप्रमाणे ते झिजले.

जे हाती घ्याल ते तडीस न्या म्हणत. त्यांचा हा स्फूर्तिदायी संदेश आपण पाळू या. “ हिंदी पार्लमेंट कधी स्थापन होईल ?”  असे ते म्हणायचे. आज तें स्थापन झाले आहे. ते भारताला भूषणभूत करणे म्हणजेच दादाभाईंचे अनृणी होणें होय.

« PreviousChapter ListNext »