Bookstruck

मधुराणी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्या भावांनी ऐकले व ते तिघे पुढे गेले. एका झाडावर मधाचे पोळे होते. त्यात इतका मध साठला होता की, मधाच्या धारा खाली गळू लागल्या होत्या. ते दोघे भाऊ म्हणाले, “या आपण त्या मधमाश्या जाळू व पोळे काढून मध पिऊ.” तो धाकटा भाऊ म्हणाला, “नका रे नका. हजारो फुलांजवळ जाऊन, गोड गोड बोलून त्या थेंब थेंब मध जमवितात. अशा उद्योगी मधमाश्यांना का जाळावे? आपणास हे शोभत नाही. राहू द्या त्यांना सुखाने, जमवू द्या मध आनंदाने.”

त्या दोघा भावांनी ते मानले व ते पुढे गेले. जाता जाता ते एकी किल्ल्याजवळ आले. त्या किल्ल्यात ते सारे शिरले. तेथे घोड्यांचे तबेले होते. परंतु त्या तबेल्यांतील सारे घोडे आरसपानी दगडांचे होते! तेथे आजूबाजूस कोणी माणूस दिसेना. तेथील सर्व खोल्या व दिवाणखाने ते शोधू लागले. शेवटी एका दरवाज्याजवळ ते आले. त्या दरवाजाला तीन कुलुपे होती. त्या दाराला फटी होत्या, त्या फटीतून आतील सारे दिसत होते. त्यात एक म्हातारा मनुष्य टेबलाजवळ बसलेला होता. त्या भावांनी त्याला एक-दोन हाका मारल्या, परंतु म्हाता-याने ऐकले नाही किंवा मुद्दाम लक्ष दिले नाही. त्यांनी पुन्हा एकदा एक मोठ्याने हाक मारली. म्हातारा उठला व बाहेर आला.

तो काही एक बोलला नाही. सारे मुक्याने चालले होते. त्याने त्यांचे हात धरून त्यांना एका टेबलाजवळ नेले. त्या टेबलावर नाना खाद्यपेये होती. त्या सर्वांचा यथेच्छ समाचार त्या भुकेलेल्या तिघांनी घेतला. त्या म्हाता-याने त्यांना एका शेजघरात नेले. तेथे ते तिघे भाऊ रात्री गाढ झोपी गेले. 

सकाळ झाली. त्या तिघांतील जो सर्वांत वडील भाऊ होता, त्याच्याजवळ तो म्हातारा गेला. म्हाता-याने त्याचा हात धरून त्याला एक टेबलाजवळ नेले. त्या टेबलाजवळ तीन फळ्या होत्या. त्या तिन्ही तुकड्यांवर काही लिहिलेले होते. त्या किल्ल्यावरची घातलेली जादू कशाने दूर होईल, हे त्या तीन लेखांत लिहिलेले होते, तेथे जी पहिली फळी होती तिच्यावर पुढील मजकूर होता-

« PreviousChapter ListNext »