Bookstruck

मधुराणी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका राजाचे दोन मोठे मुलगे आपआपल्या नशिबाची परिक्षा पाहण्यासाठी राजधानी सोडून दूर जगात मुशाफिरीला गेले. वाटेत  ते नाना प्रकारच्या फंदात सापडले. वेडेवाकडे वागू लागले. घरी येण्याचे भान त्यांना राहिले नाही. त्यांचा तिसरा एक भाऊ घरी होता. तो अगदी बुटबैंगण होता. हा बटुवामन आपल्या दोघा भावांचा शोध करण्यासाठी बाहेर पडला. हिंडता हिंडता त्याची व त्या दोघा भावांची गाठ पडली. त्याला पाहून ते पोट धरधरून हसू लागले. ते थट्टेने म्हणाले, “अरे वेड्या, तू कशाला जगाच्या यात्रेला निघालास? तुझं पाऊल मुंगीचं. आमची दहा पावले वतुझी शंभर बरोबर.” तरीपण त्यांच्याबरोबर तोही निघाला. तिघे प्रवास करू लागले.

ते हिंडता हिंडता एका मुंग्यांच्या वारूळाजवळ आले. त्या दोघा मोठया भावांना ते वारूळ पाहून जमीनदोस्त करण्याची इच्छा होती. मुंग्यांची कशी त्रेधा व तिरपीट उडेल, आपली अंडी तोंडात घेऊन त्या कशा सैरावैरा धावपळ करू लागतील, याची गंमत त्या  डदांड बंधूंना पाहण्याची इच्छा होती. परंतु तो धाकटा बुटका भाऊ म्हणाला, “नका रे पाडू, किती कष्टाने व मेहनतीने ते उभारलेले आहे! पाडणे सोपे, पण उभारणे कठीण जाते. आपला होईल खेळ. परंतु मुंग्यांचे होईल मरण. गरीब, उद्योगी मुंग्या, राहू द्या त्यांना सुखाने. नका त्यांच्या वाटेस जाऊ! त्यांनी काय तुमचे केले?”

त्या दोघा भावांचे त्याने मन वळविले. ते तिघे पुढे चालू लागले. वाटेत एक सुंदर सरोवर होते. त्या सरोवरात दोन बदके खेळत होती. आनंदाने आवाज काढीत होती. त्या दोघा भावांच्या मनात आले की, त्या बदकांना पकडावे, भाजून, परतून खाऊन टाकावे. परंतु बटूवामन म्हणाला, “नका रे त्यांना पकडू. कसे नावेसारखे डोलत आहेत. त्यांना सुखाने नांदू द्या, पाण्यात खेळू द्या, डुंबू द्या. त्यांनी रे तुमचे काय केले?”

« PreviousChapter ListNext »