Bookstruck

हिमालयाची शिखरे 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नवसंदेशाचा ऋषि
अरविंद घोष


श्री अरविंद घोष. महान पुण्यश्लोक नाम ! बडोद्याची नोकरी सोडून कलकत्त्याला वंगभंगाच्या वेळेस १९०६ मध्ये राष्ट्रीय महाशाळेचे प्राचार्य म्हणून ते आले. पुढे वंदेमातरम् म्हणून पत्र काढले. ती तेजस्वी, अर्थपूर्ण वाणी वेड लावती झाली. त्यांचा भाऊ बारीन्द्र बाँब प्रकरणात. खुदीरामने बाँब टाकल्यावर माणिकटोळा कट उघडकीस आला. अरविंदांनाही गावण्यात आले. त्यांच्या बहिणीने, “माझ्या भावाला वाचवा तो निर्दोष आहे. वकील कोठून देऊ ? मी राष्ट्रासमोर भिक्षा मागते.” असे करुण पत्र प्रसिध्दले. शेवटी चित्तरंजनदास खटला चालवायला पुढे आले. त्यांनी खोटया पुराव्याच्या चिंध्या उडविल्या. न्यायाधिश अरविंदांचा विलायतेतील वर्गबंधु होता.
देशबंधु समारोप करताना म्हणाले, “राजकीय वादांची धूळ खाली बसेल. अरविंदांची कीर्ति सातासमुद्रापलिकडे जाईल. राष्ट्रीयतेचा महान कवी, देशभक्तीचा उद्गाता, नव संदेशाचा ऋषी म्हणून ते ओळखले जातील.”

अरविंद सुटले. तुरुंगात असताना त्यांना अंतर्बाहय श्रीकृष्ण दिसे.  ते पुढे पांदिचंरीस गेले. गेली सदतीस वर्षें ते तेथे होते. ते योगसाधना करीत आहेत. ते म्हणतात, “विश्वातील महान शक्ति दूर असते. इतर योगी त्या शक्तीकडे वर जातात. परंतु मी ती शक्ति खाली खेचून आणू बघत आहे. मानवी जीवनात मग क्रान्ति होईल.”

बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज पृथ्वीवर आणली. अरविन्द ती दिव्य शक्ती, ती आध्यात्मिक शक्ति खाली आणून जीवनात नवे तेज आणू पाहात आहेत.

रविन्द्रनाथ म्हणाले, “पुष्कळ वर्षांपूर्वी अरविंदांना पाहिले नि म्हटले ‘अरविन्द प्रणाम. ’  आज पुन्हा भेटून तेच म्हणतो  “अरविंद प्रणाम.”   रविन्द्रनाथांची अरविंदांवर सुप्रसिध्द कविता आहे.

मधून मधून हा महान साधक, हा योगीश्वर प्रचलित विषयांवर विचार सांगतो. गांधीजींच्या हत्येनंतर ते म्हणाले, “धीर धरा, ज्या शक्तीने भारताला आधार दिला तीच शक्ती पुढे प्रकाश देईल.”  भाषावार प्रांतरचनेलाही त्यांनी नुकताच पाठिंबा देऊन सांगितले, “विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. मध्यवर्ती सत्ता सर्वंकश करुनही प्रान्तीय विविधता नष्ट करु नका. राष्ट्राचा प्राणच त्याने नाहींसा होईल.”

आज १५ ऑगस्ट हा अरविंदांचा जन्मदिवस. कलकत्त्यात आजपासून सात दिवस त्यांचा उत्सव आहे. जगातून मोठ-मोठी माणसे येणार आहेत. प्रणाम अरविंदांना, मानवी जीवनात नवप्रकाश आणू पाहणा-या थोर योगीश्वराला.

रवीन्द्र, अरविंद, महात्माजी !  तीन भव्य दिव्य नावे !  एका इटालियन कवीने म्हटले, “प्रभु कधी कवीच्या, योग्याच्या, भिका-याच्या रुपाने अवतरतो.” रविन्द्र, अरविंद आणि हरिजनके वास्ते हात पुढे करुन महात्माजी- या तिघांच्या रुपाने भारतका प्रभू वावरत होता, वावरत आहे !

« PreviousChapter ListNext »